दत्त आराधना

दत्त आराधना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from दत्त आराधना, Hindu temple, Mumbai.

Creating content on the incarnations of Shri Dattaguru Shripad Shrivallabh, Shri Nrusimha Saraswati, and Swami Samarth inspired by the Adhyays (chapters) of Shri Gurucharitra. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्या दैवी चरित्रावर आधारित भक्तिप्रधान आणि आध्यात्मिक व्यासपीठ.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
|| अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||

“निःक्षत्र केली मेदिनी” - श्री गुरुचरित्रातील या ओवीमागील काय आहे कथा ? 🌺🌺🌺🙏🙏🙏जेव्हा आपण श्री गुरुचरित्र वाचतो, तेव्हा अ...
27/08/2026

“निःक्षत्र केली मेदिनी” - श्री गुरुचरित्रातील या ओवीमागील काय आहे कथा ? 🌺🌺🌺🙏🙏🙏

जेव्हा आपण श्री गुरुचरित्र वाचतो, तेव्हा अनेक ओव्या सहजपणे आपल्या डोळ्यांसमोरून जातात. एखादी ओवी वाचली, तिचा अर्थ समजला आणि आपण पुढे निघून गेलो, असे अनेकदा होते. पण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक ओवीच्या मागे एखादा गूढ संदर्भ, एखादी कथा, एखादा प्रसंग किंवा एखादा आध्यात्मिक संदेश दडलेला असतो. त्या ओवीचा मागचा इतिहास समजून घेतला, की तिचे शब्द केवळ वाचले जात नाहीत, तर ते मनाला भिडू लागतात. अशाच अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या कथेमागे श्री गुरुचरित्राच्या पंधराव्या अध्यायातील ही ओवी आहे –

“पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी ।
राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्र्चिमसमुद्रासी ॥”

आणि पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आलेले शब्द -

“निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी ।
देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥”

या काही ओव्यांमध्ये भगवान परशुरामांच्या जीवनातील एक विलक्षण कथा संपूर्णपणे दडलेली आहे.

परशुराम म्हणजेच भार्गवराम. ते जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र. त्यांच्या जन्मामागेही एक विशेष पार्श्वभूमी आहे. जमदग्नींचे वडील ऋचीक हे ब्राह्मण होते, तर रेणुका क्षत्रियकुळातील होती. त्यामुळे परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात ब्राह्मणत्वाची विद्या, तपश्चर्या आणि आध्यात्मिक सामर्थ्य यांच्यासोबत क्षात्रतेज आणि पराक्रम यांचाही विलक्षण संगम झाला होता. बालपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान होते. वेद-शास्त्रांचे त्यांनी अध्ययन केले; परंतु त्यांचे मन केवळ विद्यार्जनात रमले नाही. त्यांना भगवान शंकराची उपासना करण्याची तीव्र ओढ होती. कठोर तपश्चर्या करून त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून परशु तसेच विविध अस्त्रविद्यांचे ज्ञान प्राप्त केले. याच परशुमुळे पुढे ते ‘परशुराम’ म्हणून प्रसिद्ध झाले.

एकदा परशुरामांची माता रेणुका नदीवर स्नानासाठी गेली असताना त्या प्रदेशाचा राजा चित्ररथ तेथे जलक्रीडा करीत असल्याचे तिने पाहिले. त्या प्रसंगामुळे तिच्या मनात क्षणभर चंचलता निर्माण झाली. जमदग्नी ऋषींना आपल्या योगसामर्थ्याने ही गोष्ट कळली आणि त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. मोठ्या भावांनी ती आज्ञा मानली नाही; परंतु परशुरामांनी मात्र पित्याची आज्ञा सर्वोच्च मानून ती पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्या आज्ञाधारकपणाने प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी “वर माग” असे म्हटले. परशुरामांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही; त्यांनी आपल्या आईला पुन्हा सजीव करण्याची विनंती केली. पित्याने ती मान्य केली आणि रेणुका पूर्वीप्रमाणे जिवंत झाली. या प्रसंगातून परशुरामांचा पितृभक्तीचा आणि आज्ञापालनाचा गुण स्पष्ट होतो.

परंतु पुढे परशुरामांच्या जीवनात एक असा प्रसंग घडला, ज्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली. नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर हेहय नगरीचा राजा कार्तवीर्यार्जुन राज्य करीत होता. तो अत्यंत सामर्थ्यवान, पराक्रमी आणि दिग्विजयी राजा होता. त्याला सहस्रार्जुन असेही म्हटले जात असे. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्याने अनेक प्रदेश जिंकले होते. एकदा दिग्विजयाच्या निमित्ताने फिरत असताना तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमाजवळ आला. आश्रमातील शांत वातावरण, ऋषींची साधना आणि तेथील साधेपणा पाहूनही त्याच्या मनात आदर निर्माण होण्याऐवजी अहंकार जागा झाला.

जमदग्नी ऋषींच्या आश्रमात कामधेनू होती. तिच्या सामर्थ्यामुळे आश्रमात आलेल्या असंख्य अतिथींचेही योग्य प्रकारे आदरातिथ्य करता येत असे. कार्तवीर्यार्जुनाने त्या कामधेनूचे सामर्थ्य पाहिले आणि तिच्यावर त्याची नजर पडली. त्याला वाटले की अशी अद्भुत गाय राजाच्या ताब्यात असली पाहिजे. त्याने जमदग्नी ऋषींकडे तिची मागणी केली; परंतु ऋषींनी ती देण्यास नकार दिला. राजाच्या मनात क्रोध निर्माण झाला. त्याने आपल्या सामर्थ्याचा वापर करून आश्रमावर अत्याचार केला आणि कामधेनू हिसकावून नेली.

या घटनेची बातमी परशुरामांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. हातात परशु घेऊन ते हेहेय राज्याच्या दिशेने निघाले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी कार्तवीर्यार्जुनाच्या विशाल सैन्याला आव्हान दिले. घनघोर युद्ध सुरू झाले. राजाचे असंख्य सैनिक परशुरामांच्या पराक्रमापुढे टिकू शकले नाहीत. अखेर कार्तवीर्यार्जुन स्वतः रणांगणात उतरला. दोघांमध्ये भीषण युद्ध झाले आणि शेवटी परशुरामांनी आपल्या परशुने कार्तवीर्यार्जुनाचा वध केला. त्या क्षणी केवळ एका राजाचा पराभव झाला नव्हता; तर अहंकार, अत्याचार आणि सामर्थ्याचा दुरुपयोग यांच्यावर धर्माच्या शक्तीचा विजय झाला होता.

परशुराम परत आश्रमात आले, तेव्हा जमदग्नी ऋषींनी मात्र त्यांच्या या कृत्याचे कौतुक केले नाही. त्यांनी पुत्राला समजावले की ब्राह्मणासाठी क्षमा, शांतता आणि संयम हेच मोठे सामर्थ्य आहे. त्यांनी परशुरामांना प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेने परशुराम तीर्थयात्रेला गेले. परंतु नियतीने अजून एक कठोर प्रसंग त्यांच्या जीवनात ठेवला होता.

