Vishwa Mandir Parishad

Vishwa Mandir Parishad संस्कृति : मंदिराश्रिता |

संकल्पना आणि उद्दिष्टे
संकल्पना :- पवित्र भारतभूमी मंदिरे, देऊळे - राऊळे यांचे आगर आहे. श्रद्धा, भक्ती आणि आस्तिकभाव भारतीयांच्या उज्वल जीवनप्रणालीचा आत्मा आहे. सनातन वैदिक संस्कृतिचा पवित्र, सशक्त गंगौध हजारो वर्षे निरंतर प्रवाहित आहे, त्यात मंदिरे, देवस्थाने आणि तीर्थक्षेत्रांचा मोलाचा वाटा आहे. यामुळेच हजारो वर्षे वारंवार होणाऱ्या आक्रमणानंतरही भारतीय संस्कृती टिकून आहे. खेड्या-पाड्यातील लहान

मोठया मंदिरांचे तेथील इतिहास, संस्कृती, पौरूष, पराक्रमाशी अतूट नाते आहे. सद्यस्थितित बहुतेक मंदिरे उदात्त शौर्याची प्रेरणादायी गाथा सांगत उभी आहेत. मंदिरे – धर्म, संस्कृति, समाज, इतिहास, परंपरा, आदर्श, संस्कार, नीतिमत्ता, शाश्वत जीवनमूल्ये यांचे प्रत्यक्ष वस्तुपाठ देणारी शक्तिपीठे आहेत. वैदिक धर्माच्या तात्विक छत्रछायेखाली प्रशस्त आणि भक्कम पायावर विचारांचे अभिसरण करणारी ज्ञान, विज्ञान, शिक्षण, संस्कार, मनोरंजन आणि अनुभूती यांचा अक्षय ठेवा मुक्तपणे सर्वांपर्यंत पोहोचवणारी मंदिरे हि संस्कारालयेच होती. समाजाच्या सर्वस्तरातील घटकांना नि:संकोचपणे समाविष्ट करून घेऊन त्यांना कार्यप्रवण करणारी आणि समाज जीवनाचे संतुलन राखणारी एक निकोप व्यवस्था या मठ-मंदिरातून दीर्घ-काळपर्यंत सुव्यवस्थितपणे जतन केलेली होती. निसर्ग, समाज, संस्कृती, शिक्षण, उत्सव, पर्यावरण, इ. घटकांची नाळ सर्वांशी जोडणारी, त्यांना आधार देणारी आणि सामावून घेणारी निसर्गस्नेही व्यवस्था मंदिर व्यवस्थापनात यशस्वीरीत्या कार्यरत होती. पूर्वी सामान्यत: लहान गावात एक प्रमुख मंदिर, मंदिराजवळ धर्मशाळा आणि अतिथीसेवा याद्वारा तीर्थयात्रा करणाऱ्या यात्रेकरूंची, आरोग्यसंपन्न व्यवस्था मंदिरांच्या सहकार्याने राबवली जात होती. विविध धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ, उत्सव, मंदिरात मोठ्या थाटात साजरे केले जात असत. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वजनिक, अशा सर्वप्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनांचे स्थान मंदिर असे. मंदिरे म्हणजे व्यष्टि आणि समष्टी म्हणजे व्यक्ति आणि समाज यांना जोडणारी प्राचिन व्यवस्था होती. यज्ञमंडप, यज्ञशाळा, गोशाळा, देवराई, नक्षत्र वने, धन्वंतरी वाटिका अशा सुसंपन्न वैविध्याने मंदिरे सज्ज असत. मंदिरे पांथस्थांचे विश्रांतीस्थान, भाविकांचे श्रद्धास्थान, कलाकारांचे स्फूर्तिस्थान आणि विद्वान-पंडित-याज्ञिकांचे आश्रयस्थान असत. मंदिरे समृद्ध संस्थाने होती, ज्ञानदान करणारी ज्ञानपीठे होती. समाजाला सुदृढ बंधनाने जोडून ठेवणारी कार्यालये होती, समाजाचा श्वास होती, स्वायत्त मंदिरे समाजाचे हृदय होती.
