29/05/2026
*"अधिक मास महात्म्य कथासार अध्याय : १४"*
*"अंबरीष राजाची कथा"*
भगवान म्हणाले, "लक्ष्मी, दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप समजून घातली; पण तो पुनः पुन्हा विनवणी करू लागला, की "मुनिवर्य तुम्ही त्या अंबरीष राजाकडे एकदा जावे आणि पहावे तरी काय काय होईल ते ! "
मग दुर्वास ऋषींना नाही म्हणवेना. त्यांनी मनात विचार केला, की काही हरकत नाही. या निमित्ताने तरी देवेंद्राच्या आग्रहामुळे आपण अंबरीषराजाकडे जावे आणि त्या पुण्यवंताचे दर्शन तरी घ्यावे; पण त्याच्या त्या पुण्याईच्या सत्त्वहरणाचे काय -- ? आणि देवेंद्राचा तर त्याच गोष्टीबद्दल आग्रह आहे. असो. पाहू या तरी पुढे काय होते ते ! "
तो अधिकमास चालू होता. अंबरीष राजाने नेहमीप्रमाणे द्वादशीचे व्रत केले होते; पण दशमीला फक्त एकवेळ भोजन, एकादशीला संपूर्ण कडक उपवास आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी पारणे म्हणजे त्या साधनद्वादशीला ब्राह्मणांची सहस्रभोजने !
मग दुर्वास ऋषींनी ती संधी साधून एकादशीच्या रात्रीच आपल्या साठ सहस्र शिष्यांसह अंबरीष राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तो एवढ्या संख्येचा शिष्य समुदाय आणि स्वत: दुर्वास ऋषी आलेले पाहताच अंबरीष राजा आनंदाने म्हणाला, “वाहवा ! आज माझा भाग्योदयच झाला. इतकी सहस्रभोजने मला साधनद्वादशीच्या पारण्याला घडणार! ऋषिवर्य आपले थोर उपकार आहेत! "
झाले ! आगतस्वागत आटोपले. विश्रांतीची व्यवस्था झाली. पंचपंच उष:काल झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, "राजा, आम्ही सर्वजण भुकेलेलो आहोत. नदीवर जाऊन स्नानादी प्रातः कर्मे आटोपून येतो, तोवर आमच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करून ठेव ! "
त्यावर अंबरीष राजा म्हणाला, 'मुनिवर्य, आपण काळजी करू नये. आपणा सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था होईलच; पण आज साधनद्वादशी आहे हे लक्षात असू द्या. अगदी पहाटेच आपण नदीवरून लवकर परत यावे. कारण सूर्योदयापूर्वी पारणे पार पडले पाहिजे! नेम चुकता कामा नये!"
" ठीक आहे!" असे म्हणून दुर्वास ऋषी आणि त्यांचे ते साठ सहस्र शिष्यगण नदीवर स्नानासाठी निघून गेले. अंबरीष राजाने त्या सर्वांच्या यथेच्छ भोजनासाठी षड्स पाकसिद्धता करून ठेवली.
मग राजाने आपला नित्यनेम स्नान, देवपूजा वगैरे आटोपून नैवेद्य, वैश्वदेव करून काकबळी बाहेर टाकला आणि तो त्या अतिथींची मार्गप्रतीक्षा करू लागला.
सूर्योदयाची वेळ होत चालली. अरुणोदय झाला तरीही तो
ऋषींचा मेळा नदीवरून राजवाड्याकडे आला नाही म्हणून राजाने काही दूत नदीवर पाठविले. त्यांना लवकर येण्यासाठी निरोप दिला; परंतु दुर्वास ऋषी आणि शिष्यगण स्नान करून संध्या, जप, तर्पण करण्यात गुंग झाले होते. काहीजण म्हणाले, " सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्घ्य तरी कसे देणार ? सूर्योदय होईपर्यंत नदीवरच थांबले पाहिजे ! "
"सूर्योदय झाल्याशिवाय ऋषिगण भोजनासाठी येत नाहीत. हा निरोप राजाला कळला तेव्हा राजा तर पार घाबरून गेला. सूर्योदयापूर्वी भोजने झालीच पाहिजेत. हा तर साधन द्वादशीव्रताचा नियम आहे! आणि... तो नियम आज पाळला जाणार नाही असे दिसते. आता काय करावे ? राजाला मोठी काळजी लागली.
बरे ! आपण भोजन अगोदर घेऊन द्वादशी साधावी तर ते दुर्वास ऋषी भलतेच रागीट आहेत. ते शाप देतीलच ! व्रताचा भंग होऊ नये म्हणून आता काय करावे? असा विचार करता करता राजाला एक उपाय सापडला.
मग अंबरीष राजाने विष्णूला तुळशीपत्र वाहून तीर्थ घेतले आणि सूर्योदयापूर्वी साधनद्वादशी व्रताची सांगता केली. आता राहिले ते फक्त भोजनच !
