Sant Tukaram Gatha

Sant Tukaram Gatha तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास |
अहं?

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी आणो !
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी आणो !

इतिहासाचार्य श्री वा.सी.बेंद्रे यांचे दुर्मिळ ग्रंथ,'संत तुकाराम महाराजांची गुरूपंरपरा' आणि 'संत तुकाराम महाराज यांचे सं...
18/04/2024

इतिहासाचार्य श्री वा.सी.बेंद्रे यांचे दुर्मिळ ग्रंथ,
'संत तुकाराम महाराजांची गुरूपंरपरा' आणि 'संत तुकाराम महाराज यांचे संतसांगाती'

वारकरी संस्था,धार्मिक संस्था,आस्थापने, ग्रंथालये ,शाळा यांना खास सवलतीच्या दरात उपलब्ध.

#मराठीदेशा_फाउंडेशन

टाळी वाजवावी गुढी उभारावी |वाट हे चालावी पंढरीची ||खट नट यावें शुद्ध होउनी जावें ।दवंडी पिटी भावें चोखामेळा ||🙏🏻संत चोखा...
22/03/2023

टाळी वाजवावी गुढी उभारावी |
वाट हे चालावी पंढरीची ||
खट नट यावें शुद्ध होउनी जावें ।
दवंडी पिटी भावें चोखामेळा ||

🙏🏻संत चोखामेळा

बा तुकोबा मागणें ते एक तुज | देई विचारोनि मज ||१||नको दुर्जनांचा संग | क्षणाक्षणां चित्त भंग ||२||जन्म घेईन मी नाना | बह...
31/07/2022

बा तुकोबा

मागणें ते एक तुज |
देई विचारोनि मज ||१||

नको दुर्जनांचा संग |
क्षणाक्षणां चित्त भंग ||२||

जन्म घेईन मी नाना |
बहु सोसीन यातना ||३||

रंक होईन दीनांचा |
घायें देहपात साचा ||४||

तुका म्हणे हेंचि आतां |
देईं देईं तू सर्वथा ||५||

"हे परमेश्वरा ! मी अतिशय नम्रपणे तुझ्याकडे एक मागणं मागत आहे. तू त्याचा पुर्णपणे विचार कर अन् मगच माझी मागणी मान्य कर."
मी तुझा भक्त आहे, मी तुझी नित्यनेमाने पुजा करतो, तुझी स्तुती करतो. यामुळे तु माझी इच्छा पुर्ण करू नकोस.
कारण, हे पांडुरंगा! मी जे काही तुझ्यापाशी मागणार आहे. ते जर योग्य असेल अन् सद्सदविवेक बुध्दीला पटणारे असेल तर माझ्या त्या मागणीचा विचार कर.'
उगाचच भावनेच्या भरात येऊन माझ्या म्हणण्याचा स्वीकार नकोस अन् टाळू ही नकोस.
'हे विठ्ठला! मायबापा, मी ही भावनेच्या आहारी जाऊन तुला उगाचच काही मागत नाही. मी जे मागत आहे ते माझ्या आयुष्यात आलेल्या चांगल्या - वाईट अनुभवावरून मांडत आहे.'

अतिशय विचारपूर्वक अन् तळमळीने मी बोलत आहे. मला खात्री आहे की, माझं जे म्हणणं आहे ते तुझ्याशिवाय कोणीच पुर्ण नाही करू शकत.'

मी जी इतक्या वेळ अतिशय कळकळीने मागणी करत आहे ती अशी की, "मला कुठल्याही वाईट लोकांची संगत देऊ नको. कारण अशांच्या संगतीने मन विचलित होते रे !"

ही दुर्गुणी माणसं कधी काय करतील याचा नेम नाही. आज गोड बोलतील अन् कधी अडचणीत आणतील हे सांगता येत नाही.
क्षणाक्षणाला शब्द फिरवणारी ही लोकं आहेत रे! स्वतः स्वार्थासाठी बिनधास्तपणे अगदी जवळच्या माणसाला देखील मरणाच्या दारात लोटायला देखील हे मागेपुढे पाहणार नाहीत. इतक्या तर नीच वृत्तीची आहेत हे!

"अशा लोकांचा सहवास म्हणजे क्षणा - क्षणाला मरणच आहे."

"चांगल्या माणसांच्या सहवासात राहण्यासाठी कितीही कष्ट झाले तरी चालतील. पण त्यांच्याच सहवासात राहाण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन."

"तसेच या संत - सज्जनांचा सहवास मिळावा यासाठी कित्येकदा जन्म सुध्दा घेईन."

" गोर - गरिबांच्या, दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी मी माझं सारं आयुष्य घालवीन. समाजातील उपेक्षितांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या लढ्यात मला मरण जरी आलं तरी ते आनंदाने पत्करेन."

" हे परमेश्वरा, मला धन संपत्ती, पद प्रतिष्ठा असलं काही काही नको रे! माझं मागणं एवढंच आहे की मला फक्त संत सज्जनांचा सहवास लाभू दे."

वाईटांच्या सोबतीला राहून जी अपराधीपणाची भावना असते त्याचा लवलेशही संतांच्या संगतीत होत नाही.
चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.

नालायक लोकांच्या संगतीने अधोगती होते, तर चांगल्यांची संगत प्रगतीपथावर घेऊन जाते.