काळाच्या ओघात भारतीय संस्कृती बरोबरच या देवस्थानांवर किंवा मंदिरावर चहूबाजूंनी, आतून – बाहेरुन, बौद्धिक – कौटुंबिक - सामाजिक पातळीवर नृशंस आक्रमणे झाली आणि समाजमनाला निकोप आणि उमदे राखणारी ही समाजहृदय असलेली मंदिरे दुर्बल झाली, विपन्नावस्थेला प्राप्त झाली, समाज जीवनापासून अलग झाली. त्यामुळे समाज निष्क्रिय – निद्रावश झाला. मंदिराच्या निष्प्राण वास्तु कशाबशा तग धरुन राहिल्या. धर्मशाळा नष्ट झाल्या. सेवाभाव संपुष्टात आला आणि भौतिकवादाच्या थैमानात मंदिरव्यवस्था लयाला गेली. तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधणारी, एकमेकांना आधार देणारी व्यवस्था नष्ट झाली. हिंदू देवस्थाने एकाकी पडली. शिखांच्या गुरुद्वारांच्या व्यवस्थापनासाठी शिरोमणी प्रबंधक समिती तर मशिदींच्या व्यवस्थापनासाठी वक्फ बोर्ड आहे. जैन, ख्रिश्चन, इत्यादिंच्या, प्रांतिय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या संघटना आहेत. फक्त हिंदुदेवस्थानेच असंघटीत आहेत. विविध संघटनांच्या मार्फत थोडा प्रयत्न होताना दिसतो परंतू त्याचा प्रभाव पडत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. परस्परांना मदत करून, व्यापक हिताच्या दृष्टीने एकत्र येऊन, सरकार दरबारी किंवा समाजामध्ये आपली बाजू मांडण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
भारतातील व भारताबाहेरील हिंदू मंदिरे परस्परांशी सौहार्दाने संलग्न झाली पाहिजेत. परस्परात सुसंवाद साधला पाहिजे, त्यांच्यात एक समान भूमिका व सूत्र जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या उद्देश पूर्ततेसाठी अखिल भारतीय देवस्थान समितीची स्थापना करण्यात येत आहे. संपूर्ण विश्वासाठी हा काळ संक्रमणाचा आहे. हिंदु मन आणि समाज हजारो वर्षांची मरगळ टाकून पुन्हा चैतन्याच्या शोधात जागृत होत आहे. या शुभ समयी प.पू. शंकराचार्य, अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ, विविध मंदिरांचे विश्वस्त, निवृत्त उच्च अधिकारी, इ. अनेक व्यक्तीनी एकत्र येवून अखिल भारतीय देवस्थान समितीची स्थापना केली आहे.

