16/01/2016
प्रत्येक माणसामध्ये कुठलीतरी कला असणे आवश्यक आहे
अखिल भरतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे मत
ठाणे, दि. ८ : सुरवातीलाच ठाण्यात आल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांनी ठाण्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. गावावरून येताना कपड्याचा एकाच जोड होता मात्र माझ्यासोबत कला- क्रीडा आणि माझे नाटक मात्र. त्यामुळे इथपर्यंतचा पल्ला गाठू शकलो. प्रत्येक माणसामध्ये कुठलीतरी कला असणे आवश्यक आहे. असे मत शह्याण्णवाव्या अखिल भरतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले.
सुयश कला- क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गंगाराम गवाणकर यांच्या मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण यावरिल मुलाखतीने शुक्रवार दि. ८ जानेवारी २०१५ रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण, ठाणे पूर्व येथे गुंफले गेले. जयू भटकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
मुंबईत आलो तेव्हा हुतुतूमध्ये पारंगत असल्याने मुंबईत आल्यावर एका स्पर्धेमध्ये खेळी करून मिळवलेल्या दहा रुपये बक्षिसामधून नाईट स्कूलमध्ये प्रवेश व पुस्तके घेतली होती. जिद्द आणि प्रयत्न केल्यास सर्व शक्य होते असे गवाणकर यांनी सांगितले. एकोणीसशे ऐंशी साली वस्त्रहरण आले. सुरवातीला नाटक चालत नव्हते. त्यावेळी ते पुण्यामध्ये जाऊन विसर्जित करायचे असे ठरले होते. मात्र पुण्यामध्ये नाटक लावले आणि त्या नाटकाला पु. ल. देशपांडे, त्यांच्या पत्नी अशी दहा बारा दिग्गज माणसे प्रयोगाला पहिल्या रांगेत बसली होती. यावर पु. ल. नी हे नाटक पाहण्यापेक्षा मला यात भूमिका करायला मिळाली असती तर उत्तम झाले असते असे पत्र पाठवले होते. पु. ल. च्या त्या ओळी आम्ही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या आणि प्रयोग हाऊस फुल्ल होऊ लागला. चांगला प्रतीसाद मिळू लागल्यावर आत्ता आपले नाटक लंडनला घेऊन जायचे असे ठरले. मग पैसे गोळा करायचे होते. मग डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी नाटकात काम करावे अशी विचारणा केली असताना त्यांनी मी प्रमुख भूमिका करणार असे सांगितले. यामध्ये प्रमुख भूमिका कोणती हे काही कळेना. मग घाणेकरच म्हणाले अरे वस्त्रहरण दुर्योधन करणार न मग प्रमुख भूमिका तीच. मग घाणेकर वस्त्रहरणमध्ये दुर्योधन साकारणार अशी बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रयोगाला तुफान गर्दी झाल्याचे गवाणकर यांनी सांगितले. त्यानंतर लंडनला जाताना तेथील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गिरणीत, गोदीत काम करणारी बावीस माणसे लंडनला निघाली असताना विमानात घडलेल्या व लंडनमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती सांगून त्यांनी रसिक प्रेक्षकांना हसवले. शेवटी आज इथे पोहचलो आहे, त्याचे श्रेय माझ्या समोर बसलेल्या रसिक मायबाप कांना प्रेक्षकांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, नगरसेवक गिरीश राजे, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कार्यवाहक सतीश सावंत आदि उपस्थित होते.