16/08/2026
प.पू. परमात्मराज महाराज यांच्याविषयी मला आलेला अनुभव
परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 🙏
बोलायला कुठून सुरुवात करावी आणि काय बोलावे, हेच समजत नाही. कारण काही अनुभव असे असतात की ते शब्दांत व्यक्त करणे खूप कठीण असते. मनात खूप काही असते, पण ते व्यक्त करण्यासाठी शब्द मात्र अपुरे पडतात.
माझे बाबा १९९३-९४ पासून येत आहेत. आणि मीसुद्धा अगदी लहान असल्यापासून, मला काही समजत नसतानापासून बाबांसोबत महाराजांच्या चरणी येत आहे.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक बदल झाले, अनेक अनुभव आले. त्यातील फक्त एक प्रवास आज मी सांगू इच्छितो.
१२ वी नंतर मी B.Com. ला प्रवेश घेतला. पण B.Com. पूर्ण होत असताना पुढे काय करायचे, याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. MBA म्हणजे काय, M.Com. म्हणजे काय, याचीसुद्धा मला पूर्ण कल्पना नव्हती.
तेव्हा मी महाराजांना भेटलो आणि विचारले,
“मला काहीच समजत नाहीये. मी पुढे काय करू?”
तेव्हा महाराजांनी मला सांगितले,
“MBA कर आणि तुला जे योग्य वाटेल ते मनापासून कर.”
मी CET आणि CMAT परीक्षा दिल्या होत्या, पण माझे गुण चांगले नव्हते. त्यामुळे सहज प्रवेश मिळत नव्हता. त्याच वर्षी D.Y. Patil कसबा बावडा येथे MBA ची पहिली बॅच सुरू होत होती आणि Entrance Exam शिवाय प्रवेश मिळत होता. म्हणून मी तिथे प्रवेश घेतला.
पण खरं सांगायचं तर, पुढे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. MBA म्हणजे नेमके काय, पुढे काय करायचे—सगळेच एकदम अंधारात होते.
तरीही पहिला सेमिस्टर मी पास झालो.
पुढे Internship करायची होती. पण Internship म्हणजे काय, हेसुद्धा मला माहीत नव्हते. मी त्याबद्दल माहिती शोधत होतो.
आणि एके दिवशी योगायोगाने मला Thermax Ltd., पुणे या MNC कंपनीमध्ये Internship करण्याची संधी मिळाली.
अनेक लोक प्रयत्न करूनही जिथे Internship मिळवू शकत नाहीत, तिथे मला ती संधी सहज मिळाली. आणि तिथून माझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला.
मी तिथे ३ महिन्यांची Internship पूर्ण केली आणि पुन्हा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षासाठी परतलो. पण मनात एक इच्छा कायम होती—
“मला त्यांनी पुन्हा बोलवावे आणि पुन्हा तिथे काम करण्याची संधी मिळावी.”
महाराजांचे नामस्मरण सुरूच होते.
सुमारे एक महिन्यानंतर मला Thermax मधून पुन्हा कॉल आला आणि Paid Internship ची संधी मिळाली. माझी पहिली Internship Unpaid होती, त्यामुळे ही संधी माझ्यासाठी खूप खास होती.
तीसुद्धा मी पूर्ण केली. काही कारणांमुळे मला ती सोडावी लागली आणि पुन्हा शेवटच्या सेमिस्टरसाठी कॉलेजमध्ये परतलो.
मनात मात्र एक शंका होती—मी MBA पास होईन का?
Internship मुळे अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. पण मी परीक्षा दिली आणि माझे MBA कोणत्याही विषयात Back न लागता पूर्ण झाले. मला 7.4 CGPA मिळाले.
त्यानंतर कॉलेजची MBA ची पहिलीच बॅच असल्यामुळे आम्हाला Placement मिळाले नाही. माझे Specialization HR होते.
मी अनेक कंपन्यांमध्ये Interview दिले, अनेक ठिकाणी Apply केले; पण काही ना काही कारणामुळे Selection होत नव्हते.
तेव्हा महाराजांनी मला एकच सांगितले होते—
“काळजी करू नकोस.”
आणि वाचनासाठी मला “रस्याव” हा ग्रंथ दिला.