उद्दिष्टे :- भारतीय मंदिराचे एकत्रीकरण, सुसूत्रीकरण, एकमेकांना सहकार्य, तसेच मंदिरांना समाजाच्या सर्व घटकांबरोबर जोडणे आणि तरूणाईचे प्रबोधन, हा अखिल भारतीय देवस्थान समितीचा व्यापक उद्देश आहे. यासाठी सर्व प्रकारच्या उपलब्ध संसाधनांचा विशेषत: संपर्क साधने आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग हे समितीच्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. समितीच्या कार्याची व्याप्ती आणि उद्दीष्टे ढोबळमानाने खालील प्रमाणे आहेत.
१. मंदिरांचे संघटन : सर्व मंदिरांची माहिती एकत्र करून त्यांच्या मध्ये समन्वय निर्माण करणे. प्रान्त, जिल्हा, तालुका असे वर्गीकरण करणे. प्रत्येक मंदिराचा इतिहास, परिसर, वैशिष्ट्ये, सद्यस्थिती, सुविधा, दैनंदिन कार्यक्रम, उत्सव, पूजा - आर्चा इ. सर्व माहिती संकलित करणे. त्यांच्या पुस्तिका, माहितीपत्रके बनविणे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे. इ.
२. मंदिरांना सल्ला सेवा केंद्र : मंदिरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देणे. उदा. कायदेशीर व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सल्ला, अडचणी सोडवण्यासाठी मदत, तांत्रिक सहाय्य इ.
३. ई - मंदिर : प्रत्येक मंदिराची माहिती वेबसाईट वर उपलब्ध करून देणे. माहितीपत्रक बनविणे, त्यांची वेबसाईट बनविणे, त्यांना "ऑनलाईन" पूजा, अभिषेक, अनुष्ठाने, वार्षिक सेवा, शाश्वत सेवा इ. उपलब्ध करून देणे, मंदिरांची परिपूर्ण व्हिडीओ डॉक्युमेंटरी बनविणे. ती सर्वांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे. ऑनलाईन दर्शन (व्हर्च्युअल दर्शन) व उत्सवांचे प्रक्षेपण करणे इ. मुळे मंदिरांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल. भौगोलिक सीमा ओलांडून मंदिरे भाविक भक्तांबरोबर जोडली जातील.
४. आर्थिक सहाय्य : मंदिरांच्या विविध उपक्रमांसाठी आणि प्रकल्पांसाठी सहाय्य मिळवून देणे. उदा. जीर्णोद्धार, भक्त निवास, सभामंडप, अन्नछत्र, वाचनालय, इ.
५. भावबंधन : प्रत्येक मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची नोंदणी करणारी व्यवस्था निर्माण करणे, भक्तांना मंदिराच्या विविध उपक्रमांची आणि उत्सवाची माहिती मोबाईल, ईमेल, व्हॉट्स अॅ्प इ. माध्यमातून कळविणे. मंदिर आणि भाविक यांच्यात कायमस्वरूपी संपर्क निर्माण करणे, इ.
६. मंदिर पर्यटन : मंदिरांची माहिती तंत्रज्ञानाच्या आणि इतर माध्यमातून देशात आणि जगभारामध्ये पोहोचवणे. तेथील विविध परंपरा, उत्सव, उपक्रम यांची माहिती पोहोचवणे. त्यातून मंदिर पर्यटन, मंदिर अभ्यास पर्यटन ( टेंपल टुरिझम) विकसित करणे.
७. सेवा प्रशिक्षण : मंदिरातील पुजारी, इतर कर्मचारी, विश्वस्त यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणे, कार्यशाळा आयोजित करणे, नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी सहाय्य करणे, यामध्ये संगणक, फोटोग्राफी, व्हिडीओ, कायदेविषयक, अकाऊंटींग, आयकर इ. गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणे.
८. मंदिर : एक संशोधन केंद्र : सनातन संस्कृती, मंदिर आणि प्राचीन भारतीय ज्ञानविज्ञान, हिंदू धर्म, संस्कृती याविषयी विविध प्रकारचे अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ई- लर्निंगच्या माध्यमातून सर्व भक्तांपर्यंत पोहोचवणे. प्राचीन भारतीय परंपरा, संस्कृती, रुढी , परंपरा यांचा अर्थ आजच्या काळाशी समर्पक समन्वय साधून तरुण पिढी पर्यंत पोहोचवणे. हिंदू देवस्थाने, मंदिरे, परंपरा, संस्कृती, यांसंबधी संशोधन करणे. अभ्यास, संशोधन आणि प्रयोग यांच्या माध्यमातून मंदिर संस्कृती पुनर्जीवित करणे.
९. “ टोल फ्री ” मंदिरे :- भाविक भक्तांसाठी मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे, याठिकाणी कसे जावे, तेथील उपक्रम, उपलब्ध व्यवस्था, इ. सर्व प्रकारची माहिती आणि सहाय्य उपलब्ध करून देणारी " टोल फ्री " हेल्प लाईन सेवा सुरू करणे.
१०. परंपरांचे पुनरूज्जीवन :- हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्याशी निगडित विविध उपक्रमांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुनरूज्जीवन करणे, उदा. कीर्तन, प्रवचन, नृत्य, खेळ, जन्मोत्सव, संगीत, नाटक, परंपरा, इत्यादिना तरूणाईबरोबर " कनेक्ट " करणे.
११. परदेशातील मंदिरांबरोबर समन्वय :- परदेशातील मंदिरांशी संपर्क करणे. त्यांचे सहाय्य घेणे आणि त्यांना सहाय्य करणे.त्यांचे बरोबर भेटी / सहली अयोजित करणे. त्यांना नवनवीन उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या विश्वस्तांच्या प्रस्थापित मंदिरांशी भेटी आणि विश्वस्तांबरोबर चर्चा घडवून आणणे, इत्यादी.
१२. मंदिर संरक्षक :- ज्या ठिकाणी मंदिरांना त्रास होत आहे, विघातक शक्तींपासून, गुंडगिरीपासून उपद्रव होत आहे, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणे, त्याच्या पाठीमागे दबावगट आणि हिंतचिंतकांचे जाळे उभे करणे. मंदिर संरक्षक तयार करणे,त्यांना प्राशिक्षण देणे, कायद्याची माहिती देणे, इत्यादी.
अखिल भारतीय देवस्थान समिती -
• भारतीय मंदिरांची एक शिखर संस्था असेल.
• मंदिरांच्या दैनंदिन आणि स्थानिक कामकाजामध्ये कोणतीही ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करणार नाही.
• मंदिरे आणि भाविक यांना एकत्र आणणारी एक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ यासाठी सहाय्य करेल.