परशुराम आश्रमापासून दूर असताना कार्तवीर्यार्जुनाच्या पुत्रांनी आपल्या पित्याच्या वधाचा बदला घेण्यासाठी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. त्यांनी वृद्ध आणि तपस्वी जमदग्नी ऋषींचा वध केला. आश्रमात परतल्यानंतर परशुरामांनी आपल्या पित्याची ही अवस्था पाहिली. त्या वेळी त्यांच्या मनात दुःखाबरोबरच प्रचंड संताप निर्माण झाला. त्यांनी प्रतिज्ञा केली - ज्या क्षत्रियांनी धर्माचा त्याग करून अत्याचाराचा मार्ग स्वीकारला आहे, त्यांचा नाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

यापुढे परशुरामांचा पराक्रम एका व्यक्तीपुरता किंवा एका राजापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी पृथ्वीवर अनेक वेळा क्षत्रियांचा पराभव केला. त्यांच्या परशुच्या सामर्थ्याची कीर्ती सर्वदूर पसरली. एका पराक्रमी योद्ध्याच्या रूपाने त्यांनी अधर्माविरुद्ध कठोर भूमिका घेतली. त्यांच्या प्रतिज्ञेचा अर्थ केवळ एका वर्णाचा नाश करणे एवढाच मर्यादित न ठेवता, या कथेतून अन्याय, अहंकार, अत्याचार आणि सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध उभे राहण्याचा संदेशही समोर येतो.

अखेरीस परशुरामांनी पृथ्वी जिंकून ती स्वतःकडे ठेवली नाही. त्यांनी ती ब्राह्मणांना दान केली. याच प्रसंगाचा संदर्भ श्री गुरुचरित्रातील त्या अर्थपूर्ण ओवीत येतो—“पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी । राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्र्चिमसमुद्रासी ॥” म्हणजे भार्गवरामांनी पृथ्वी क्षत्रियरहित केली आणि जिंकलेले राज्य स्वतःच्या स्वार्थासाठी न ठेवता विप्रांना दान केले. त्यानंतर त्यांनी पश्चिम समुद्राच्या दिशेने प्रयाण केले.

याच कथेकडे श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातील “निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी । देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥” या शब्दांच्या संदर्भातून पाहिले, तर त्या ओवीचे गांभीर्य आणखी स्पष्ट होते. एखाद्याला आपण काही दिले असे म्हणताना प्रत्यक्षात ते आपलेच आहे का, हा प्रश्न या कथेतून उपस्थित होतो. परशुरामांनी पृथ्वी जिंकली, परंतु तिच्यावर स्वतःचा अधिकार प्रस्थापित करून बसले नाहीत. त्यांनी ती दान केली. म्हणजेच सामर्थ्य मिळाले म्हणून त्याचा उपभोग घेणे हा धर्म नव्हे; सामर्थ्याचा उपयोग योग्य ठिकाणी करून त्याग करणे ही खरी श्रेष्ठता आहे.

परशुरामांच्या कथेत आणखी एक महत्त्वाचा भाग येतो. पृथ्वी दान केल्यानंतरही त्यांनी राजसत्ता स्वतःकडे ठेवली नाही. त्यांचा उद्देश सत्ता मिळवणे नव्हता. त्यांच्या कृतीमागे प्रतिशोध, धर्मरक्षण, प्रतिज्ञा आणि शेवटी त्याग अशी एक गुंतागुंतीची जीवनयात्रा दिसते. म्हणूनच परशुरामांच्या जीवनाकडे केवळ एक महान योद्धा म्हणून पाहिले तर या कथेमागचा मोठा आध्यात्मिक अर्थ आपल्या लक्षात येणार नाही.

श्री गुरुचरित्र वाचताना म्हणूनच प्रत्येक ओवीकडे थोडे थांबून पाहणे आवश्यक आहे. “पूर्वी भार्गवराम अवतरोनि...” ही ओवी वाचताना तिच्यामागे उभा असलेला परशुरामांचा जन्म, त्यांचे शस्त्रविद्येचे शिक्षण, पित्याची आज्ञा, रेणुकेचा प्रसंग, कार्तवीर्यार्जुनाशी झालेले युद्ध, जमदग्नी ऋषींचा वध, त्यानंतर घेतलेली प्रतिज्ञा, क्षत्रियांचा पराभव, पृथ्वीचे दान आणि शेवटी केलेला त्याग - ही संपूर्ण कथा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. तेव्हा लक्षात येते की गुरुचरित्रातील ओवी ही केवळ चार ओळी नसते; त्या चार ओळींच्या मागे कधी कधी संपूर्ण इतिहास, धर्मविचार आणि जीवनाचे गूढ तत्त्वज्ञान दडलेले असते.

म्हणूनच श्री गुरुचरित्र वाचताना एखादी ओवी समोर आली आणि तिचा अर्थ साधा वाटला, तरी तिथेच थांबून स्वतःला एक प्रश्न विचारावा - “या ओवीच्या मागे कोणती कथा आहे?” कारण त्या एका प्रश्नातून गुरुचरित्राचे एक नवे दालन उघडते. “निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी ।” या काही शब्दांमागे दडलेली परशुरामांची कथा आपल्याला सांगते की सामर्थ्यापेक्षा संयम मोठा, विजयापेक्षा त्याग श्रेष्ठ आणि अधिकारापेक्षा धर्माची जाणीव अधिक महत्त्वाची आहे. म्हणूनच गुरुचरित्रातील ओव्या केवळ वाचायच्या नसतात; त्या समजून घ्यायच्या असतात, त्यांच्या मागची कथा जाणून घ्यायची असते आणि त्या कथेतून आपल्या जीवनासाठी दडलेला संदेश शोधायचा असतो.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
|| अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌺🌺🙏🌺🌺

#पंढरपूर #गुरुवार #प्रवचने #जन्माष्टमी

श्री गुरुचरित्र - तारुण्य भोगासाठी नव्हे…तर साधनेसाठी आहे! 🌺🌺🙏🙏🌺🌺जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या ...
10/08/2026

श्री गुरुचरित्र - तारुण्य भोगासाठी नव्हे…तर साधनेसाठी आहे! 🌺🌺🙏🙏🌺🌺

जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षीं अवधारा ॥
याकारणें तारुण्यपणी । करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥
जो यमाचा असेल इष्ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करवा ॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्प असे मोगरी । सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥

ज्यावेळी श्री नृसिंहसरस्वती आपल्या आई-वडिलांना आपण संन्यास स्वीकारून लोकांच्या उद्धारासाठी घराचा त्याग करणार असल्याचे सांगतात, तेव्हा हे ऐकून त्यांच्या आईच्या मनात मायेची आणि काळजीची भावना दाटून येते. त्या आपल्या पुत्राला म्हणतात - इतक्या लहान वयात संन्यास घेण्याची काय घाई आहे? धर्मशास्त्रात मनुष्याने प्रथम ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आणि शेवटी संन्यास असा क्रम सांगितला आहे. आधी वेदांचा अभ्यास करावा, नंतर विवाह करून गृहस्थधर्म पाळावा, यज्ञयाग करावेत, संसारातील कर्तव्ये पूर्ण करावीत आणि मग शेवटी संन्यास स्वीकारावा. तू त्या मार्गाने का चालत नाहीस?"

श्रीगुरू त्यावेळी मानवी जीवनातील एक अटळ सत्य आपल्या मातेसमोर ठेवतात. ते म्हणतात की जशी नदीतील सुसर निष्काळजी माणसाला एका क्षणात आपल्या तावडीत घेते, तसेच या शरीराला वृद्धत्व हळूहळू गिळंकृत करत असते. सुसर दिसत नाही, पण ती पाण्याखाली दबा धरून बसलेली असते. त्याचप्रमाणे वृद्धत्वही अचानक एका दिवसात येत नाही. ते दिवसागणिक, क्षणोक्षणी शरीरावर आपला अधिकार मिळवत असते.

बालपणी खेळण्यात, तारुण्यात सामर्थ्याच्या अभिमानात आणि प्रौढपणी संसाराच्या व्यापात मनुष्य इतका गुंतून जातो की वृद्धत्व कधी जवळ येते हे त्याला जाणवतही नाही. केस पांढरे होणे, दृष्टी कमी होणे, स्मरणशक्ती मंदावणे, शरीराची ताकद घटणे - ही सर्व निसर्गाची सूचना आहे की देहाची यात्रा आता उताराकडे चालली आहे.

