03/06/2026
मनन चिंतन:104
चांगुलपणा म्हणजे कमकुवतपणा नाही!
कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका
अनेक लोक ख्रिस्ती जीवनातील नम्रता, प्रेम आणि क्षमा यांचा चुकीचा अर्थ लावतात. काहींना वाटते की चांगला माणूस म्हणजे सर्व काही मुकाट्याने सहन करणारा, अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणारा आणि सतत इतरांच्या गैरफायद्याचा बळी बनणारा. परंतु बायबल अशी शिकवण देत नाही.
बायबल आपल्याला प्रेम करायला शिकवते, पण अन्यायाला प्रोत्साहन द्यायला नाही. क्षमा करायला शिकवते, पण गुलामासारखे जगायला नाही. नम्र राहायला शिकवते, पण भित्रे बनायला नाही.
येशू ख्रिस्त स्वतः प्रेम आणि नम्रतेचे सर्वोच्च उदाहरण आहेत. परंतु त्यांनी अन्याय, ढोंगीपणा आणि खोटेपणाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला. मंदिरातील व्यापाऱ्यांनी देवाच्या घराचा अपमान केला तेव्हा त्यांनी ठाम भूमिका घेतली. यावरून स्पष्ट होते की नम्रता आणि धैर्य हे एकमेकांचे विरोधक नाहीत.
स्वतःचा अपमान, शोषण आणि अन्याय सतत सहन करणे हे आध्यात्मिकतेचे लक्षण नाही. देवाने प्रत्येक मनुष्याला सन्मानाने जगण्यासाठी निर्माण केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तुमचा गैरफायदा घेते, तुमच्या चांगुलपणाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करते किंवा तुमच्या स्वाभिमानावर आघात करते, तेव्हा योग्य मर्यादा आखणे आवश्यक असते.
बायबल आपल्याला सांगते की “परमेश्वराचे भय बाळगा, माणसांचे नाही.” अनेक वेळा आपण लोकांच्या मतांना, टीकेला किंवा विरोधाला घाबरतो. त्यामुळे आपण सत्य बोलत नाही, योग्य गोष्टीसाठी उभे राहत नाही आणि अन्याय सहन करत राहतो. परंतु ख्रिस्ती व्यक्तीची भीती केवळ देवाप्रती असावी. जेव्हा देव आपल्याबरोबर आहे, तेव्हा मानवी विरोधापुढे घाबरण्याचे कारण राहत नाही.
याचा अर्थ असा नाही की आपण सूड घ्यावा किंवा द्वेष बाळगावा. बायबलचा मार्ग वेगळा आहे. आपली बाजू देवाकडे सोपवायची, पण अन्यायाला मान्यता द्यायची नाही. शांतपणे, शहाणपणाने आणि धैर्याने योग्य भूमिका घ्यायची.
स्तोत्रा मध्ये वारंवार दिसते की दावीदने आपल्या शत्रूंचा सूड स्वतः घेतला नाही; त्याने आपली लढाई देवाकडे सोपवली. त्याचा विश्वास होता की योग्य वेळी देव न्याय करील. म्हणूनच तो संकटातही खचला नाही.
लक्षात ठेवा. चांगले राहा, पण भोळे बनू नका.
प्रेम करा, पण विवेकही वापरा. अन्यायाला शांतपणे पण ठामपणे विरोध करा. गप्प राहणे नेहमीच नम्रता नसते. लोकांच्या मतांपेक्षा देवाच्या इच्छेला महत्त्व द्या. आपल्या मर्यादा निश्चित करा. वारंवार गैरफायदा घेणाऱ्यांना योग्य अंतरावर ठेवा. सूड घेऊ नका; न्याय देवावर सोपवा.
ख्रिस्ती जीवन म्हणजे सर्व काही सहन करत राहणे नाही. ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रेम, सत्य, धैर्य आणि विश्वास यांचा समतोल आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून कोणी तुमचा अपमान करावा, तुमचा उपयोग करावा किंवा तुमच्यावर अन्याय करावा, अशी देवाची इच्छा नाही.
लक्षात ठेवा, “लोकांना नाही, तर परमेश्वराला घाबरा. अन्यायापुढे झुकू नका. आपली लढाई देवावर सोपवा. कारण जो देवावर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी देव स्वतः उभा राहतो.”
“चांगुलपणा म्हणजे कमकुवतपणा नाही; देवावर विश्वास ठेवून सत्यासाठी उभे राहणे हेच खरे सामर्थ्य आहे.”
✍️आशिष शिंदे
अल्फा ओमेगा