संस्कृती मंदिराच्या आश्रयाने राहते.
अखिल भारतीय देवस्थान समितीचे बोधवाक्य ‘ संस्कृति : मंदिराश्रिता ’ हेच आहे.

रचना : अखिल भारतीय देवस्थान समितीची रचना त्रिस्तरीय आहे.
१. मार्गदर्शक आणि सल्लागार मंडळ
२. अ) देवस्थान सभासद ब) वैयक्तिक सभासद
३. कार्यकारी मंडळ आणि विविध समित्या

विनम्र आवाहन :
अखिल भारतीय देवस्थान समिती ही काळाची गरज आहे. अधिकाधिक मंदिरे, संस्था व व्यक्ती यांनी याकार्यात तनमनधन पूर्वक सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत. अधिक माहितीसाठी कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
तसेच सर्व माहिती आणि अर्ज www.devasthansamiti.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

📍त्वरित पाहिजे - We are Hiringविश्व मंदिर परिषदेसाठी महाराष्ट्रातील मंदिरांसंबंधित प्रकल्पासाठी 👉प्रकल्प समन्वयक ( पुणे ...
20/06/2026

📍त्वरित पाहिजे - We are Hiring

विश्व मंदिर परिषदेसाठी महाराष्ट्रातील मंदिरांसंबंधित प्रकल्पासाठी

👉प्रकल्प समन्वयक ( पुणे निवासी )
▪️ जागा : एक (पुरुष/महिला)
▪️ वय : 30 ते 40 वर्षेपर्यंत
▪️ उत्तम मानधन : रु. 25 ते 30 हजार प्रती महिना
▪️ पात्रता : किमान पदवीधर व कोणत्याही क्षेत्रातील चार वर्षे अनुभव आवश्यक, स्वतःचे वाहन आवश्यक
▪️ आवश्यक कौशल्ये : आत्मविश्वासपूर्ण, उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम संवाद कौशल्ये, संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया ज्ञान आवश्यक
----------------------
अर्ज करण्यापूर्वी कृपया वेबसाईटला भेट द्यावी आणि परिषदेचे कार्य समजून घ्यावे www.vishwamandirparishad.org

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या : https://bit.ly/vmpbhishmahiring

👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै, 2026

👉 मुलाखत: शनिवार, 18 जुलै, 2026

📍अधिक माहितीसाठी : विश्व मंदिर परिषद
कार्यालय : 622, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युट जवळ, डीसीसी लॅपटॉप मॉलच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे - 411004

पवित्र भारतभूमी मंदिरे, देऊळे - राऊळे यांचे आगर आहे. श्रद्धा, भक्ती आणि आस्तिकभाव भारतीयांच्या उज्वल जीवनप्रणाली.....

Address

Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Mandir Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vishwa Mandir Parishad:

Shortcuts

Share

Category