एकविरा देवी

एकविरा देवी एक सच्चा देवी भक्त!

एकविरा देवी हे कोकणातील राजापूर तालुक्यात येणारे जागृत देवस्थान, नवसाला पावणारी एकविरा देवी अशी या दैवतेची ख्याती आहे. गावाचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा देवीचे अनेक सण उत्सव साजरे होतात. सुमारे ११ व्या शतकातील हे देवस्थान असून या गावाचा मूळअधिपती श्री. पुरक आहे. सुमारे ११ शतकापूर्वी कोतापूर गाव वसल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. शिलाहारांच्या नाही तर वाकाटक घराण्यापर्यंत या गावाचा मागे जाऊन भिडतो. गावाचे नवसाला पावणारे आणि संपूर्ण गावाची रखवाली करणारी ग्रामदैवत श्री एकविरा देवी ही या गावाचे दैवत आहे. गाव महार वतनदाराने वसवलेला आहे. त्यामुळे या गावाचा मूळ पुरूष वा मूळ देवता श्री पुरूक देव आहे. त्याचा मान मोठा पण त्याचे मंदिर मात्र जमिनदोस्त झाले आहे.उपेक्षित आहे, ग्रामदैवत एकविरेच्या भोवती सा-या गावच्या परंपरा गुंफलेल्या आणि गुरफटलेल्या आहेत. शिमगा-होळीचा सण हा गावातील वैशिष्ट्यपूर्ण असा असतो.
फाल्गुन शुक्ल एकादशीच्या दिवशी देवीचे खेळे देवीच्या घुमेवाडी तेथील मांडावर बसतात. तेथे पहिल्यांदा खेळ्यांना पारंपारिक पद्दतीने सुरवात करतात. आणि दुस-या दिवशी संध्याकाळी देवीच्या देवळातून हे खेळे दोन-चार टिप-यांचा खेळ खेळून बाहेरच्या गावाला खेळ करायला निघतात. होळीच्या आदल्या दिवशी हे खेळे गावात येतात. गावच्या खेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिमग्याच्या कडक ऊनात अनवाणी लोकांच्या दारी जाऊन नाच करतात. पायात चपला घालून एखादी व्यक्ती पुढे आली तर तिला उचलून बोंब मारण्याची प्रथा आहे. या प्रथेला मी लहानपणासून घाबरत आलो आहे. खेळे म्हणजे देवीचे रूप घेऊन वावरणा-या व्यक्ती आहेत. त्यांनी बोंब मारल्यावर त्याचे देणं द्यावं लागतं वगैरे गोष्टी लहानपणी गावात शिकताना घरच्यांनी मनावर बिंबवल्या आहेत. अर्थात खेळ्यांनी पायताणं न गावाची वा देवीची सेवा रूजू करायची आणि सामान्या जनांनी मात्र पायताण घालून त्यांच्यासमोरून फिरावं ही परंपरेत न बसणारी बाब असल्यानेच ही प्रथा उदयास आली आहे.
गावचे खेळे होळीच्या आदल्या दिवशी गावात येतात. आणि फाल्गुन कृण्ण प्रतिपदेला म्हणजे वसंतोत्सवारंभाला होळीच्या मांडावर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी ही मानाची असते. कोतापूर हे पंचक्रोशीत सुपारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे ब्राह्मण समाजाच्या सुपारींच्या मोठमोठ्या बागा आहेत. या बागातील वर्षावळीप्रमाणे सुपारीचे झाड होळीसाठी ठरविले जाते. होळीसणाच्या आदल्या दिवशी गावातील मानकरी या फोफळीला निवडतात. खूण म्हणून या झाडाला हळदकुंकू लावले जाते. दुस-या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात ही होळीरूपी सुपारीचे झाड मानकरी तोडतात. जमिनीवर स्पर्श