राम कृष्ण हरी 🙏

राष्ट्रसंचार, पुणे

बा तुकोबा राष्ट्रसंचार, पुणेआणिकाच्या घाते |ज्यांची निवतील चित्ते ||१||तोचि ओळखावे पापी |निरयवासी शीघ्रकोपी ||२||जो कान ...
24/07/2022

बा तुकोबा

राष्ट्रसंचार, पुणे

आणिकाच्या घाते |
ज्यांची निवतील चित्ते ||१||
तोचि ओळखावे पापी |
निरयवासी शीघ्रकोपी ||२||
जो कान पसरोनी |
ऐके वदे दुष्ट वाणी ||३||
तुका म्हणे भांडा |
धीर नाही ज्याचे तोंडा ||४||

कारण काहीही असो, 'दुसऱ्याच वाईट झाल पाहिजेच', अशा प्रवृत्तीचे लोक जागोजागी आढळतात.

का कुणास ठाऊक पण शेजाऱ्याचे असो वा मित्राचे, ओळखीचा असो वा अनोळखी, कुणाचही वाईट झाल की काही जणांना बर वाटत.
दुसऱ्याच्या दु:खात ही नीच लोक समाधान मानतात.

मानवी प्रवृत्तीच अशी की, एखाद्याच्या लेकराला चांगले मार्क्स मिळाले किंवा चांगली नोकरी लागली, तर चार चांगले शब्द कधीच बोलणार नाहीत. उलट म्हणतील, ' त्याचा बाप, त्याच शाळेत कामाला आहे. काॅप्या पुरवल्या म्हणून तर एवढे चांगले मार्क्स मिळाले.'
नोकरी लागली तर म्हणतील, ' लाच देऊन किंवा वशिल्याने नोकरी मिळवली.'
कुणाच्याच चांगल्या कामाच कोडकौतुक ही मंडळी करणार नाहीत. मात्र अशा कुजक्या मनोवृत्तीची माणसं इतरांना दुषणं देण्यातच धन्यता मानतील.

तुकोबांनी पापी माणूस ओळखण्याची एक खूण सांगितली आहे.
ती म्हणजे ज्याच्या तोंडावर नेहमी बारा वाजलेले आहेत. आपलं असो वा परक, ओळखीचं असो वा अनोळखी दिसेल त्याच्यावर चिडणे, हा ज्याचा स्थायीभाव आहे. तो म्हणजे पापी.
अगदी शुल्लक कारणावरून चिडचिड करणारा.
थोडं काही मनाविरुध्द घडलं की अंगाचा तिळपापड करून घेणारा, हा व्यक्ती म्हणजे पापी.

एखादी साधी गोष्ट जरी हा कुणाला सांगत असला की, जणू काय भांडणं करतोय अशा आवेशात आरडाओरडा करून सारा गाव गोळा करायची याची प्रवृत्ती असते.

याला ना कुत्र भुकलेल सहन होत नाही, ना दारात एखादं जनावरं खाण्यापिण्याच्या अपेक्षेने आलेलं सहन होत नाही. त्या मुक्या जीवांच्याही अंगावर दगड घेऊन मागं लागतो. तो पापी.

समोर विषय काय सुरू आहे, कोण काय बोलतेय याचा सारासार विचार न करता थेट समोरच्या वर आगपाखड करायची. आदळाआपट करायची. मागचा पुढचा विचार न करता तोंडाला येईल ते बोलायचं. अशी जमदग्नी वृत्तीचे लोकं म्हणजेच महापापी.

कुठ काही वाईट घडलं किंवा काही कुजबूज सुरू झाली की कान टवकारून ऐकण्याची काही जणांना वाईट खोडच असते.

चांगल काही ऐकणार नाहीत, पण कुठं काही खुट्ट वाजलं की यांचे कान तिकडे गेलेच म्हणून समजाच.

गावात कुणाच काही वाईट झालं किंवा एखादी दुर्घटना घडलीच तर हा माणूस तिथे जाणार.
कोण काय बोलतेय हे कान‌ टवकारून ऐकणार अन् एकाचे चार करून आख्या गावभर बोंब मारणार.

तुकाराम महाराज म्हणतात की, ' ज्याला दुसऱ्याचे बरं काही बघवतच नाही, ज्याचे कान नेहमी वाईटच ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. असा माणूस नेहमीच भांडण उकरून काढण्यासाठी तयार असतो. या माणसाचे तोंड कधी बंद नसतेच. तोंडातून बाहेर पडणारा हा शब्द हा भांडणं निर्माण करणाराचा असतो.'
असा भांडकुदळ माणूस माणसात माणूस ठेवत नाही.

राम कृष्ण हरी 🙏

बा तुकोबा ❤️राष्ट्रसंचार, पुणे.वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण |चिरगुटे घालून वायथला ||१||तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी |ज...
17/07/2022

बा तुकोबा ❤️
राष्ट्रसंचार, पुणे.

वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण |
चिरगुटे घालून वायथला ||१||

तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी |
ज्ञान पोटासाटीं विकूनियां ||२||

बोलायचीच कढी बोलाचाचि भात |
जेवुनियां तृप्त कोण झाला ||३||

कागदी लिहता लिहतां नामाची साकर |
चाटितां मधुर गोडी नेदी ||४||

तुका म्हणे जळो जळो ते महंती |
लाज नाहीं चित्तीं निसुगाला ||५||

लग्न होऊन अनेक वर्ष उलटून गेली पण एका बाईला काही मुल होत नव्हतं. बरोबरीच्या सगळ्यांना मुलं झाली. परंतु हिची कुस काही उजवत नव्हती. जो तो हिला वांझ म्हणून हिणवत असे.
सगळ्या गावभर हिच्या वांझपणाची चर्चा होती.
हे सगळं तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेलं.
तेव्हा तिने, पोटाला चिरगुटं गुंडाळून, 'मला दिवस गेले आहेत. मी गर्भवती आहे, मी गर्भवती आहे.' म्हणत साऱ्या गावभर बोभाटा सुध्दा केला.

