04/07/2026
श्री सद्गुरूंचे आकलन करणे अवघड - ७
गाणगापूरला जाण्याचा मला योग आला. तेथे मी विश्वेश्वरय्या (अम्मा) हे सत्पुरुष आम्ही उतरलेल्या धर्मशाळेच्या समोरच्या खोलीत राहात होते. त्यांचे दर्शनास मी गेलो.
त्यांचे खोलीत त्यांचेबरोबर ५-६ मंडळी बसली होती. मी दारांत उभा असतानाच त्यांनी माझ्याकडे दृष्टिक्षेप केला व लगेच विचारले, “कोठून आलांत?” मी एकदम म्हटले, “श्री बीडकर महाराजांचे मठातून आलो आहे” त्यावर त्यांनी एकदम पुढील उद्गार काढले, “रावसाहेब-सहस्त्रबुद्धे! ऐसा ‘स्टेज’ हमने अभी तक देखा नहीं। उनका हमरा सिर्फ नजानजर हुआ । वो सिद्ध है । वो सिद्धोंका सिद्ध है। वो स्थितप्रज्ञ है।“ असे म्हणून त्यांनी श्रीमद् भागवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायांतील स्थितप्रज्ञाच्या वर्णनातील चार श्लोक अस्खलित संस्कृतमध्ये म्हणून दाखविले. तेवढ्यात कोणीतरी त्यांचेसाठी किटलीतून चहा मागविला.
चहा देणाऱ्या मुलाला ते म्हणाले, “इनको (माझ्याकडे बोट दाखवून) चाय पिलाव. ये बडे घरके मेहमान है.” त्यानंतर गोविंद या नावाच्या त्यांचेकडील सेवेकऱ्यास ते म्हणाले, “गोविंद, इनको लड्डु खिलाव” नंतर मला चहा व लाडू आग्रहाने खावयास भाग पाडले. यावेळी श्रीबाबांच्या पुढील उद्गारांची मला साक्ष पटून गहिंवरून आले.
श्रीबाबा एकदा मला म्हणाले, “आमच्या गुरूंनी आम्हाला कोणाकडे जावयाची गरज ठेवली नाही. तुम्हाला जे ओळखतील ते साधु समजा”
निवेदक: श्री हरी गणेश मोडक, पुणे पृ० २८७
श्री बाबा सहस्त्रबुद्धे यांच्या गोष्टी – श्री. रा. देशपांडे यांच्या पुस्तकातून. श्री पद्माकर खळे यांचे हस्तलिखित
Voiceover generated from Elevenlabs. Music and voiceover mixed using Audacity