26/07/2026
*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*
*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*
*आषाढ शुद्ध द्वादशी, दिनांक २६ जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*मुक्काम: श्रीक्षेत्र पंढरपूर.*
*विटेवरी विट देव उभा राहिल्यातं |*
*चंद्रभागेचं ठाव, ह्यांनी पाहिल्यातं ||*
*पंढरीला गेले पह्यली पायरी नामाची |*
*विठ्ठलाच्या आधी भेट गरुड खांबाची ||*
*पाह्यली पंढरी, मीत भावासंग केली |*
*विठ्ठलाच्या आदी, भेट कुंडलीकान दिली ||*
*पंढरीला गेले उभी राहिले, बारीला |*
*माझ्या दर्शनाची चिंता पडली, हरीला ||*
पुंडलिकाची आपल्या माता-पित्यावरची भक्ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या या भक्तीने प्रभावित होऊन विठोबा त्याला भेटायला आले. तेव्हापासून पंढरपूरच्या देवळात विठोबा असाच कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत विटेवर उभा आहे. आपल्या भक्तांच्या अंतरीचा ठाव माहीत असणारा तो *लोकोत्तर जनदेव* आहे. त्याच्या देवळात *पहिली पायरी नामदेवांची* आहे, भक्त देवाची भेट घेण्या अगोदर *गरुड खांबांची भेट* घेतात. भक्तांचा दृढ विश्वास आहे की एकदा का पंढरीला पोहोचलो की तो *पांडुरंगच त्याच्या दर्शनाची चिंता करणार.*
*माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।*
*पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।*
*जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहता रूप आनंदी आनंद साठवे ।।*
*बाप रखुमादेविवर सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ।।*
टाळ, मृदुंगाच्या तालावर विशेष आवडीने गायला जाणारा हा अभंग वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीची उत्कटता नमूद करतो. प्रत्येक वारकऱ्याचा पंढरपूरला वारीबरोबर जाणे हा ध्यास आहे ही त्याच्या मनाची आत्यंतिक आवड आहे. वारीत चालत असताना त्याचे मन पांडुरंगाच्या भक्तिरंगात पार बुडून गेले आहे. गोविंदाचा अवतार मानला गेलेल्या विठ्ठलाच्या गुणांनी त्याच्या मनाला वेधून टाकले आहे. त्याचे *जागृत, अर्धजागृत आणि स्वप्न* या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून त्याच्या डोळ्यासमोर सतत येणाऱ्या *विठुरायाच्या सावळ्या रूपाला पाहताच त्याच्या मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात.* हा विठुराया जसा *निर्गुण, निराकार आहे, तसाच सगुण साकार आहे.* विटेवरचे त्याचे देखणे रूप ही *सगुणपणाची खूण* आहे.
समस्त जगासाठी पसायदान मागताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात,
*आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें || तोषोनि मज द्यावें | पसायदान हें ||१||*
विश्वातम देवाकडे *माऊलींनी पसायदान* मागितले. याच धर्तीवर संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे अत्यंत जगद्कल्याणासाठी फार सुरेख मागणे मागितले आहे. ते म्हणातात,
*हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||धृ||*
*गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||१||*
*न लगे मुक्ति आणि संपदा | संतसंग देई सदा ||२||*
*तुका म्हणे गर्भवासी | सुखें घालावें आम्हांसी ||३||*
संतांनी आपल्या ऐहिक सुखासाठी भगवंतांकडे कधीच काही मागितले नाही. *‘अवघे विश्वची माझे घर’* या विचाराने सतत विश्वाच्या भल्याचा विचार केला. म्हणून ही मंडळी संतमंडळी आज आपल्यात नसली तरी *त्यांचे चिरंतन विचार* आजही आपल्याला प्रेरणा देत असतात.
देवाच्या दारात गेल्यानंतर प्रत्येकजण स्वत:साठी काही ना काही मागत असतो. पण आपल्या या अभंगातून तुकोबाराय पांडुरंगांकडे माऊली ज्ञानेश्वरांच्या (पसायदान) सारखे, स्वत:साठी नव्हे तर अवघ्या जगासाठी *पांडुरंगाचे विस्मरण न होण्याचे दान* मागत आहेत. ईश्वराचे सतत चिंतन *नामस्मरण केल्याने ईश्वरशी द्वैत संपून अद्वैत निर्माण होते.* याचसाठी ईश्वरा सकल जनांना तु तुझ्या विसर न होण्याचे दान दे.