पण तिला चांगलच ठाउक होतं की, 'असली ढोंगं करून मुल काही होणार नाही.'

पोकळ आश्वासनं अन् कोरडे बोल बोलणाऱ्याच ही असंच असतं.

काही जण आपल्या भाषणबाजीच्या जोरावर समोरच्या माणसाला भुलवून लुबाडणूक करतात.
तर काही जण विद्वत्तेचे अवडंबर माजवून भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात.
आपल्या शब्द चातुर्याच्या कौशल्याने अनेकांची संपत्ती हडप करतात. प्रसंगी महिलांशी गैरवर्तन सुध्दा करतात.

थोडक्यात काय तर, फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा बाजार मांडला तर त्याचे ज्ञान समाजाच्या दृष्टीने वांझच ठरते.

समजा एखादा माणूस भुकेनं व्याकुळ झाला आहे आणि त्याच्या समोर कढी-भात इत्यादी अन्न पदार्थांचे फक्त चविष्ट वर्णन करत राहिलो तर नुसत्या वर्णनाने त्या माणसाचे पोट भरणार नाही.
त्याची भूक भागविण्यासाठी प्रत्यक्ष त्याला खायलाच दिले पाहिजे.
समजा एका कागदाच्या चिटोरीवर 'साखर' असा शब्द लिहिला अन् ती चिटोरी चाटली तर थोडीच गोड लागणार आहे. त्या साठी प्रत्यक्ष साखरच खावी लागेल.

शेवटच्या दोन चरणावरून एक गोष्ट आठवली ती अशी...

अत्यंत हालाखीच्या परिस्थितला कंटाळून एकजण समुद्रात जीव द्यायला जातो. तेव्हा समुद्राला त्या माणसाची दया येते आणि समुद्र त्याला एक शंख देतो. अन् सांगतो की, "या शंखाला तू जे काही मागशील ते तुला देईल."

तो व्यक्ती खूश होऊन घरी येतो. अन् शंखाला एक लाख रूपये मागतो. आणि काय आश्चर्य! त्याला एका क्षणात लाखभर रूपये मिळतात.
या शंखामुळे त्याची परिस्थिती झपाट्याने बदलली.
असेच एके दिवशी त्याचा शेजारी त्याच्या घरी येतो. त्याच्याशी गोड बोलून रहस्य जाणून घेतो. त्याचवेळी तो शेजारी ठरवतो की, ' काहीही करायचं अन् हा शंख चोरायचा.'
त्याच रात्री तो शंख चोरतो अन् त्याठिकाणी नकली शंख आणून ठेवतो.

दुसऱ्या दिवशी शंखाला पैसे मागायला गेल्यावर त्या माणसाच्या लक्षात आलं की आपला शंख चोरीला गेला आहे.

पुन्हा तो निराश होऊन समुद्राकडे जीव द्यायला जातो. परत एकदा तो समुद्र त्याच्या मदतीला धावून‌ येतो.
समुद्राला झालेला सगळा प्रकार माहीत झालेला असतो.

समुद्राने त्या माणसाला आणखीन एक शंख देतो अन् सांगतो की, "हा फक्त शंख फक्त बोलतो काम काहीच करत नाही. तू घरी गेल्यावर शेजाऱ्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने या शंखाला पैसे माग, अन् बघ पुन्हा मज्जा."
घरी आल्यावर मोठ्या आवाजात शंखाला विनंती करतो की, 'मला दहा लाख रुपये दे.'
त्यावर तो शंख म्हणतो, 'दहा काय मागतोस वीस लाख घे.'

हे सगळं शेजारी ऐकतो. 'दुप्पट पैसे देणारा शंख आहे,' असं समजून तो चोरतो अन् त्या जागी पहिला शंख आणून ठेवतो.

आता ह्या दुसऱ्या शंखाला दहा लाख मागितले की वीस लाख देतो म्हणायचा अन् वीस लाख दे म्हटलं की म्हणायचा वीस काय घेतोस चाळीस लाख घे. पण देत तर काहीच नव्हता.

खायला भाजी-भाकरी दे असं म्हणलं तर तो शंख पंचपक्वकान घे म्हणायचा. राहण्यासाठी किमान झोपडी दे म्हणलं तर बंगला देतो म्हणतो. अन् देत तर काडी सुध्दा नव्हता.
थोडक्यात काय तर बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात.

तुकोबा म्हणतात की,
'नुसत्याच ज्ञानाच्या गोष्टी सांगून समाजात बघा मी किती मोठा आहे? असा दिखाऊपणा करणाऱ्यांच्या मोठेपणाला आग लागो. अशा ढोंगी माणसाची कितीही फजिती केली किंवा चारचौघात अपमान केला तरी कधीच हे सुधारणा नाहीत. तसेच यांना त्याची लाज देखील वाटणार नाही.

राम कृष्ण हरी...

05/06/2021

" संकटाच्या उरावर उभा राहण्याची धमक असली पाहिजे. "

कुंभाराचा किसन्या, आपल्या एका गाढवाला लक्ष्मी मानायचा.
लहानपणीच किसन्याचे आई-बाप वारले. त्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार होतं ना कुणी आधार द्यायला.
कुंभाराच्या आळीला एक लहानस खोपट होतं त्यात तो राहायचा.

गावातल्या लोकांची छोटी-मोठी कामं करायचा त्याबदल्यात त्याला भाकर तुकडा मिळायचा.

कधी कुणाच्या घरी पाणी भरायचा तर कधी कुणाच्या गोठ्यातील झाडलोट करायचा.