करू न देता ही होळी जमिनी उतरतात. सुमारे दोन-तीन किलोमीटरच्या परिसरातून ही होळी वाजत-गाजत होळीच्या मांडावर आणली जाते. रस्त्याने आणताना गावातील सर्व वर्गातील तरूण-प्रौढ ही होळी खेळवत आणतात. ही मजा बघण्यासारखी असते. होळी मांडावर आल्यानंतर ती उभी केली जाते सुमारे १०० फूट उंचीच होळी उभी करण्या नजारा ही मनात साठवण्याजोगा आहे. होळी उभी करण्या अगोदर एकविरा देवीची पालखी मांडावर विराजमान झालेली असते.
पारंपारिक पद्धतीने होळीची पूजा होते.पूजेनंतर होळीच्या भोवती मानक-यांमार्फत आणलेले गवत होळीच्या भोवती मानकरी पेटवतात. या गवताची होणारी राख गावकरी श्रद्धेने अंगारा म्हणून कपाळी लावतात. होळीच्या बुंध्यावर सात फूटाच्या दरम्यान एक नारळ बांधतात. हा नारळ खेचण्याचा प्रयत्न प्रथम मानकरी करतात. त्यानंतर गावातला एखादी उंच व्यक्ती हा नारळ खेचते आणि एका रिंगणात हा नारळ सोडविण्याची पारंपारिक स्पर्धा सुरू होते. हा नारळ दुस-याच्या हातून सोडविणे म्हणजे एक प्रकारची शक्ती परीक्षा असते. प्रत्येक जणाला बोंब मारून होलयो..होलयो.. करीत या आखाड्यात खेचले जाते. ही स्पर्धा संपली की दुस-या एका अनोख्या स्पर्धेस सुरवात होते. ही स्पर्धा असते ती म्हणजे काळे दगड (हार्ड राँक) उचलण्याची. गावातील प्रत्येक तरूण यानिमित्ताने आपली ताकत अजमावतो.
हा शक्ती प्रकार सुरू असतानाच होळीला बोलले नवस प्रथम मानवले जातात. या नवसाच्या प्रकारात नारळाची तोरणे आणि गुळाच्या ढेपींचे प्रमाण खूप असते. या नवसातील पदार्थांचा गुळ-खोब-याचा प्रसाद गावक-यांना वाटला जातो. हा प्रसाद खाण्यात आणि लज्जत काही त्यावेळी वेगळीच असते.होळीला नवीन नवरे होळीला भेटविण्याची प्रथा आहे.
अलिकडे या प्रथा तशाच आहेत. मात्र विविध पदार्थांच्या दुकानाचे प्रमाण वाढले आहे. पंचमी पर्यंत होळीच्या खुटावर देवीची पालखी येथील मांडावर असते. पंचमीला देवीची पालखी वाजत गाजत, नाचवित तिच्या मंदिरात नेली जाते. पूर्वी गावातील लोक या पालखीच्या बरोबरीने लाठ्या-काठ्यांचे खेळ करीत. देवीचा शिमगोत्सव हा परंपरेतला एक भाग आहे. पण या पेक्षा देवीच्या वैशिष्ट्यापूर्णआणि उल्लेखनीय परंपरा आहेत. त्याविषयीही खूप काही लिहिण्यासाऱखे आमि सांगण्यासाऱखे आणि अनुभवण्यासारखे आहे.गावात खडकवली वाडीत स्वयंभू स्थानेश्वराची होळी आदल्या दिवशी साजरी होते. एकाच गावात दोन होळ्या आणि दोन खेळे एक टिप-यांवर नाचणारे आणि दुसरे डफावर नाचणारे, दोघेही मात्र गावात परंपरा जपताहेत. शिमग्यातील खेळे पाहणे आणि त्यांची रात्रीच्या वेळेची सोंगे पाहणे ही कोकणवासियांसाठी मोठी पर्वणी असते. या पर्वणीचा आनंद बालपणी लुटता आला.

19/01/2026

Address

Rajapur
416702

Alerts

Be the first to know and let us send you an email when एकविरा देवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to एकविरा देवी:

Shortcuts

Share