म्हणूनच श्रीगुरू सांगतात की
तारुण्य हे केवळ भोगासाठी नसून, साधनेसाठी सर्वात योग्य काळ आहे.

तारुण्यात शरीरात उत्साह असतो, बुद्धी तीक्ष्ण असते, मनात ध्येय साध्य करण्याची शक्ती असते आणि कोणतेही चांगले कार्य करण्याची क्षमता असते. हाच काळ गुरूसेवा, ईश्वरस्मरण, स्वाध्याय, दान, सेवा, संयम आणि आत्मचिंतन यांसाठी वापरला, तर पुढील जीवनाची दिशा बदलू शकते.

पण मनुष्याची एक सवय मात्र विचित्र आहे - ज्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, त्याच तो पुढे ढकलत राहतो. "आता कामाचा व्याप आहे; नंतर जप करीन. मुलं मोठी झाली की देवधर्म करीन. निवृत्त झाल्यावर ग्रंथ वाचीन. वेळ मिळाला की सेवा करीन." असे म्हणता म्हणता आयुष्य पुढे सरकत राहते. आणि एक दिवस असा येतो की शरीर पूर्वीसारखे साथ देत नाही, मनाला एकाग्रता साधत नाही आणि आयुष्याचा मोठा भाग हातातून निसटून गेलेला असतो.

श्रीगुरू म्हणूनच साधना ही "नंतर कधीतरी" करण्याची गोष्ट नाही, हे ठामपणे सांगतात. ज्याप्रमाणे शेतकऱ्याने पेरणीच्या योग्य वेळी बी पेरले नाही, तर कापणीच्या वेळी शेत रिकामेच राहते; त्याचप्रमाणे तारुण्याचा काळ सत्कर्म आणि साधनेसाठी न वापरता वृद्धावस्थेत आध्यात्मिक संपत्ती मिळवण्याची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. साधनेचे बीज योग्य वेळी पेरावे लागते; तेव्हाच त्याचे फळ पुढे मिळते.

त्यानंतर श्रीगुरू अत्यंत मार्मिक शब्दांत म्हणतात - "जो यमाचा असेल इष्ट, त्याने आळस करावा." हे वाक्य जणू मनुष्याच्या आळशी वृत्तीवर केलेला उपरोध आहे. ज्याला आपल्या जीवनाचा अधःपात व्हावा असे वाटत असेल, त्याने सत्कर्म पुढे ढकलत राहावे. पण ज्याला जीवनाचे खरे सार्थक करायचे आहे, त्याने आळस झटकून आजच धर्ममार्गाला लागले पाहिजे.

आळस म्हणजे फक्त शरीराची निष्क्रियता नाही. "उद्या करीन" ही वृत्ती देखील आळसाचाच एक सूक्ष्म प्रकार आहे. जप करायचा आहे - उद्या करू. ग्रंथ वाचायचा आहे - पुढच्या आठवड्यात वाचू. कोणाला मदत करायची आहे - वेळ मिळाला की करू. अशा प्रकारे माणूस सत्कर्माला सतत पुढे ढकलत राहतो. आळस माणसाला थेट चुकीच्या मार्गावर नेईलच असे नाही; पण तो चांगल्या मार्गावर पहिले पाऊल टाकण्यापासून नक्कीच रोखतो.

यानंतर श्रीगुरू संसाराच्या स्वरूपाकडे वळतात आणि एक अत्यंत सुंदर उपमा देतात - संसार हा स्वप्नासारखा आहे. स्वप्नामध्ये आपण जे पाहतो ते त्या क्षणी अगदी खरे वाटते. आपण त्यात हसतो, रडतो, घाबरतो, आनंदित होतो; पण जाग आली की त्या संपूर्ण जगाचे अस्तित्वच उरत नाही. त्याचप्रमाणे जीवनातील अनेक गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आणि कायमस्वरूपी वाटतात; परंतु काळाच्या एका क्षणी त्या सर्व मागे राहून जातात.

श्रीगुरू यासाठी मोगऱ्याच्या फुलाची सुंदर उपमा देतात. मोगऱ्याचे फूल उमलते तेव्हा त्याचा सुगंध आणि सौंदर्य मनाला मोहून टाकते. पण काही काळातच ते कोमेजते आणि त्याची पूर्वीची ताजेपणाची अवस्था नाहीशी होते. मानवी देहाचेही असेच आहे. तारुण्य, सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य आणि शरीराची ताकद यांचा अभिमान कितीही वाटला, तरी हे सर्व कायम राहणारे नाही.

मग श्रीगुरू आणखी प्रभावी उदाहरण देतात - विजेचे. आकाशात वीज चमकते आणि एका क्षणात संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघतो. पण पुढच्याच क्षणी ती प्रकाशरेषा नाहीशी होते. मानवी देह आणि आयुष्याचे स्वरूपही असेच क्षणभंगुर आहे. आपल्याला आयुष्य खूप मोठे वाटते; पण अनंत काळाच्या तुलनेत ते विजेच्या एका क्षणिक चमकण्याइतकेच अल्प आहे.

म्हणून या ओव्यांचा संदेश केवळ वृद्धत्वाची आठवण करून देणे एवढाच नाही. तो आपल्याला जागे करण्यासाठी आहे. शरीर क्षीण होणार आहे, संसार बदलणार आहे, संपत्ती मागे राहणार आहे आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण निघून जाणार आहे - हे सत्य समजून घेतले, तर आजचा दिवस अधिक अर्थपूर्ण जगण्याची प्रेरणा मिळते.

श्रीगुरू जणू आपल्याला विचारतात, "तुला आयुष्य किती मिळेल हे तुझ्या हातात नाही; पण मिळालेला प्रत्येक दिवस तू कसा जगशील, हे मात्र तुझ्या हातात आहे." म्हणून तारुण्य असेल तर आजच सत्कर्म करा, वेळ असेल तर आजच साधना करा, कोणाची सेवा करता येत असेल तर आजच करा आणि ईश्वराचे स्मरण करायचे असेल तर त्यासाठी उद्याची वाट पाहू नका. कारण वृद्धत्व दबा धरून पुढे येत आहे, काळ क्षणाक्षणाला निघून जात आहे आणि मानवी देह - मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे आणि विजेच्या चमकण्याप्रमाणे - कधी क्षणभंगुर ठरेल, हे कोणालाही माहीत नाही.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
|| अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌺🌺🙏🌺🌺

#पंढरपूर #गुरुवार #प्रवचने #माऊली

श्री गुरुचरित्र - प्रत्येक दिवसाची खरी कमाई कोणती? 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏गुरुचरित्रात खालील ओव्यांमध्ये श्री नृसिंहसरस्वती स्वामी  मानव...
07/08/2026

श्री गुरुचरित्र - प्रत्येक दिवसाची खरी कमाई कोणती? 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

गुरुचरित्रात खालील ओव्यांमध्ये श्री नृसिंहसरस्वती स्वामी मानवी जीवनाचा खरा उद्देश अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतात.

अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन । पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥
जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासी करुणा नाही । करावें पुण्य तात्काळ॥
पुत्र दारा धन गोधन । आयुष्य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥

दिवस आणि रात्र कोणासाठीही थांबत नाहीत. काळाची गती अखंड सुरू आहे. प्रत्येक क्षण हातातून निसटत आहे, हे माहीत असूनही जे लोक आपल्या जीवनात कोणतेही सत्कर्म, सेवा, ईश्वरस्मरण किंवा आत्मचिंतन करत नाहीत आणि केवळ विषयसुख, धनसंचय व संसारातील आसक्ती यामध्येच जीवन व्यतीत करतात, त्यांचे जीवन मानवजन्माच्या श्रेष्ठतेला अनुरूप राहत नाही.