असंच एकदा त्याला एका भाजी व्यापाऱ्याने मेथीच्या पेंढ्याचे गाठोडे बाजारात नेऊन ठेवायला सांगितले. अन् बजावलं की, ' मी येई पर्यंत गाठोड्याकडे लक्ष दे.'
हे बिच्चारं भाजीचं गाठोडं बाजारात ठेवून त्या व्यापाऱ्याची वाट बघत बसलं.
एवढ्यात एक उपाशी गाढवाचं गोंडस शिंगरू भाजी खाण्याच्या अपेक्षानं गाठोड्याच्या दिशेने जोरात आलं. तेवढ्याच जोरात किसन्यानं त्याच्या तोंडावर लाकडाचा फटका मारला. तसं ते वेदनेने विव्हळत लांब गेलं. इकडं तिकडं फिरल पण काही खायला मिळाल नाही. म्हणून पुन्हा वापस किसन्या जिथं थांबला होता तिथं आलं. त्या गाठोड्याकडं आशाळभूत नजरेनं बघायला लागलं.

आता ते शिंगरू केविलवाण्या नजरनं कधी किसन्याकड बघायचं तर कधी गाठोड्याकड.

किसन्याला त्याची दया आली इकडं तिकडं बघत हळूच गाठोड्यातून एक मेथीची पेंढी काढली अन् त्या गाढवाच्या शिंगराला टाकली.
त्या शिंगराने पेंढी तोंडात घातली अन् चपळाईने निघूनही गेलं.

इकडं तोपर्यंत व्यापारी आला किसन्याच्या हातात एक भाकरी अन् त्यावर चटणी ठेवली.

बाजाराच्या एका टोकाला असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून किसन्या भाकर खाऊ लागला. तोपर्यंत मेथीची पेंढी फस्त करून शिंगरू ही तिथं आलं होतं.

भाकरी खाल्यावर किसन्या उठून आपल्या खोपटाकडं जाऊ लागला तेव्हा ते शिंगरू ही त्याच्या मागं मागं चालू लागलं. किसन्यानं त्याला दोन चारदा दगड मारून हाकलून लावण्याचा प्रयत्न ही केला, पण ते काही माघारी गेलं नाही.
किसन्या त्याच्या खोपटात आला, शिंगरू खोपटाच्या बाहेर उभारलं.

पुढं पुढं तर किसन्या जिथं जाईल तिथं हे शिंगरू त्याच्या मागच जाऊ लागलं. हळूहळू दोघांना एकमेकांना लळा लागला.

शिंगरू जसं जसं मोठं होऊ लागला तसं तसं किसन्या त्याच्या कडून कामं करून घेऊ लागला. त्याच्या पाठीवरून दुकानदाराचा माल वाहू लागला, कधी शेतकऱ्यांची भाजी तर कधी कुंभाराची गाडगी वाहू लागला.

आता मात्र कामाच्या बदल्यात भाकरीच्या ऐवजी पैसे घेऊ लागला.

हळूहळू त्यानं पैसे जमा करून दुसरं गाढव विकत घेतलं.
काम वाढलं तसे पैसे वाढले.
दुसर, तिसरं करत करत १०-१५ गाढवं त्यानं विकत घेतली.
या वाहतूकीच्या जोरावर त्यानं बक्कळ पैसा जमा केला.
थोड्याच दिवसात त्यानं गावाच्या जवळच ४-५ एकर शेती घेतली. तिथंच घर बांधलं.
आता तो गाढवाच्या पाठीवरून वाहतूकी ही करत होता. त्याचबरोबर तो एक चांगला शेतकरी सुध्दा झाला होता.

गावातल्या लहानथोरासाठी असलेला 'किसन्या' आता 'किसनराव' झाला होता.

लग्न करून चांगला संसार थाटला होता.

त्याला मिळालेलं बाजारातील गाढव आता म्हातारं झालं होतं. थकलं होतं. म्हणून किसन त्याला ना काम लावत होता, ना बांधुन ठेवत होता.
ते गाढव‌ शेतात अगदी मनमोकळेपणाने चरत होतं, हुंदडत होतं.

एकदा ते गाढव आपल्याच मस्तीत चरत असताना शेतातील अर्धवट बुजलेल्या विहीरीत पडलं. अंगावर जखमा झाल्या. तरीही विहीरीतून वर येण्यासाठी धडपड करू लागलं. थोडं वर आलं की माती ढासळायची अन् परत ते खरडत खरडत खाली जायचं. वेदनेने मोठमोठ्याने ओरडायचे. पण वर येण्याची धडपड काही सोडत नव्हत.

त्याच्या ओरडण्याने किसन आणि त्याच्या घरातील माणसं पळत पळत विहिरीकडे आली. त्या सगळ्यांना बघितल्यावर गाढवानं आणखीन ओरडायला अन् विव्हळायला सुरूवात केली.

त्याच्या विव्हळण्याने किसनाच्या काळजाला घरं पडू लागली. तो सैरभैर झाला. लोकांना हाका मारू लागला. 'कुणी तरी गाढवाला बाहेर काढा ओ!' म्हणून तो छाती बडवू बडवू रडायला लागला.

विहिरीत गाढव अन् वरती किसन यांचा गोंधळ सुरू झाला.
हा सगळा गोंधळ ऐकून अवती भवतीचे १०-१५ शेतकरी व शेतमजूर पळत आले.
प्रत्येकांनी शक्कल लावली. गाढवाला काढण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. परंतु सतत ढासळणाऱ्या माती मुळे सगळे प्रयत्न वाया जात होते.

गाढव थोडं वरती यायचं अन् पुन्हा खरडत खाली पडायचं. यामुळे त्याला जखमा होत होत्या, ते ओरडत होतं.

किसनला आता काही केल्या गाढवाचे ओरडणं सहन होईना.