थोड्या वेळात दुर्वास ऋषी आणि शिष्यगण सर्वजण नदीवरून सूर्याला अर्घ्य देऊन राजवाड्यात आले, तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, 'राजा, थोडा उशीर झाला; पण द्वादशीव्रताचा भंग झाला, असे मानू नकोस. चला आता भोजनाची सिद्धता करा. पाने वाढा! "
राजा म्हणाला, "मुनिवर्य, माझ्या व्रताचा भंग झाला नाही. सूर्योदयापूर्वी मी महाविष्णूचे तीर्थ घेतले आणि वेळ साधली. आता चला आपण सर्वजण भोजन करा ! "
काय ? तू तीर्थ घेऊन द्वादशीव्रत पूर्ण केलेस ?... अरे चांडाळा, तीर्थ घेतलेस ते भोजनाच्या जागी ना ? मग ते तू भोजनच केलेस की ! आणि आता आम्ही काय त्या उष्ट्या अन्नाचे भोजन करावे ? छे! छे! आता आम्हांला ते भोजन नको! चला रे शिष्यांनो, परत चला. निघा येथून !" असे म्हणत दुर्वास ऋषी रागारागाने तणतणत निघाले.
राजा अंबरीष हात जोडून नम्रपणाने म्हणाला, "मुनिवर्य, असा राग करू नका. अन्नाला डावलून जाऊ नका. त्यावर दुर्वास ऋषी संतापून म्हणाले, "राजा, तुला मोठा गर्व झाला आहे ! तुला वाटले मीच साधनद्वादशीचे हे व्रत नेमनिष्ठेने पाळले; पण आम्हांला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्यापूर्वीच तू तीर्थप्राशन करून का होईना आधी द्वादशी सोडलीस ! हे महापाप केले आहेस !
"या पापाचे फळ म्हणून मी तुला शाप देतो" की तुला मुक्ती मिळणार नाही! शंभर वेळा गर्भवास पत्करून शतजन्म दुःखे भोगावी लागतील ! जा! आम्ही आता येथून उपाशी पोटीच जाणार! आम्हांला नको ते तुझे उष्टे अन्न ! तीर्थ घेऊन सोडली द्वादशी आणि आमंत्रित ठेवले उपाशी! वाहवा रे राजा अंबरीष ! "
अंबरीष राजा पुनः पुन्हा विनवीत होता तरीही तो कोपिष्ट दुर्वास ऋषी शांत होईना. तो म्हणतच राहिला, "राजा, तू हे महापाप केले आहेस. मी तुला शाप दिला आहे ! शतजन्म तुला गर्भवासाची दुःखे भोगावीच लागलील
मग अंबरीष राजाने प्रभू विष्णूचा धावा केला. त्याने प्रार्थना केली, “भगवंता, मी हे तुझे साधनद्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने केले; पण त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून तुझे तीर्थ घेतले तर हे काय माझ्यावर या शापाचे अरिष्ट कोसळेले! देवा, आज माझी लाज राखली पाहिजेस ! या ऋषीने माझे आज जणू सत्त्वहरणच केले आहे !" तेवढ्यात चमत्कार झाला. भगवान विष्णू स्वतः गरुडावर
आरूढ होऊन आले आणि राजा अंबरीषापुढे येऊन दुर्वास ऋषींना म्हणाले, " हे मुनिश्रेष्ठा, अबंरीष राजा हा माझा परमश्रेष्ठ भक्त आहे ! त्याला दिलेला हा शाप आता मलाच भोगावा लागणार आहे !"
तरीही दुर्वास ऋषींना संताप आवरेना. त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली. त्या जटेतून एक भयंकर कृत्या राक्षसी उत्पन्न झाली. ती अंबरीषावर धावून गेली. ती अंबरीषाला खाऊन टाकणार तोच...
भगवान विष्णूंनी आपले सुदर्शनचक्र तिच्यावर सोडले. त्या चक्राने कृत्येला ठार केले आणि मग ते सुदर्शनचक्र. दुर्वास ऋषीच्या भोवती गरगर फिरू लागले ! " हे चक्र आपणाला आता ठार मारणार या भीतीने दुर्वास ऋषी पळत सुटले. चक्राने त्यांचा पिच्छा सोडला नाही. शेवटी दुर्वास ऋषी विष्णूला शरण गेले. चक्र आवरण्यास त्यांनी विनंती केली. विष्णू म्हणाले, 'माझा परमभक्त हा अंबरीषच त्याला आवरील !" मग अंबरीषाने त्या चक्राला शांत केले. दुर्वासाचे संकट टळले. त्यांनी क्षमा मागून मग द्वादशीचे ते भोजन करून आपला शाप मागे घेतला. विष्णू म्हणाले, 'लक्ष्मी, अशी आहे अंबरीष राजाच्या भक्तिसामर्थ्याची कथा. आता पुढे पंधराव्या अध्यायात एक आगळीच कथा मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक !
अध्याय चौदावा समाप्त!
*।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।*
*"श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर 087624 40232 "*