30/12/2025
आणखीन कोणतेही उपचार नसोत ,शीतल जल हि ज्याची आवड आहे ,स्मरण करणारा कोणीही असो त्याची भक्त म्हणून निवड आहे ,नित्य स्मरणकर्त्याचा योगक्षेम चालावा म्हणून अहोरात्र धडपड आहे ,ज्याला कोणाचा आधार नाही अशा भक्तांचा जो आधारवड आहे ,भक्तकाजाकरिता अन्य कामे बाजूस ठेऊन ज्याला सवड आहे ,शत्रू भयात आपल्या भक्तांची जो कड घेतो ,नित्य आपले भक्त आपल्या सन्निध असावेत हि ज्याला निकड वाटते ,अडचणीत असलेला भक्त पाहून आपले अश्रू लपवणे ज्याला जड आहे ,मुमुक्षूंना ज्याचे स्थान म्हणजे मैलाचा दगड आहे ,नृसिंहवाडी हा ज्याच्या राजधानीचा गड आहे ,भयाला भय रुपी अग्नीची चूड लावणारा , अशा दत्त महाराजांना आमचे वंदन असो .
एके जागी स्थिर नसलेला असा तो आपल्या भक्तांचे चित्त आपल्यापाशी स्थिर राहावे म्हणून भक्तांच्या हृदयात स्थिर असतो . भक्तांसाठी अत्यंत कनवाळू असे ते अभक्तांसाठी मात्र वज्राहून कठोर भासतात . दंड आणि कमंडलू हाती घेत अभक्तांना भयाने नित्य स्मरण करावयास लावून मुक्ती देतात .रोग परिहार हि लीला का ? तर कोणत्याही पीडेमध्ये ,वेदनेमध्ये माझे स्मरण कठीण आहे तेव्हा रोगमुक्ती देऊन या भक्तांना सेवेची संधी द्यावी या विचाराने हि लीला दाखवली आहे . माध्यान्हाला कधी जोंधळ्याच्या कण्या ,कधी घेवड्याच्या उकडलेल्या शेंगा तर कधी केवळ तापवलेले दूध असे भक्तांच्या दारिद्र्य दोषासहित स्वीकारतात आणि 'इह' प्राप्तीचा वर देऊन 'पर' करिता आपल्या स्वरूपाच्या उपासनेची संधी देतात .
काय केले असता माझी प्राप्ती होईल ? या प्रश्नाचे उत्तर दत्त महाराजांनी केवळ नमस्कार रुपी स्मरणाने इतकेच दिले आहे . मोठे यज्ञ याग केले नसतील ,मोजून केलेल्या यात्रांची संख्या हाती नसेल ,गीर्वाण भाषेचे ज्ञान नसल्याने स्तोत्र मंत्र आदी माहीत नसतील तरी केवळ भावाने हाक मारणारा माझा भक्त आहे आणि त्याचा योगक्षेम मी चालवेन हे दत्त महाराजांचे वचन आहे .
या वचनाला जागत सत्यसंध असे ते आम्हाला सांभाळून घेत आहेत ,पुढेही अशीच कृपा राहो हो नमस्कार रुपी प्रार्थना ! श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
Follow:-