दिवस ही मावळत चालला होता.
काही वेळात जर गाढवाला वरती काढता आलं नाही तर रात्रभर ते गाढव तिथंच राहिलं.
त्याच्या अंगभर जखमा, त्यातून येणारं रक्त अन् रात्रीची पडणारी थंडी यामुळे अति वेदनेनं कधी मरून पडेल हे सांगता येत नव्हते.

किसन ने थोडा विचार केला अन् मनाचा हिय्या करून विहीरी भोवती जमलेल्या सगळ्यांना एकत्रीत बोलावलं अन् म्हणाला, " हे बाबांनो! मला आता ह्या गाढवाच्या वेदना सहन होत नाहीत." एक मोठा आवंढा गिळून पुढे बोलू लागला.
"काळजावर दगड ठेवून मी आता एक निर्णय घेतला आहे की, तुम्ही सगळेजण मिळून टोपल्याने विहीरीत माती टाका व त्या मातीच्या ढिगाऱ्यात गाढवाला पुरून टाका. ज्यामुळे ते रात्रभर तडफडण्याच्या ऐवजी लवकरच मरून जाईल." हे सांगताना किसन थरथरत होता. अधूनमधून रडत होता.

पण काही पर्याय नव्हता.

अंधार पडायच्या आत सगळं काम उरकायच होत म्हणून सगळ्यांनी पटापट खोऱ्या-टोपली आणली.

टोपलं-टोपलं माती विहीरीत पडू लागली.
माती अंगावर पडली की गाढव मोठ्यानं ओरडू लागलं.
हळूहळू गाढवाचं ओरडणं कमी झालं अन् काही वेळात तर एकदमच बंद झालं.
तेव्हा माती टाकणाऱ्या प्रत्येकाला वाटलं की, आता मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढव मेलं.
तेव्हा सगळ्यांनी मिळून विहीरीत बघितलं तेव्हा त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला.
कारण गाढव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं नव्हतं तर त्या ढिगाऱ्यावर उभं होतं.
कुणालाच कळेना हा चमत्कार झाला तरी कसा?
नेमकं झालं तरी काय हे बघण्यासाठी एकजणानं टोपलभर माती गाढवाच्या अंगावर टाकून बघितली. माती अंगावर पडता क्षणीच त्या गाढवानं माती झटकली अन् आपल्या पायाखाली घेतली.

तेव्हा सगळ्यांना कळलं की, 'जेव्हा जेव्हा माती या गाढवाच्या अंगावर पडत होती तेव्हा तेव्हा ते माती झटकून पाया खाली घ्यायचं अन् त्याचावर उभा राहायचं.'

माझ्या दादा आणि दिदीनों,
आयुष्यात जेव्हा-जेव्हा संकटं येतील तेव्हा ती सगळी संकटं माती सारखी झटकून टाका अन् या गाढवा सारखं त्या संकटाच्या उरावर उभा रहा.

या साठी संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग नेहमी लक्षात ठेवा...

पिटितां घणें वरि सैरा |
तया पोटीं राहे हिरा |
तैशा काय तगती गारा |
तया थोरा होऊनि ||

अस्सल हिऱ्या वरती घनाने कितीही घाव घातले तरी हिऱ्यावरती त्या आघाताचा काहीही परिणाम होत नाही.
या उलट काही वेळाने त्या लोखंडी घणालाच खाच पडली जाते.
आणि हिरा त्या पडलेल्या खाचेत (खोबणीत) सुरक्षित जाऊन बसतो.

याचाच अर्थ संकटाला संधी समजून त्यांना आपल्यासारखं अनुकूल करण्याची घेण्याची क्षमता हिऱ्या मध्ये असते.

परंतु हिऱ्यापेक्षा आकाराने कितीही मोठी असलेली गारगोटी अशा घणाच्या तडाख्याला सहन करू शकेल काय ओ? पार भुगा होऊन जाईल.

नुसतीच 'चमक' असून उपयोग नाही तर अंगात काही करण्याची 'धमक' ही असली पाहिजे.

(सदरील गाढवाची गोष्ट विप्रो चे अझीम प्रेमजी यांच्या एका लेखात वाचली होती, त्या कथेला थोडंसं विस्तारीत केलं आहे.)

"हिरा ठेविता ऐरणी"एका व्यक्तीकडे एकसारख्या वजनाचे दोन मोठमोठाले हिरे असतात. दिसायला जरी एकसारखे असले तरी एक असली अन् नकल...
31/05/2021

"हिरा ठेविता ऐरणी"

एका व्यक्तीकडे एकसारख्या वजनाचे दोन मोठमोठाले हिरे असतात. दिसायला जरी एकसारखे असले तरी एक असली अन् नकली हिरा असतो. हा व्यक्ती देशोदेशी फिरून असली अन् नकली हिरा ओळखण्याचे आव्हान तिथल्या राजाला, त्या राजाच्या दरबारातील सर्व मंत्र्यांना, विद्वानांना, तसेच आख्या जनतेला देत असायचा.
तो म्हणायचा की, ' जर कोणी या दोन्ही हिऱ्यातील खरा हिरा कोणता आहे? हे जर बरोबर ओळखलं तर त्याला तो हिरा अन् सोबत आजपर्यंत या पैजेतून जिंकलेली अर्धी रक्कम देणार. पण जर नाही ओळखता आलं तर त्या राजानं मला खऱ्या हिऱ्याच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम द्यायची.'

जवळपास अर्ध-एक जग फिरून ही आजपर्यंत कोणालाही खरा कोणता अन् खोटा हिरा कोणता? हे ओळखता आले नव्हत.

असंच तो फिरत फिरत एकदा एका राज्याचा राजा समोर उभा होता. अन् भर दरबारात त्या राजासह दरबारातील सर्वांना खरा हिरा ओळखण्याचे आव्हान देत होता.