येथे श्रीगुरूंनी वापरलेला "पशुसमान" हा शब्द एखाद्याचा अपमान करण्यासाठी नाही, तर एक गहन आध्यात्मिक सत्य समजावण्यासाठी आहे. पशू देखील जन्म घेतो, अन्न शोधतो, झोपतो, आपल्या संततीचे पालन करतो आणि जीवनाचा प्रवास पूर्ण करतो. जर मनुष्यानेही केवळ खाणे-पिणे, झोपणे, संसार वाढवणे आणि स्वतःच्या सुखाचा विचार करणे एवढ्यापुरतेच जीवन मर्यादित ठेवले, तर त्याला मिळालेल्या विवेकबुद्धीचा आणि आत्मज्ञानाच्या क्षमतेचा योग्य उपयोग झाला नाही, असे श्रीगुरू सांगतात.

मनुष्याला इतर सर्व जीवांपेक्षा श्रेष्ठ बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची धर्मबुद्धी. त्याला विचार करण्याची शक्ती आहे. तो आपल्या चुका ओळखू शकतो, स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकतो, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकतो आणि परमेश्वराशी आपले नाते जोडू शकतो. म्हणूनच मनुष्यजन्म हा केवळ भोगांसाठी नसून आत्मोन्नतीसाठी मिळालेली एक दिव्य संधी आहे.

याच कारणामुळे श्रीगुरू पुढे सांगतात की, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस व्यर्थ गेला. हा विचार अत्यंत सूक्ष्म आहे. येथे पुण्य म्हणजे केवळ मोठमोठे धार्मिक विधी, यज्ञ किंवा दानधर्म नव्हे. आपल्या मन, वाणी आणि कर्माने केलेली प्रत्येक चांगली कृती म्हणजे पुण्य होय. एखाद्या दुःखी व्यक्तीला आधार देणे, भुकेल्याला अन्न देणे, गरजूला मदत करणे, प्रेमाने दोन शब्द बोलणे, सत्य आणि प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडणे, गुरू व ईश्वराचे स्मरण करणे - ही सर्व पुण्याचीच रूपे आहेत.

आपण अनेकदा दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारतो - आज किती काम केले? किती पैसे कमावले? किती यश मिळवले? पण श्रीगुरू आपल्याला याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न विचारायला शिकवतात - आज माझ्यामुळे कोणाचे तरी भले झाले का? आज माझ्या अंतःकरणात ईश्वराचे स्मरण झाले का? आज मी कालपेक्षा थोडा अधिक चांगला मनुष्य झालो का?

जर या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील, तर बाहेरून दिवस कितीही यशस्वी दिसला तरी आध्यात्मिक दृष्ट्या तो दिवस अपूर्ण राहतो. कारण मनुष्याच्या जीवनाची खरी किंमत त्याने किती मिळवले यावर नसून त्याने किती दिले, किती चांगुलपणा निर्माण केला आणि आपल्या अंतःकरणाला किती शुद्ध केले यावर अवलंबून असते.

"तया यमासी करुणा नाही" या वचनामागे देखील एक गहन तत्त्वज्ञान आहे. याचा अर्थ यमराज कठोर आहेत असा नाही. यम म्हणजे कर्मनियमाचे प्रतीक आहे. या सृष्टीमध्ये प्रत्येक कर्माचे फळ निश्चित आहे. जसे परीक्षेनंतर विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरांनुसार गुण मिळतात, तसेच जीवनाच्या शेवटी प्रत्येक जीवाला आपल्या कर्मांनुसार परिणाम प्राप्त होतो. त्या वेळी पश्चात्ताप करून उपयोग नसतो. म्हणूनच श्रीगुरू सांगतात - सत्कर्म करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका; कारण उद्या आपल्या हातात असेलच याची खात्री नाही.

यानंतर श्रीगुरू मनुष्याच्या सर्वात मोठ्या भ्रमावर प्रकाश टाकतात. मनुष्याला वाटते, "माझे कुटुंब आहे, माझी मुले आहेत, माझे धन आहे, माझे शरीर निरोगी आहे आणि माझे आयुष्य अजून खूप बाकी आहे." या गोष्टी जीवनाचा भाग आहेत, पण त्या शाश्वत नाहीत.

पुत्र मोठे होऊन आपल्या मार्गाने जातात. धन कधी वाढते तर कधी कमी होते. शरीर आज निरोगी असले तरी काळाच्या प्रवाहात ते बदलते. कोणतीही बाह्य गोष्ट कायमची आपल्या मालकीची राहत नाही. म्हणून संसार सोडावा असे श्रीगुरू सांगत नाहीत; परंतु संसारालाच अंतिम सत्य मानण्याचा भ्रम सोडावा असे ते शिकवतात.

या ओव्यांची खरी शिकवण अशी आहे की प्रत्येक दिवसाला अर्थ द्या. दिवसाची सुरुवात ईश्वरस्मरणाने करा, मनात चांगले विचार ठेवा, शक्य तेवढी सेवा करा, कोणाचे मन दुखावू नका आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. कारण जीवनाची खरी कमाई बँकेतील धन, मोठे घर किंवा सामाजिक प्रतिष्ठा नसते; तर त्या दिवशी केलेले एक सत्कर्म, दिलेला एक प्रेमाचा शब्द आणि शुद्ध झालेला अंतःकरणाचा एक क्षण असतो.

श्रीगुरूंचा संदेश स्पष्ट आहे, काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण जागरूकतेने जगा. संसार करा, पण त्यात हरवू नका. धन मिळवा, पण धर्म विसरू नका. कारण शेवटी मनुष्याच्या सोबत जाते ती केवळ त्याची पुण्यरूपी शिदोरी.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
|| अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌺🌺🙏🌺🌺

#पंढरपूर #गुरुवार #प्रवचने #माऊली

श्री गुरुचरित्र अध्याय ५० - श्रीगुरूंचा अवतारसमाप्तीचा निर्णय.... 🌺🌺🌺🌺🌺🙏श्रीगुरुचरित्रातील अनेक कथा केवळ चमत्कारांच्या व...
02/08/2026

श्री गुरुचरित्र अध्याय ५० - श्रीगुरूंचा अवतारसमाप्तीचा निर्णय.... 🌺🌺🌺🌺🌺🙏

श्रीगुरुचरित्रातील अनेक कथा केवळ चमत्कारांच्या वर्णनासाठी नाहीत, तर मानवाला धर्म, भक्ती, समता आणि गुरुकृपेचे गूढ समजावून सांगण्यासाठी आहेत. त्यातील रजकाची कथा ही अशाच दिव्य प्रसंगांपैकी एक आहे. ही कथा आपल्याला सांगते की, जन्म, जात, परिस्थिती किंवा बाह्य रूप यावर परमेश्वराची कृपा अवलंबून नसते. भक्ताच्या अंतःकरणातील श्रद्धा, पूर्वजन्मीचे संस्कार आणि गुरूवरील निष्ठा यांना परम महत्त्व असते.

श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या काळात कुरवपूर येथे एक रजक श्रीपादयतींची अत्यंत भक्तिभावाने सेवा करीत असे. त्याची सेवा, नम्रता आणि श्रद्धा पाहून श्रीपादयती त्याच्यावर प्रसन्न झाले. त्या रजकाने आपल्या जीवनातील साधेपणा आणि सेवाभावाने गुरुकृपा प्राप्त केली होती. त्यावेळी श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद देत सांगितले होते, "तू पुढील जन्मी बैदूरनगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी पुन्हा अवतार घेऊन तुला भेटेन."