तो ग्रंथ वाचतानासुद्धा अनेक अडथळे आले. कधी वाटायचे की वाचूच नये. पण तरीही वाचन सुरू ठेवले.
फक्त दोन अध्याय बाकी असताना मला Europa Locks कंपनीमधून Interview साठी कॉल आला.
माझे एकूण चार Round झाले होते; पण Selection झाले नव्हते.
पण ज्या दिवशी माझे रस्याव या ग्रंथाचे पूर्ण वाचन झाले, त्याच दिवशी संध्याकाळी मला कंपनीचा कॉल आला आणि मला पुण्यातील Final Round साठी बोलावले.
तिथे माझे आणखी चार Round झाले.
ते मला सुरुवातीला HR Trainee म्हणून घेणार होते आणि सहा महिन्यांनंतर HR Executive म्हणून घेणार होते.
पण इथेही एक वेगळाच अनुभव आला.
त्यांनी मला थेट HR Executive म्हणून Select केले.
आणि माझी Europa Locks मध्ये HR Executive म्हणून निवड झाली.
तिथे मी साधारण ७-८ महिने काम केले. पण काही काळानंतर मला जाणवू लागले की तिथे माझी Growth मर्यादित आहे आणि पगारही अपेक्षेप्रमाणे नव्हता.
मी पुन्हा अनेक ठिकाणी Apply करू लागलो. प्रयत्न करत राहिलो. पण कुठूनही कॉल येत नव्हता.
माझी अपेक्षासुद्धा फार मोठी नव्हती. मला फक्त २०-३०% Salary Hike मिळाली तरी पुरेसे होते.
हे सर्व महाराजांना सांगण्यासाठी मी दोन वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळा मला बोलताच आले नाही.
शेवटच्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी आले.
काही न बोलताच मी तिथून परतलो आणि सोबत “दत्तपाठ” हा ग्रंथ घेऊन आलो.
विशेष म्हणजे, मी तो ग्रंथ वाचायला सुरुवातही केली नव्हती, तोपर्यंत मला एका कंपनीमधून कॉल आला.
मला नवीन Job ची संधी मिळाली.
आणि यावेळी मला ६०% Salary Hike सोबत HR Generalist ही जबाबदारी मिळाली.
आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—
सुरुवातीला मला MBA म्हणजे काय, पुढे काय करायचे, कुठे जायचे—यापैकी काहीच माहीत नव्हते.
पण महाराजांनी सांगितले,
“MBA कर.”
मी ते केले.
पुढे त्यांनी सांगितले,
“काळजी करू नकोस.”
मी विश्वास ठेवला.
प्रत्येक वेळी परिस्थिती कठीण वाटली, प्रत्येक वेळी मार्ग दिसत नव्हता; पण महाराजांचे नामस्मरण आणि त्यांच्यावरचा विश्वास सोडला नाही.
आज मी HR Generalist म्हणून काम करत आहे, हे माझ्यासाठी फक्त माझ्या प्रयत्नांचे यश नाही. माझ्या या प्रवासात महाराजांचे मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेला विश्वास यांची मला प्रत्येक टप्प्यावर जाणीव झाली.
माझा अनुभव एवढाच सांगतो -
आपल्याला पुढचा रस्ता दिसत नसला, तरी योग्य मार्गदर्शनावर आणि महाराजांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकत राहिलो, त्यामुळे आपोआप प्रगतीचा मार्ग दिसत गेला.
माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे उत्तर मला आजही पूर्णपणे समजलेले नाही. पण एक गोष्ट मात्र मनापासून जाणवते—
विश्वास आणि नामस्मरणाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात.
महाराजांनी दिलेला विश्वास, मार्गदर्शन आणि त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा हीच माझ्या आयुष्याची खरी ताकद आहे.
माझ्या या संपूर्ण प्रवासासाठी, प्रत्येक योग्य वेळी योग्य दिशा दाखवल्याबद्दल आणि माझ्यावर कृपादृष्टी ठेवल्याबद्दल महाराजांच्या चरणी मनापासून नमस्कार.
असेच महाराजांचा कृपाशीर्वाद सदैव राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 🙏
- प्रसाद प्रशांत मोकाशी,
रा. शिरगुप्पी, ता. निपाणी, जि. बेळगांव.