दरबारात अगदी मध्यभागी दोन्ही हिरे सुशोभित अशा कोचावर ठेवले होते. राजा सहीत दरबारातील एकूण एक जणांनी त्या दोन्ही हिऱ्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले पण कुणालाही ठामपणे खरा हिरा ओळखता आला नाही.

राजा आता मात्र इरेला पेटला अन् त्यांन हुकूम दिला की, ' साऱ्या राज्यात दंवडी द्या की, अमूक अमूक एका व्यक्तीकडे असलेल्या हिऱ्यांची पारख करायची आहे. जो कोणी खरा हिरा ओळखेल त्याला हिरा अन् सोबत काही रक्कम तसेच ५० गावाची जहागिरी सुध्दा मिळेल.'

तीन दिवसांनंतर अगदी सुर्योदयाच्या वेळी राजधानीच्या भल्या मोठ्या मैदानावर मध्यभागी कोचावर मखमली कपडा टाकून त्यावर हिरे ठेवले होते.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून प्रसिद्ध असे रत्नपारखी तसेच अनेक विद्वान तिथं आले होते.
त्याबरोबर नेमके हिरे कसे आहेत? हे पाहण्यासाठी सुध्दा हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

अगोदरच राजा सहीत दरबारातील अनेक मान्यवरांना हिरा पारखता आला नव्हता. अगदी त्याप्रमाणे मी- मी म्हणणाऱ्या अनेक जवाहिरांना देखील नेमका कोणता हिरा खरा अन् कोणता खोटा ते सांगता आल नाही.

तिथं आलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, गोंधळ वाढला. यावेळी राजा खूप निराश झाला. त्याला वाटलं आपल्या एवढ्या मोठ्या राज्यात एक ही असा ज्ञानी नाही की जो हिऱ्यांची पारख करील. अन् याच उद्विग्नतून उभा राहिला अन् त्या व्यक्तीला म्हणणार की, 'आपण हरलो'. इतक्यात एक जन्मजात आंधळा माणूस गर्दीतून धडपड हिरे ठेवलेल्या कोचा जवळ आला व खणखणीत आवाजात म्हणाला, " हे राजन! हिरा ओळखण्याची संधी मला द्यावी."

सगळी जनता एकदम शांत झाली. आणि राजा सहित सगळ्यांचे लक्ष त्या आंधळ्या माणसाकडे गेले. जेव्हा सर्वांच्या लक्षात आले की, अरे! हा तर आंधळा आहे. अन् याला कसं कळणार! भल्या भल्याना जमलं नाही अन् ते ह्या आंधळ्याला कसं जमणार. म्हणून काही लोकांनी चेष्टा करायला सुरुवात केली तर काही कुत्सितपणे हसायला लागले.

हा आंधळा आपली चेष्टा तर करत नाही ना या गैरसमजातून मंत्रीमंडळातील काहीजण त्या आंधळ्याच्या अंगावर धावून जायला लागली. तेव्हा राजांनी सर्वांना अडवलं. तसेच सर्वांना शांत बसण्याचा इशारा केला. तेव्हा साऱ्या मैदानावर टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली.

राजा धीरगंभीर आवाजात बोलू लागला, " आपण सर्वांनी खरा हिरा ओळखण्याचा प्रयत्न केलाच आहे. परंतु एकालाही ते शक्य झालं नाही. आता शेवटचा प्रयत्न म्हणून या महानुभावाना एक संधी देऊ."

तेव्हा हिऱ्यांच्या मालकाने कोचावर ठेवलेले दोन्ही हिरे उचलले अन् त्या अंध व्यक्तीच्या हातात दिले.

हातात ठेवता क्षणी तो अंध ओरडला, "हे राजन! माझ्या डाव्या हातातील हिरा असली आहे आणि उजव्या हातातील हिरा नकली आहे."

तेव्हा राजाने हिऱ्याच्या मालकाला डोळ्यानेच खुणावलं. तेव्हा तो म्हणाला, " हा अंध सांगतोय ते खरं आहे."

तिथं जमलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
कोणी काही बोलणार इतक्यात राजा म्हणाला, " हे महानुभावा! तुम्हाला तर दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नाही. तरीही तुम्ही खरा हिरा कसा ओळखला?"

तेव्हा तो अंध व्यक्ती खणखणीत आवाजात आणि अतिशय नम्रपणे म्हणाला, " महाराज ! माझ्या उजव्या हातातील हिरा या कोवळ्या उन्हात देखील तापला आहे अन् डाव्या हातातील हिरा अतिशय थंड आहे.
हे राजन! जो खोटा असतो, जो नकली असतो, तो अगदी लहान सहान गोष्टी सहन देखील करू शकत नाही. अगदी शुल्लक कारणावरून ढोंगी माणसं असो वा खोट्या वस्तू गरम होत असतात.
आणि जे अस्सल असतात, जे खरे असतात ते कोणत्याही परिस्थितीत अतिशय शांत व नम्र असतात.
आणि अशीच माणसं वा वस्तू कायम टिकून असतात त्यांचं मोल कुणाच्या खोटारडेपणामुळे अजिबात कमी होत नाही.
ढोंग्यांचा गाजावाजा खूप होतो पण तो अतिशय कमी काळासाठी असतो."

तिथं जमलेल्या लोकांनी त्या अंध व्यक्तीचा खूप मोठा जयजयकार केला. खरा हिरा, सांगितल्याप्रमाणे धनसंपत्ती व ५० गावाची जहागिरी देऊन राजाने सत्कार केला.