काळ पुढे सरकला. श्रीगुरूंचे वचन सत्य झाले. तोच रजक पुढील जन्मी यवन कुळात जन्माला आला आणि बैदूरनगराचा राजा झाला. पूर्वजन्मातील पुण्याई आणि श्रीगुरूंच्या सेवेमुळे जरी त्याचा जन्म वेगळ्या धर्मात झाला होता, तरी त्याच्या अंतःकरणातील संस्कार दिव्य होते. तो अत्यंत सदाचारी, उदार, न्यायप्रिय आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. राज्य, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य त्याच्या पायाशी होते; परंतु या सर्वांपेक्षा त्याच्या मनात माणुसकी आणि धर्मभावना मोठी होती. तो सर्व धर्मांना समान मान देत असे. कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नसे. गरिबांना मदत करणे, ब्राह्मणांना दान देणे, साधू-संतांचा सन्मान करणे आणि धार्मिक स्थळांना सहाय्य करणे हे त्याच्या जीवनाचे अंग झाले होते. त्याच्या राज्यात अनेक मंदिरे आणि मठ होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः यवन असूनही त्याने कधीही हिंदू धर्मस्थळांना त्रास दिला नाही. उलट तो त्यांना उदारपणे मदत करीत असे. त्याच्या या वागण्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असे.

परंतु काही लोकांना त्याचा हा धर्मसमभाव आवडत नव्हता. त्याचे यवन पुरोहित एकदा त्याला म्हणाले, "महाराज, आपण यवन धर्माचे आहात आणि हिंदूंचा धर्म वेगळा आहे. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागले पाहिजे. त्यांच्या देवांची पूजा करणे, त्यांच्या ब्राह्मणांचा सन्मान करणे योग्य नाही. ते दगड, वृक्ष, पाषाण, अग्नी, सूर्य, नदी आणि तीर्थ यांना देव मानतात. ते निराकार परमेश्वराला साकार रूप देतात. अशा लोकांची सेवा केल्याने आपला अधःपात होईल."

पुरोहिताचे हे शब्द ऐकून राजाला अत्यंत वाईट वाटले. त्याने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिले, "तुम्हीच सांगता की परमेश्वर अणुरेणूत, तृणात, काष्ठात सर्वत्र आहे. जर परमेश्वर सर्वव्यापी आहे, तर त्याची उपासना कोणत्याही रूपाने केली तरी ती त्याच परमेश्वराचीच उपासना आहे."
राजा पुढे म्हणाला, "ही संपूर्ण सृष्टी त्या एकाच परमेश्वराने निर्माण केली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून सर्व जीव निर्माण झाले आहेत. कुंभार एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी बनवतो, पण त्या सर्वांमध्ये माती एकच असते. त्याचप्रमाणे शरीर वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करणारा आत्मा एकच आहे."
"गाईंचे रंग वेगवेगळे असले तरी त्यांच्या दुधाचा रंग एकच असतो. तसेच मानवजाती वेगवेगळी दिसत असली तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच आहे. 'नाना देही देव एक विराजे' हेच सत्य आहे. मग आपले मत श्रेष्ठ आणि दुसऱ्याचे चुकीचे असे मानून परस्परांची निंदा कशासाठी करावी?"
राजाचे हे विचार ऐकून पुरोहित निरुत्तर झाले. कारण त्या राजाने धर्माचा खरा अर्थ समजून घेतला होता. धर्म म्हणजे द्वेष नव्हे, तर प्रेम, सहिष्णुता आणि सत्याचा मार्ग होय.

काही काळ लोटला. एक दिवस त्या यवन राजाच्या मांडीवर मोठा फोड झाला. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले; पण हळूहळू त्याची वेदना वाढू लागली. अनेक वैद्य, हकीम आणि औषधोपचार करूनही त्याला आराम मिळेना. दिवस-रात्र तो वेदनांनी तळमळत असे.
त्याच वेळी श्री नृसिंहसरस्वती गाणगापुरात वास्तव्यास होते. श्रीगुरूंना अंतर्ज्ञानाने समजले की, पूर्वजन्मातील तो रजक आता यवन राजा झाला असून तो आपली भेट घेण्यासाठी येईल. परंतु जर तो राजा गाणगापुरात आला, तर काही ब्राह्मणांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी काही काळ गुप्त राहण्याचा विचार केला.
श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, "यावर्षी गुरु सिंह राशीत आहेत. या निमित्ताने आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करूया. यात्रेची तयारी करा."

इकडे राजा आपल्या रोगाने अधिकच त्रस्त झाला होता. शेवटी त्याने काही विद्वान ब्राह्मणांना बोलावून विचारले, "माझ्या या व्याधीसमोर सर्व वैद्य आणि हकीम असहाय झाले आहेत. कोणत्याही औषधाने फायदा होत नाही. आता मला कोणता उपाय करावा?"
ब्राह्मणांनी सांगितले, "राजा, काही वेळा पूर्वजन्मातील कर्मांचे फळ रोगरूपाने प्रकट होते. जेव्हा मानवी उपाय संपतात, तेव्हा दैवी उपाय करावे लागतात. तीर्थयात्रा, दानधर्म किंवा एखाद्या महान संताची सेवा यामुळे अशा संकटातून मुक्ती मिळू शकते. सत्पुरुषांच्या कृपादृष्टीने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात."
हे ऐकून राजा भावुक झाला. तो म्हणाला, "मला केवळ यवन म्हणून पाहू नका. मी पूर्वजन्मी श्रीगुरूंच्या चरणांची सेवा केली आहे. काही कर्मामुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला. पण माझ्या अंतःकरणात आजही श्रीगुरूंची भक्ती आहे. मला योग्य मार्ग दाखवा."
ब्राह्मणांनी त्याला गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर जाऊन स्नान करण्याचा आणि तेथे प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. राजा एकटाच पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने श्रद्धेने स्नान केले. त्याच वेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला नमस्कार केला आणि आपल्या व्याधीबद्दल विचारले. संन्यासी म्हणाला, "एखाद्या महान अवतारी पुरुषाचे दर्शन झाले आणि त्यांची कृपा प्राप्त झाली तर तुझा रोग नक्की नाहीसा होईल."
हे सिद्ध करण्यासाठी त्या संन्याशाने त्याला एक प्राचीन कथा सांगितली.

पूर्वी अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. जन्माने तो ब्राह्मण होता; परंतु आचरणाने मात्र तो ब्राह्मणत्वापासून दूर गेला होता. त्याने वेदाध्ययन, संध्यावंदन, देवपूजा, सदाचार आणि ब्राह्मणाचे सर्व कर्तव्य पूर्णपणे सोडून दिले होते. तो विषयवासनेत बुडाला होता. अहंकार आणि दुर्गुणांनी त्याचे जीवन भरून गेले होते.
तो पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याबरोबरच भोजन करीत असे आणि सर्व प्रकारचे अधर्माचे जीवन जगत असे. समाजाच्या दृष्टीने तो पतित झाला होता. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने कोणताही जीव कायमचा पतित नसतो. एखाद्या क्षणी घडलेली सत्कृतीही भविष्यात मोठ्या परिवर्तनाचे कारण बनू शकते.

