13/09/2025
#ज्ञानेश्वरी_जयंती
#शांततेचा_शब्दशृंगार
#मयूर_भावे
कैवल्यनिधान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या मुखातून शब्दरूपात प्रकट झालेल्या निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाची आज जयंती! ७५० श्लोकांच्या भगवद्गगीतेवर माउलींनी केलेली जवळपास ९ हजार ओव्यांची 'टीका' म्हणजे भावार्थदीपिका.... असं लहानपणी कुठे तरी रिकाम्या जागा भरण्यासाठी आलेलं वाक्य, पण पुढे हाच ग्रंथ तेच लाखो जिवांच्या आयुष्यातील नानविध 'रिकाम्या जागा' सहजपणे भरत जातो त्या क्षणी पुन्हा कडकडून भेटतं... हे कळतं तेव्हा मात्र 'ती' जागा भरली गेलेली असते.
माउलींनी 'माउली अवतारात' जे जे पाहिलं, अनुभवलं, सोसलं आणि आपल्या आत रुजवलं.. ते आजच्या काळातल्या कोणत्याही असमान्य (सामान्य नाहीच) बुद्धीच्या किंवा प्रतिभावंताच्या वाट्याला आलं असतं तर त्या दु:खातून निर्माण झालेल्या सृजनाच्या सिंचनावर वेदनेचं पीक घेऊन शब्दांची तुफान आतशबाजी करत भारंभार शोकांतिका लिहिल्या असत्या किंवा विद्रोहाची फोडणी देऊन वास्तवावादी लिखाणाच्या जाहिराती करत आपल्या दु:खाचे सुखकारक सोहळे केले असते. अनुभवकथनाचे 'पॉडकास्ट' आणि 'प्रतिभाविष्काराची प्रक्रिया' उलगडून दाखवणाऱ्या मुलाखतींचे ढिग लागले असते. मात्र, 'असामान्य' शब्दानेही 'असामान्य'रीत्या अंग चोरून बाजूला व्हावं अशी कलाकृती घडवणारा हा 'शब्दप्रभू' शांत होता! त्यामुळे 'ज्ञानेश्वरी'चा केवळ परिणाम शांतता आहे असं नाही, तर तिची प्रेरणाही शांतताच आहे!
उंबरठ्याशी आलेलं प्रसन्न, सोनेरी ऊन घरात येऊ न देणारी माणसं सूर्यावर विजय मिळवत असतात काय? रस्त्यावर पडलेला प्राजक्ताचा सुगंधी, केशरी सडा तुडवत जाणारे लोक सुगंध कैदेत ठेवू शकतात काय? धुमसता ज्वालामुखी उरात घेऊन जगणारे शांततेच्या रांगेत उभे नसतात काय? आणि एखाद्या विखारी वृत्तीच्या माणसाने विष पेरून जमिनीचा एखादा तुकडा नापीक केला, म्हणून भूमीची सृजनशीलता संपते का? असं होत नाही! माउलींनी हेच आपल्या जगण्यातून आणि शब्दांतून दाखवलं दिलं!
लौकिकातलं तथाकथित सुखदायी आयुष्य नसतानाही 'सुखिया झाला' असं म्हणणारे ज्ञानदेव कशामुळे सुखिया झाला म्हणत होते? तर, 'हा होईल दानपसावो?' असं विचारल्यावर त्याला होईल अशी गुरूंची शाश्वती मिळाल्यावर मग सुखिया झाला...
हे सगळं होताना कोणतं दान मागितलं, तर दुरितांच्या जीवनातला अंधार जावो आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांमधला वाकडेपणा सांडून जावो.... ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होवो आणि जीवांचं एकमेकांशी 'मैत्र' राहो!
भगवद्गीतेच्या श्लोकांचा जसाच्या तसा अनुवाद करून 'साधी सोपी गीता' किंवा 'प्रत्येकासाठी भगवद्गीता' असं काही तरी करण्याचा 'शॉर्टकट' न मारता माउलींनी त्या प्रत्येक श्लोकाचं साधं, सोपं, मार्मिक, चपखल दृष्टान्त आणि उपमा देत लाघवी विवेचन केलं! त्या विवेचनाने काय झालं? श्रोत्यांचं समाधान? वाचकांचं शंकानिरसन? अभ्यासकांचा वाद-प्रतिवाद? हे तर अर्थात झालं ! मात्र, याहीपेक्षा झालं त्या श्लोकाचं सार्थक!
आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही....काय करू? असं म्हणणाऱ्याना मला मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगावसं वाटतं.. ते म्हणाले होते की, 'ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे... ज्ञानेश्वरी लावायची असते...! पावसाळ्यात गुडघाभर चिखलात उभं राहून शेतकरी भाताची रोपं त्या जमिनीत लावत असतो. ते रोप जमिनीत लावल्यावर त्याला मातीतलं चैतन्य मिळतं आणि नवं सृजन घडतं! अशा प्रकारे ती आपल्या आत लावायची असते.'
मला असं वाटतं की, ती सतत वाचत राहिल्यावर आपल्यासारख्या ढेकळांनी दिलेली आर्त हाक कधी तरी त्या चैतन्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि आपल्याही 'नकळत्या' झाडाला 'कळण्याची' पालवी फुटेल...! तोवर 'आनंदाचे आवार मांडू जगा...' असा संकल्प करणारी, 'अतींद्रिये परी भोगवीन इंद्रियाकरवी' असं सामर्थ्य असलेली आणि 'वर्षला शांतरसे/तो हा ग्रंथू...' असा प्रत्यय प्रत्येकाला देणारी 'माउलीहृदय ज्ञानेश्वरी' शांततेचा शब्दशृंगार अनुभवण्यासाठी वाचत राहूया!
कृष्णार्पणमस्तु!
- मयूर भावे
१३ सप्टेंबर २०२५, पुणे
©️ मयूर अनिल भावे.