खरं तर ही गोष्ट सगळ्यांसाठीच आहे पण आता सध्या ही गोष्ट दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांना साठी विशेषतः आहे.

विद्यार्थी मित्रांनो! ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे अशा मुलांनी अजिबात घाबरून जाऊ नका. कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका. सध्याच्या मुल्यमापना नुसार तुम्हाला जरी मार्क्स कमी पडले अन् दुसऱ्याला कुणालातरी जास्त पडले तरी अस्वस्थ होऊ नका. तुम्ही अस्सल हिरे आहात भविष्यात तुमची किंमत होणारच. आज नाही तरी पुढे तुम्हाला उज्ज्वल यश हे नक्कीच मिळणार.

यासाठी पुढे दिलेला तुकाराम महाराजांचा अभंग कायम लक्षात ठेवा.
आपलं कल्याण होईल...

हिरा ठेविता ऐरणी |
वाचे मारीता घणी ||

मोल पावे तोचि खरा |
करणीचा होय चुरा ||

जो अस्सल हिरा आहे त्याला ऐरणीवर ठेवून किती जोरजोरात घणाने मारा केला तरी तो फुटत नाही. त्याचा कण सुध्दा उडून बाहेर पडत नाही
अशाच खऱ्याखुऱ्या हिऱ्यास बाजारात किंमत असते.

परंतु काचेपासून बनवलेला हिऱ्यासारखा दिसणारा एखाद्या नकली हिऱ्यावर साधा दगड जरी मारला तरी त्याचे क्षणात तुकडे तुकडे होतात.

जो अस्सल आहे तोच टिकतो.

28/04/2021

विठ्ठला...!

"स्त्रीयांची व संपत्तीची आसक्ती मातीत मिसळवते"एकदा एक ७०-७५ वर्षांची म्हातारी गंगेच्या काठावर बसून करताना आपलं अंग धारधा...
28/04/2021

"स्त्रीयांची व संपत्तीची आसक्ती मातीत मिसळवते"

एकदा एक ७०-७५ वर्षांची म्हातारी गंगेच्या काठावर बसून करताना आपलं अंग धारधार अशा काळ्या दगडाने घासत घासत अंघोळ करत होती. ती तीचं अंग इतकं घासत होती, की त्या घासण्याने तीचं सगळं अंग रक्तबंबाळ झालं होतं. त्या म्हातारीचं जोरजोरात अंग घासणं अन् गंगेच पाणी अंगावर घेणं हे सुरूच होतं, इतक्यात तिच्या शेजारून जाणाऱ्या एका बाईंनं तिला हे अशाप्रकारे अंघोळ करताना पाहिलं अन् विचारलं, "अगं म्हातारे ! असं काय पाप केलंस तू की, साऱ्या अंगातून रक्त येईपर्यंत गंगेच्या पाण्यानं अंघोळ करत आहेस?"
यावर त्या म्हातारीने दिलेलं उत्तर हे काळजावर ओरखडे उमटवणारं आहे. ती म्हातारी म्हणाली, " अगं बाई ! मी कोणतंच पाप केलं नाही, परंतु मी वयात आल्यापासून माझ्या शरीराला चिटकलेल्या माणसांच्या वाईट नजरा खरवडून काढत आहे."

म्हातारीचे हे उत्तर नखशिखांत हादरून सोडणारे आहे.
कारण, काही महाभाग या समाजात असे आहेत की यांना लहान-मोठं, आपलं- परकं, आई - बहीण काही काही कळत नाहीत. अशी माणसं अतिशय घाण आणि विखारी नजरेने स्त्रीयांकडे पाहत असतात. यांच्या नजरेत इतकं विष भरलेलं असतं, की वाटतं नुसतं यांच्या नुसत्या पाहण्यानं सुध्दा समोरची स्त्री जळून खाक होईल.

संत तुकाराम महाराज
अशा नीच वृत्तीच्या लोकांचा समाचार घेताना पुढील अभंगात म्हणतात की,

कामातुर चवी सांडी |
बरळ तोंडी बरळे ||१||

विषय वासनेच्या आहारी गेलेला माणूस सगळी लाज लज्जा सोडून देतो.
अशा हलकट व स्त्री लंपट माणसांला समाज काय म्हणेल, याची अजिबात भीती वाटत नाही.
अशा माणसांच्या मनात सदा न् कदा स्त्रींयाचा उपभोग घेण्याचे घाणेरडे विचार येत असतात.

अशावेळी ना यांच्या बुद्धीवर ताबा असतो ना यांच्या बोलण्यावर नियंत्रण असते.
मग अशाप्रकारचे वासनेने बरबटलेले वाचाळवीर कुठेही आणि कधीही वटवट करत असतात. याच्या अश्लील बोलण्याला ना वेळेचे ना ठिकाणाचे भान असते. आपण कुठे बोलतोय, कुणासमोर बोलतोय अन् काय बोलतोय याचेही भान राहत नाही.

'कोण आपलं ऐकून घेत आहे की नाही! किंवा
आपलं म्हणणं समोरच्याला पटतं की नाही !' याचा कसलाही विचार न करता ह्याची आपली वटवट सुरूच असते.

रंगलें ते अंगी दावी |
विष देववी आसडे ||२||

हा माणूस बायकांच्या विचारात इतका रंगलेला असतो की, या रंगेलपणाच्या भरात आपणं कशाप्रकारे वागतोय, काय कृती करतोय याचं अजिबात भान रहात नाही.
असा माणूस रस्त्यानं जाताना चित्र- विचित्र अंगविक्षेप करत असतो, तसेच वासनेने भरलेली नजर घेऊन गावभर हुंदडत असतो.

एखादा विष पिलेला माणूस ज्या पध्दतीने अंगाला झटके देत असतो त्याप्रमाणे हा लिंगपिसाट माणूस वागत असतो.