एक दिवस त्या ब्राह्मणाच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्याने त्याचे संपूर्ण भविष्य बदलून टाकले.
ऋषभ नावाचे एक महान योगी त्या वेश्येच्या घरी आले. त्या योगीच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि दिव्य उपस्थितीने त्या दोघांच्या मनात आदर निर्माण झाला. पूर्वी कितीही चुकीचे जीवन जगले असले तरी त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणातील सुप्त संस्कार जागृत झाले. त्या ब्राह्मणाने आणि पिंगलेने त्या महायोगीला पाहताच नम्रपणे साष्टांग नमस्कार केला. त्यांना आदराने घरात आणले. मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांच्या चरणांचे तीर्थ घेतले. त्यांना उत्तम भोजन दिले. रात्री त्या योगीला विश्रांती मिळावी म्हणून त्यांनी स्वतः त्यांची सेवा केली. त्यांच्या चरणांची सेवा करत ते रात्रभर जागे राहिले.
ऋषभ योगी त्यांच्या या सेवाभावाने प्रसन्न झाले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले.
बाहेरून पाहता ही घटना अत्यंत साधी वाटते; परंतु एका महान संताची मनापासून केलेली सेवा किती मोठे पुण्य निर्माण करू शकते, याचे हे उदाहरण होते.
काळ पुढे गेला. त्या ब्राह्मणाचा आणि पिंगला वेश्येचा मृत्यू झाला. ऋषभ योगींची निःस्वार्थ सेवा केल्यामुळे त्यांच्या जीवनातील पापसंस्कार नष्ट झाले आणि पुढील जन्मात त्या ब्राह्मणाचा जन्म दशार्ण देशाचा राजा वज्रबाहू यांच्या घरी झाला. त्याला राजपुत्राचे वैभव प्राप्त झाले. परंतु पूर्वकर्मांचा काही अंश शिल्लक असल्यामुळे त्याच्या जीवनात पुन्हा एक कठीण परीक्षा आली.

राजा वज्रबाहूची पत्नी सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरामुळे तिला विष दिले. त्या विषामुळे सुमतीचा मृत्यू झाला नाही; पण तिच्या संपूर्ण शरीरावर मोठमोठे फोड आले. तिची अवस्था अत्यंत दुःखद झाली. योगायोगाने त्या अवस्थेतच तिला पुत्रप्राप्ती झाली. परंतु त्या नवजात बालकाच्या शरीरावरही फोड आले होते. आई आणि मुलगा दोघेही असह्य वेदना सहन करीत होते.
राजाने मोठमोठ्या वैद्यांना बोलावले. अनेक औषधोपचार केले. विविध उपाय केले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. राणी आणि राजपुत्राच्या वेदना दिवसेंदिवस वाढत होत्या.
राजाला आपल्या पत्नीचे आणि मुलाचे दुःख पाहवत नव्हते. शेवटी कठोर मनाने त्याने निर्णय घेतला. त्याने काही सेवकांना बोलावून सांगितले, "या दोघांना दूर निर्जन अरण्यात नेऊन सोडा."
राजाच्या या निर्णयाने राजवाड्यातील सर्व लोक दुःखी झाले. अनेकांनी राजाला दोष दिला. परंतु नियतीचे चक्र कोणालाही समजत नाही.
सेवकांनी सुमती आणि तिच्या मुलाला एका निर्जन जंगलात सोडून दिले. सुमतीचे दुःख शब्दांत सांगता येणार नव्हते. शरीर रोगाने त्रस्त होते, पतीने त्याग केला होता आणि हातात असलेला मुलगाही व्याधीने पीडित होता. तरीही आईचे हृदय आशेचा त्याग करीत नव्हते. ती आपल्या मुलाला घेऊन जंगलातून भटकू लागली. अन्न नव्हते, पाणी नव्हते, राहण्याची सोय नव्हती. शरीरातील वेदना आणि मनातील दुःख या दोन्हींचा सामना ती करीत होती. काही वेळाने तिला काही गुराखी दिसले. तिने त्यांच्याकडे पाण्याची विनंती केली. त्या गुराख्यांनी तिला सांगितले, "तू पुढे जा. तेथे एक मंदिर आहे. तेथे तुला निवारा आणि अन्न मिळेल." सुमती आपल्या मुलाला घेऊन पुढे चालत गेली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक सुखी आणि समाधानी दिसत होते. तिने काही स्त्रियांना विचारले, "या गावाचा प्रमुख कोण आहे?"
त्या स्त्रिया म्हणाल्या, "या गावाचा प्रमुख पद्माकर नावाचा वैश्य आहे. तो अत्यंत पुण्यवान, दयाळू आणि धर्मशील आहे. तो गरिबांना मदत करतो. तू त्याच्याकडे जा. तो तुला नक्की आश्रय देईल."
त्याच वेळी पद्माकराची एक दासी तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून तिचे मन द्रवले. तिने त्यांना आपल्या मालकाकडे नेले.
पद्माकराने त्यांना पाहताच कोणताही विचार न करता आश्रय दिला. त्यांच्या अन्न-वस्त्राची व्यवस्था केली. आजारी असूनही त्यांना प्रेमाने सांभाळले.

परंतु नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती.

एक दिवस त्या राजपुत्राचा मृत्यू झाला. आपला एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख सुमतीला सहन झाले नाही. ती जमिनीवर कोसळली. आक्रोश करू लागली. तिच्या दुःखाला सीमा उरली नाही.
तेव्हा तिच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे एक दिव्य घटना घडली.
महायोगी ऋषभ पुन्हा तेथे प्रकट झाले. पद्माकराने त्या तेजस्वी योगीला पाहताच नमस्कार केला आणि भक्तिभावाने त्यांची पूजा केली.
ऋषभ योगींनी घरात रडण्याचा आवाज ऐकला आणि विचारले, "येथे कोण रडत आहे? काय झाले आहे?"
पद्माकराने सुमती आणि तिच्या मुलाची संपूर्ण कथा सांगितली.

ती ऐकून ऋषभ योगींना त्या मायलेकरांची दया आली. ते सुमतीजवळ गेले आणि प्रेमाने म्हणाले,
"माते, तू एवढा शोक का करतेस? या जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. या संसारात कोण कायमचे राहिले आहे?"
"हा देह नश्वर आहे. गंगेच्या पाण्यावर निर्माण होणाऱ्या फेसाप्रमाणे आणि पाण्यातील बुडबुड्याप्रमाणे हे जीवन क्षणभंगुर आहे."
"जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार घडत असतात. आई, वडील, पुत्र, पत्नी ही सर्व नाती परमेश्वराने दिलेली आहेत; परंतु ती मायेच्या बंधनामुळे निर्माण झालेली आहेत."
"मला सांग, मागील जन्मी तू कोणाची आई होतीस? कोणाची पत्नी होतीस? कोण तुझा पुत्र होता? हे तुला आठवते का? नाही ना? मग या जन्मातील नात्यांसाठी इतका शोक का करायचा?"
"म्हणून दुःख सोड आणि परमेश्वराच्या चरणी मन अर्पण कर."

परंतु आईचे हृदय तर्काने शांत होत नाही. सुमती म्हणाली, "योगीराज, माझे दुःख तुम्हाला कसे सांगू? मी रोगाने त्रस्त आहे. माझे राज्य गेले. माझ्या पतीने माझा त्याग केला. आता माझा प्राणाहून प्रिय पुत्रही मला सोडून गेला. अशा अवस्थेत मी कशी जगू?" सुमतीचे दुःख पाहून ऋषभ योगींचे हृदय द्रवले.
त्यांनी आपल्या कमंडलूमधील पवित्र भस्म घेतले. मंत्रोच्चार करून ते मृत बालकाच्या शरीरावर लावले आणि त्याच्या मुखात थोडे भस्म ठेवले.

क्षणात एक अद्भुत घटना घडली.

