03/10/2024
हिंदू धर्मात श्राद्ध कर्मात किती सूक्ष्म विचार केला आहे बघा
#महालयश्राद्ध #धर्मपिण्ड #कृतज्ञता
पितरांना उद्देशून करण्याच्या अनेक श्राद्धांपैकी #महालयश्राद्ध #हा #असा #श्राद्धप्रकार #आहे #की #ज्यामध्ये #धर्मपिण्ड #दिले #जातात.
पिंड आणि पाणी देण्यामागे एवढाच उद्देश असतो की ज्याला उद्देशून ते दिले गेले आहे तो ज्या ज्या लोकांमध्ये ज्या ज्या रूपामध्ये असेल त्या त्या लोकातील त्याला आवश्यक अशा अन्नपदार्थांमध्ये त्या त्या जीवाला तो भाग मिळत असतो. (देवल स्मृती मध्ये याचं विश्लेषण केले आहे ते नंतर कधीतरी पाहूया.)
महालय श्राद्ध आपल्याशी प्रत्यक्ष संबंधित असणाऱ्या व्यक्तींना उद्देशून केले जाते. सर्वांना पिंडदान झाल्यानंतर महालयामध्ये धर्मपिंड या नावाने चार पिंड दिले जातात. ते कोणासाठी असतात ते पाहू.
आब्रह्मणो ते पितृवंशजाता मातुस्तथा वंशभवामदीयाः |
वंशद्वयेस्मिन्ममदासभूता भृत्यास्तथैवाश्रितसेवकाश्च ||
ब्रह्मदेवापासून वडिलांच्या वंशामध्ये जे जन्मले तसेच (ब्रह्मदेवांपासूनच) जे आईच्या वंशामध्ये जन्मले
(ब्रम्हदेवांपासून सृष्टी निर्मिती झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपणा सर्वांची ब्रम्हदेवांपासूनच उत्पत्ती आहे.)
माझ्या या दोन्ही वंशामध्ये जे कोणी दास होते, भृत्य म्हणजे मदतनीस, आश्रित म्हणजे आपल्यावर अवलंबून जीवन जगणारे, सेवक होते.
मित्राणि सख्यः पशवश्च वृक्षा दृष्टाश्च पृष्टाश्च कृतोपकाराः|
जन्मांतरे ये मम सङ्गताश्च तेभ्यःस्वधापिण्डमहं ददामि ||१||
जे मित्र होते, मैत्रिणी होत्या, पाळलेले (गाई, म्हशी, कोंबडे, कुत्रे, शेळ्या, मेंढ्या इत्यादी )पशू होते, वृक्ष (ज्यांची कधी सावली घेतली असेल, फुले घेतली असतील, फळे घेतली असतील, लाकडे घेतली असतील, किंवा प्रसंगी औषधांसाठी पाने, मुळे, साली, खोडे घेतली असतील),
ज्याने प्रेमाने बघितले असेल, आमची विचारपूस केली असेल, ज्यांनी आमच्यावर उपकार केले असतील, जन्म जन्मांतरामध्ये माझ्या सोबतीला जे होते त्या सर्वांसाठी मी हा पिंड देतो असे म्हणत पहिला पिंड दिला जातो. ||१||
पितृवंशे मृता ये च मातृवंशे तथैवच | गुरुश्वशुरबन्धूनां ये चान्ये बान्धवा मृताः ||
पितृवंशामध्ये किंवा मातृवंशामध्ये जे गुरु होऊन गेले सासरे होऊन गेले, भावंडे इत्यादी होऊन गेले, याव्यतिरिक्त जे समाज बांधव आहेत.
ये मे कुले लुप्तपिण्डाः पुत्रदारविवर्जिताः | क्रियालोपगताश्चैव जात्यन्धाःपङ्गवस्तथा ||
विरूपा आमगर्भाश्च ज्ञाताज्ञाताः कुले मम | धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ||२||
काही कारणाने माझ्या कुलामध्ये कोणी ज्ञात किंवा अज्ञात लुप्तपिंड (अपत्य आणि पत्नी इत्यादी नसलेले ज्यांचे पिंडदान होत नाही असे), काही कारणांनी ज्यांची अंत्यक्रियाच झालेली नाही असे, जन्मापासूनच अंध,पंगू , कुरूप आहेत, (यांचे विवाह इत्यादी संस्कार होत नाहीत या कारणाने). जे भ्रूणावस्थेमध्ये मृत झाले आहेत. अशा सर्वांसाठी मी दिलेला धर्मपिंड हा अक्षय्य तृप्ती देणारा असो. असे म्हणून दुसरा पिंड दिला जातो.
असिपत्रवने घोरे कुम्भीपाके च ये गताः |तेषामुद्धारणार्थाय इमं पिण्डं ददाम्यहम् ||३||
आपापल्या पापकर्मा मुळे जे कोणी असिपत्र, कुंभीपाक इत्यादी नरकांमध्ये पडलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी मी हा पिंड देतो असे म्हणत तिसरा पिंड दिला जातो.
उच्छिन्नकुलवंशानां येषां दाता कुले न हि |
धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु|| ४||
भूकंप महापूर संततीहिनता इत्यादी गोष्टींमुळे ज्यांचे कुल आणि वंश हे नाश पावलेले आहेत त्यामुळे अशा लोकांना अन्न पाणी इत्यादींनी तृप्त करणारे त्यांच्या कुलामध्ये कोणीही शिल्लक नाही अशा प्रत्येकासाठी मी हा पिंड देतो असे म्हणत चौथा पिंड दिला जातो.
प्रत्यक्ष संबंध असलेल्या किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेल्या किंवा कोणताही संबंध नसलेल्यांप्रती सुद्धा समर्पण करण्याच्या भावनेमागे आपल्या धर्माचा किती सूक्ष्म विचार आहे हे लक्षात येईल.
मनुष्य,वृक्ष, पशु इ ज्यांच्याकडून आपण उपकार स्वीकारले आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे एक वेळ आपण समजू शकतो परंतु केवळ ज्यांना देणारे कोणी नाही म्हणून शेवटचा जो पिंड दिला जातो त्यामागे आपल्या धर्माची उदारताच दिसून येते. 🙏