निर्गुण निराकार देवाचे गुण कसे गाणार हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न तुकाराम महाराजांना पडत नाही. भक्ताला ईश्वर निर्गुण निराकार, तसेच सगुण साकार अशा दोन्ही रुपात दिसतो. त्याचे अलौकिक गुण आपल्यात उतरावे अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून ते *‘गुण गाईन आवडी’* म्हणत असताना ते म्हणतात ‘ *हेचि माझी सर्व जोडी’* असे म्हणतात. तुझे गुण गात असताना हे सगळे गुण माझ्यात उतरावे हा माझा प्रयत्न असेल.
मला मुक्ती नको, धनदौलत किंवा संपत्ती नको, फक्त मला सदैव संतांची संगत दे. संतसंगतीमुळे माणसाला परमेश्वराची ओळख मिळते आणि भक्तीमार्ग दृढ होतो. संतांच्या सानिध्यात राहिल्याने नामाची गोडी कधीच कमी होत नाही.
गर्भवासातून प्रत्येक जीव आला आहे. पण गर्भवासाची यातना कुणाच्याही अनुभवात नाही. दुसऱ्या जीवाला विज्ञानाच्या यंत्राद्वारे आपण पाहू शकलो तरी तो अनुभव कुणीही आठवू शकत नाही. हा अनुभव देह बुद्धीने घेण्यासाठी शरीर पूर्ण नसते. आईच्या उदरात शरीराची वाढ होत असताना आलेले अनुभव आठवण्याची आपल्या बुद्धीची कुवत नाही. केवळ चेतनेतून ही अनुभूती शक्य असते. संतसंगाच्या कारणाने ही चेतन अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि ही गर्भावस्था आपण जाणू शकतो. म्हणून हे ईश्वरा, संतसंगाने मिळणारी ती चेतन अवस्था आम्हाला पुन्हा प्राप्त होण्यासाठी तु आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासी कर आणि आम्हास ते सुख पुन्हा एकदा अनुभवू दे. आम्हाला त्याचे अजिबात दुःख किंवा भय वाटणार नाही. कारण जिथे देवाचा विसर पडत नाही, तो गर्भवासही सुखाचा ठरतो.
मित्रांनो, कोव्हीडच्या कारणाने चुकवून गेलेली वारी आमच्याही न कळत आम्हाला लिहिते करून गेली. वारीच्या निमित्ताने आम्हाला मिळालेल्या ज्ञानातले चार कण *‘वारी जनातली, जनांच्या मनातली’* या माध्यमातून तुम्हासोबत वाटून घेताना *सात वर्षे* कशी उलटली काही कळलेच नाही. पंढरीच्या वारीचा महिमा अगाध आहे. आषाढाचे दिवस जवळ येताच वारीचे वारू अंगात भिनू लागते. मनात एक गोड हुरहूर निर्माण करते. काहीतरी कारायला पाहिजे ही भावना मनात रुंजी घालू लागते. अन अंत:प्रेरणेने काहीतरी घडून जाते. माऊलींच्या जीवीची जी आवड, तीच आवड आम्हालाही निमूट बसण्यापासून परावृत्त करते अन हातून काहीतरी घडवून घेते.
बघता बघता *गुंजन गौळणीचे* या लेखमालेचे *एकोणीस दिवस पूर्ण झाले.* या एकोणीस दिवसात आपण संतांच्या *गौळणी, विराण्या त्याचबरोबर शाहिरांच्या गौळणींची* माहिती घेतली आणि *संतांच्या गौळणी, विराण्यांचा रसास्वाद घेतला.* आशा आहे आम्ही आपल्यासमोर मांडलेले विचार आपल्याला भावले असतील.
गेल्या सहा वारीप्रमाणे याही वारीत आम्ही माऊलींनी आमच्याकडून लिहून घेतलेले चार शब्द तुमच्यासमोर मांडले. यात जे काही उत्तम आहे ते सगळे माऊलींचे आहे, यातील न्यूनाचे उत्तराधिकारी मात्र आम्ही आहोत. आपणांस *ही लेखमाला आवडली असेल तर आम्हाला संपर्क करुन आपला प्रतिसाद देण्यास बिलकुल विलंब करु नका.* आपल्या प्रतिसादाने आम्हास पुन्हा पुढील वर्षी आपल्या सेवेसाठी येण्याची स्फूर्ती प्राप्त होईल.
ही लेखमाला लिहिताना आमची अवस्था तुकाराम महाराजांच्या अभंगातील भक्तांसारखी झाली आहे. आम्हीही त्यांच्याइतक्याच उत्साहाने बोलतो आहे,
*आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥*
*काय सांगो जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥*
*गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥*
*तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥*
*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*
*|| रामकृष्ण हरि ||*
*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
[email protected]
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*
#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण
.lokhande
*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*