मृत बालकाने डोळे उघडले. सुमतीला विश्वासच बसेना. ऋषभ योगींनी पुन्हा भस्म घेऊन त्या मायलेकरांच्या शरीरावर लावले. क्षणात त्यांच्या शरीरावरील सर्व फोड नाहीसे झाले. त्यांचे शरीर तेजस्वी झाले. त्यांना आरोग्य आणि सौंदर्य प्राप्त झाले.
ऋषभ योगींनी त्यांना आशीर्वाद दिला, "तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल. वृद्धत्व तुमच्यावर सहज परिणाम करणार नाही. तुझा पुत्र महान कीर्ती प्राप्त करील आणि आपल्या वंशाचे नाव उज्ज्वल करील."
असे सांगून ते योगी तेथून अदृश्य झाले.

ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला,
"राजा, ज्या प्रकारे ऋषभ योगींच्या कृपेने असह्य दुःख दूर झाले, त्याचप्रमाणे एखाद्या महान संताच्या कृपेने तुझी व्याधीही नाहीशी होईल. त्यामुळे चिंता करू नकोस. श्रद्धा ठेव."

हे ऐकून यवन राजा उत्सुक झाला. त्याने विचारले, "मला त्या सत्पुरुषांचे दर्शन कोठे होईल? मला त्यांच्याकडे घेऊन चला."
संन्यासी म्हणाला,
"गाणगापूर येथे भीमा-अमरजा संगमाच्या जवळ श्री नृसिंहसरस्वती नावाचे महान संत आहेत. त्यांचे दर्शन घेताच तुझा रोग दूर होईल." हे ऐकताच राजाने विलंब केला नाही. तो त्वरित गाणगापूरच्या दिशेने निघाला. गाणगापूरच्या दिशेने निघालेला तो यवन राजा अत्यंत आतुर झाला होता. त्याच्या मनात एकच भावना होती, "ज्या गुरूंची सेवा मी पूर्वजन्मी केली, ज्यांनी मला पुढील जन्मी भेटण्याचे वचन दिले, त्या माझ्या गुरूंचे दर्शन मला पुन्हा कधी मिळेल?"

राजा मोठ्या आशेने, पण गुप्तपणे गाणगापूर येथे पोहोचला. तेथे आल्यावर त्याने गावातील लोकांना विचारले, "येथे एक महान संन्यासी आहेत असे ऐकले आहे. ते श्री नृसिंहसरस्वती कोठे आहेत?"
राजाच्या तोंडून हे शब्द ऐकताच गावातील लोक घाबरले. कारण तो यवन राजा होता आणि श्रीगुरू ब्राह्मण समाजात अत्यंत पूज्य होते. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की, हा राजा श्रीगुरूंना भेटून काय करणार? काही अनर्थ तर होणार नाही ना?
ते एकमेकांकडे पाहू लागले; परंतु भीतीपोटी कोणीही काही बोलत नव्हते.
राजाला हे पाहून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "तुम्ही घाबरू नका. मी श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. मला त्यांच्याबद्दल अत्यंत श्रद्धा आहे. मला फक्त त्यांचे स्थान सांगा."
तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, "श्रीगुरू दररोज मध्यान्हकाळी भीमा-अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर ते मठात परत येतात. सध्या ते संगमावर असतील."

हे ऐकताच राजाने आपला सर्व लवाजमा मागे ठेवला. त्याला आता राजेपणाचा अभिमान नव्हता. तो केवळ एक भक्त झाला होता. तो एकटाच मेण्यात बसून भीमा-अमरजा संगमाच्या दिशेने निघाला.
दुरूनच त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले.
त्या क्षणी त्याचे हृदय भरून आले. पूर्वजन्मातील संस्कार जागृत झाले. त्याला जाणवले की, हेच ते माझे गुरू आहेत, ज्यांच्या चरणांची मी पूर्वी सेवा केली होती. राजा त्वरित मेण्यातून खाली उतरला. राजाचा गर्व, वैभव आणि अहंकार त्या क्षणी नाहीसा झाला. तो पायी चालत श्रीगुरूंच्या चरणांजवळ गेला आणि नम्रपणे हात जोडून उभा राहिला.

श्रीगुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, "काय रे रजका! तुझी आणि माझी पूर्वी भेट झाली होती. कितीतरी वर्षांनंतर तू पुन्हा माझ्याकडे आलास."

श्रीगुरूंच्या या शब्दांनी राजाच्या अंतःकरणात जणू प्रकाश निर्माण झाला. त्याला आपल्या पूर्वजन्माची संपूर्ण आठवण झाली. तो थरथरत्या शरीराने खाली पडला आणि श्रीगुरूंच्या चरणांवर साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या चरणपादुकांवर मस्तक ठेवून तो अश्रू ढाळू लागला. त्याचे शरीर रोमांचित झाले. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
तो म्हणाला, "स्वामी, आपण माझ्यावर कृपा केली. पण मी किती दुर्दैवी! आपण माझ्या जवळ होता, तरी मी आपल्याला ओळखू शकलो नाही. आपल्या चरणांपासून दूर गेलो. संसाराच्या मोहात आणि अहंकारात मी आपल्याला विसरलो."
"आपण कधीही आपल्या भक्तांचा त्याग करीत नाही. मग मला अज्ञानाच्या अंधकारात का पडू दिले? आता मला आपल्या चरणांचा आश्रय द्या. माझा या संसारातील भ्रम दूर करा. मला पुन्हा आपल्या सेवेत स्थान द्या."
श्रीगुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, "राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील."
हे ऐकून राजाने नम्रपणे आपली व्यथा सांगितली, "स्वामी, माझ्या मांडीवर एक मोठा फोड झाला आहे. त्याच्या वेदना मला असह्य होत आहेत. आपण कृपादृष्टीने माझ्याकडे पाहावे."

श्रीगुरू हसले आणि म्हणाले, "अरे, तो फोड कोठे आहे? मला दाखव." राजाने आपल्या मांडीकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाला.
ज्या फोडामुळे तो इतके दिवस वेदना सहन करीत होता, तो फोड पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, "स्वामी, ही आपलीच कृपा आहे. आपण मला रोगमुक्त केले. मला राज्य, संपत्ती आणि सुख दिले. पूर्वजन्मातील माझ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्याकडे असलेले सर्व वैभव हे आपल्या कृपेचेच फळ आहे."
"आता माझी एकच इच्छा आहे, आपण एकदा माझ्या राजधानीत यावे आणि मला आपल्या चरणांची सेवा करण्याची संधी द्यावी." राजाची भक्ती पाहून श्रीगुरूंना आनंद झाला. परंतु त्यांनी शांतपणे उत्तर दिले, "राजा, आम्ही संन्यासी आहोत. आम्ही तुझ्या नगरात कसे येणार? तेथे हिंसा आणि अनेक पापकर्मे चालतात. गोहत्या ज्या ठिकाणी होते, अशा ठिकाणी आमचे जाणे योग्य नाही."
राजा विनम्रपणे म्हणाला, "स्वामी, हे सर्व माझ्या राज्यातील दोष आहेत. पण माझे हृदय आपल्याच्या चरणाशी जोडलेले आहे. माझा पूर्वजन्म रजकाचा होता. आपल्या आशीर्वादामुळे मला राज्य आणि ऐश्वर्य मिळाले. आता आपण एकदा माझ्या घरी आलात तर माझे जीवन धन्य होईल."