हा नीच माणूस अशा काही रंगेल व नाटकी पध्दतीने वागत असतो की ज्यामुळे इतरांचे लक्ष, विशेषतः स्त्रीयांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल असे अश्लील चाळे करत असतो.

धनसोसें लागे वेड |
ते बडबड शमेना ||३||

बरं हा व्यक्ती जितका स्त्रीयांच्या विषयी आसक्ती बाळगून असतो, तितकाच तो पैशाच्या बाबतीतही लोभी असतो.
आणि असा हा विषयांध व हव्यासी माणूस नेहमीच वेड्यासारखे काही तरी बरळत असतो.

नेहमी धन, संपत्ती, सोनं - नाणं, जमीन- जुमला, घर- बंगला, बायका यांच्या विषयीच वटवट करतो.

यांच्या मेंदूत फक्त धनसंपत्ती अन् स्त्रीयांच्या विषयी अभिलाषा इतकीच घाण भरलेली असतात. अन् याच भावनेतून साऱ्या जगाला पाहत असतो.

तुका म्हणे व्यसनें दोन्ही |
नर्कखाणी भोगावया ||४||

तुकाराम महाराज म्हणतात, ' स्त्रीयांच्या बाबतीतची आस्तकी आणि धनचा हव्यास ही दोन व्यसनं माणसाला नरक यातना भोगायला लावतात.'

स्त्री लंपटता आणि हरामखोरी करून मिळवलेला पैसा एक ना एक दिवस मातीतच घालतो.

ज्यांची स्त्रीयांच्या विषयीची भावना नीच आहे, तसेच जो इतरांच्या कष्टाचा पैसा लुबडतो असा माणसाला जिवंतपणीच त्याच्या लेकराबाळा सहीत नरकयातना भोगाव्या लागतात.

पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं |नाहीं ऐशी मती अर्थ कळे ||१||होईल तें हो या विठोबाच्या नावे |अर्जिलें ते भावें जीवीं ध...
23/04/2021

पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं |
नाहीं ऐशी मती अर्थ कळे ||१||

होईल तें हो या विठोबाच्या नावे |
अर्जिलें ते भावें जीवीं धरूं ||२||

एखादा अंगासी येईल प्रकार |
विचारितां फार युक्ति वाढे ||३||

तुका म्हणे आळी करितां गोमटी |
मायबापा पोटीं येते दया ||४||

तुकाराम महाराज म्हणतात की, ' खूप सारी पुस्तके वाचायची आहेत, खूप सारे ग्रंथ वाचायचे आहेत. त्यांना समजून घ्यायचे आहे.'

इतकी ग्रंथसंपदा (पुस्तकांचं विश्व) उपलब्ध आहे की ते वाचता वाचता आयुष्यदेखील कमी पडेल.

'पुस्तकं (ग्रंथ) वाचनासाठी किती वेळ द्यायचा ?' हे आपल्या हातात आहे पण मिळालेलं हे आयुष्य आपल्या हातात नाही.

यासाठी वेळ मिळेल तेव्हा वाचत राहिले पाहिजे, जे वाचलं त्याचे आकलन झाले पाहिजे.

"पुस्तकाच्या वाचनातून चिंतन आणि चिंतनातून आकलन झाले पाहिजे."

'कारण एकदा वाचलं आणि लगेच माझ्या लक्षात आलं इतकी तीव्र बुद्धी माझ्याकडे नाही', असे तुकाराम महाराज म्हणतात.

आता जे होईल ते होईल मी तर माझ्या विठ्ठलाला साकडे घातले आहे, आणि त्याच्यावर असलेली श्रद्धा मला वाचनाचे, चिकित्सा करण्याचे व समजून घ्यायचे बळ देत आहे.

आयुष्य जगत असताना कधी कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही.
परंतु अशा संकटांचा सामना करण्याची प्रगल्भता मात्र विविध प्रकारच्या वाचनातून निर्माण होईल.

तसेच या संकटांतून बाहेर पडण्यासाठीची युक्तीसुद्धा वाचनातूनच मिळेल.

तुकाराम महाराज म्हणतात, 'एखादं लहान मूल आपल्या आईवडिलांकडे लाडीकपणे हट्ट करत असतं आणि त्याचे आई-वडीलसुद्धा तितक्याच प्रेमाने त्या मुलाचा हट्ट पूर्ण करत असतात.'

हे पांडुरंगा, मीही त्या बालकाच्या ठायी असलेल्या निरागसपणे मागणं करत आहे की, 'मला ग्रंथाचे (पुस्तकांचे) वाचन करण्यासाठी खूप खूप वेळ मिळू दे.'

'आयुष्य कमी असलं तरी माझा बहुतांश वेळ पुस्तकांच्या सान्निध्यात जाऊ दे.'

🌹 पुस्तक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा 🌹

राम म्हणता काम क्रोधाचे दहन |होय अभिमान देशधडी ||संत कान्होबा 🙏(संत तुकाराम महाराजांचे बंधू)अगदी मनापासून केवळ राम असं ज...
21/04/2021

राम म्हणता काम क्रोधाचे दहन |
होय अभिमान देशधडी ||

संत कान्होबा 🙏
(संत तुकाराम महाराजांचे बंधू)

अगदी मनापासून केवळ राम असं जरी म्हटलं तरी मनातील अनेक प्रकारच्या वासना, द्वेष, राग इ. दुर्गुण जळून नष्ट होतात. तर गर्विष्ठपणाची भावना देशोधडीला लागते.

Address

Osmanabad

Telephone

+919422466347

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Tukaram Gatha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sant Tukaram Gatha:

Share