राजाची प्रार्थना ऐकून श्रीगुरू विचार करू लागले.
त्यांना जाणवले की, पुढे कलियुगात यवनांची सत्ता वाढेल. जर ते सतत प्रकट रूपात राहिले आणि हा राजा त्यांचा भक्त झाला हे सर्वांना समजले, तर अनेक लोक गाणगापूरात येतील आणि तेथील ब्राह्मण व भक्तांना त्रास होईल. म्हणून त्यांनी विचार केला,
"आता योग्य वेळ आली आहे की, आपण बाह्य रूपाने गुप्त व्हावे आणि सूक्ष्म रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी येथेच राहावे."

मग त्यांनी राजाला सांगितले, "ठीक आहे राजा. तुझी इच्छा पूर्ण होईल."
राजाने श्रीगुरूंना मेण्यात बसवले. त्यांच्या पादुका आपल्या हातात घेतल्या आणि स्वतः पायी चालू लागला.
श्रीगुरूंनी त्याला सांगितले, "राजा, तू माझी सेवा करीत आहेस हे पाहून तुझ्या प्रजेतील काही लोक तुझी निंदा करतील. तू मेण्यात बस."
परंतु राजाने नम्रपणे उत्तर दिले, "स्वामी, मी आपला दासानुदास आहे. आपल्या चरणांच्या सेवेसमोर माझे राजपद काहीच नाही."
तो पायीच चालत राहिला.
राजाचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले.
राजाने आपल्या सोबत आणलेले मोठे वैभव, लवाजमा आणि राजेशाही व्यवस्था पाहून श्रीगुरू म्हणाले,
"राजा, या मोठ्या लवाजम्यासह जाण्यास उशीर होईल. माझ्या नित्य अनुष्ठानात अडथळा येईल. तू पुढे जा. मी योग्य वेळी तुझ्या नगरीत येईन." राजा नम्रपणे निघून गेला.

त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह अदृश्य झाले आणि मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर आले.
तेथे सायंदेव साखरे यांचा पुत्र नागनाथ याला श्रीगुरू आल्याचे समजले. तो त्वरित त्यांच्या दर्शनासाठी आला.
श्रीगुरू अनुष्ठानाला बसले होते. नागनाथाने त्यांना आपल्या घरी नेले. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. मोठ्या प्रेमाने भोजनाची व्यवस्था केली.
श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला.
नंतर ते म्हणाले, "आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला भेटण्यासाठी येथे येणार आहे. जर मी येथे दिसलो नाही आणि तो तुमच्या घरी आला, तर तुम्हा ब्राह्मणांना त्याचा त्रास होईल." असे सांगून श्रीगुरू पुन्हा पापविनाशी तीर्थावर गेले. ठरल्याप्रमाणे यवन राजा तेथे आला.
त्याने श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि मोठ्या भक्तिभावाने वाजतगाजत आपल्या राजधानीत नेले.

राजधानीत श्रीगुरूंचे आगमन होताच एक अद्भुत वातावरण निर्माण झाले. राजाच्या मनात आज केवळ आनंद नव्हता, तर अनेक जन्मांची तपश्चर्या पूर्ण झाल्याची भावना होती. ज्यांच्या चरणांची सेवा पूर्वजन्मी केली होती, ज्यांनी पुढील जन्मी भेटण्याचे वचन दिले होते, तेच श्रीगुरू आज स्वतः त्याच्या घरी आले होते.
राजाने अत्यंत भक्तिभावाने श्रीगुरूंना राजवाड्यात आणले. त्या वेळी त्याने राजा म्हणून नव्हे, तर एक नम्र शिष्य म्हणून श्रीगुरूंचे स्वागत केले. त्याने श्रीगुरूंना उंच आसनावर बसवले आणि त्यांच्या चरणांची पाद्यपूजा केली.
राजाने स्वतःच्या हातांनी श्रीगुरूंच्या चरणांना पाणी अर्पण केले. त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकावर धारण केले. त्याच्यासाठी त्या क्षणी राज्य, संपत्ती, वैभव आणि प्रतिष्ठा यांना काहीही महत्त्व उरले नव्हते. त्याच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे श्रीगुरूंचे दर्शन आणि चरणसेवा होती.
राजाने श्रीगुरूंसोबत आलेल्या सर्व शिष्यांचाही आदर केला. त्यांची योग्य व्यवस्था केली. मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. ब्राह्मण, साधू, याचक आणि गरजू लोकांना उदारपणे दान दिले.
श्रीगुरूंच्या आगमनामुळे संपूर्ण राजधानीत भक्तीचे वातावरण निर्माण झाले. अनेक लोकांना श्रीगुरूंचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. अनेकांच्या मनातील शंका दूर झाल्या. अनेकांना आध्यात्मिक समाधान प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, ज्या राजाला काही लोक केवळ त्याच्या जन्मामुळे वेगळ्या दृष्टीने पाहत होते, त्याच राजाच्या अंतःकरणातील भक्ती पाहून श्रीगुरूंनी त्याच्यावर कृपा केली होती.

यामधून एक महान संदेश मिळतो - परमेश्वराला बाह्य ओळख, जात, धर्म किंवा परिस्थिती महत्त्वाची नसते; तो केवळ भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा पाहतो.

काही दिवसांनी श्रीगुरूंनी राजाला एकांतात बोलावले. प्रेमाने विचारले,
"राजा, आता तू समाधानी आहेस ना? तुझी आणखी काही इच्छा आहे का? काही मागायचे असेल तर निःसंकोचपणे सांग."
राजा नम्रपणे म्हणाला, "स्वामी, मला आता कोणत्याही भौतिक सुखाची इच्छा नाही. राज्य, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य हे सर्व मला मिळाले. परंतु माझ्या मनाला खरी शांती केवळ आपल्या चरणसेवेत मिळते."
"माझी एकच इच्छा आहे - मला सदैव आपल्या चरणांची सेवा मिळावी. मला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवा. मला या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तीचा मार्ग सांगा."
राजाच्या या शब्दांमध्ये खरी भक्ती होती. त्याला आता संसारातील सुखांची आसक्ती राहिली नव्हती. त्याला गुरुकृपा आणि आत्मज्ञानाची इच्छा होती.

श्रीगुरू प्रसन्न झाले.
ते म्हणाले, "राजा, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. तू आता आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपव. त्यानंतर श्रीशैल पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल."
राजाने श्रीगुरूंच्या आज्ञेचा स्वीकार केला.

यानंतर श्रीगुरूंनी गौतमी नदीच्या परिसरातील तीर्थयात्रा केली आणि पुन्हा गाणगापूर येथे परत आले.
श्रीगुरू गाणगापुरात परत आल्याचे समजताच सर्व शिष्य आणि भक्त अत्यंत आनंदित झाले. त्यांनी मंगल आरती केली. भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले.

परंतु श्रीगुरूंच्या मनात आता एक वेगळाच विचार सुरू होता.

त्यांनी सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, "माझी सर्वत्र कीर्ती पसरली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून अनेक लोक आपल्या इच्छापूर्तीसाठी येथे येतील. त्यांच्या येण्यामुळे येथील ब्राह्मणांना आणि भक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे."
"म्हणून आता मी बाह्य रूपाने येथे अधिक काळ राहणार नाही. मी श्रीशैल यात्रेला जाणार आहे."
हे ऐकून शिष्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांना वाटले की आता श्रीगुरू त्यांना सोडून जाणार. परंतु श्रीगुरूंनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले,
"तुम्ही दुःखी होऊ नका. मी केवळ बाह्य रूपाने दूर जाणार आहे. सूक्ष्म आणि अदृश्य रूपाने मी सदैव गाणगापुरातच वास्तव्य करीन."
"जे भक्त श्रद्धेने माझे स्मरण करतील, माझी सेवा करतील, त्यांच्यावर माझी कृपा सदैव राहील."

हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गुरु केवळ शरीररूपाने आपल्या जवळ असतात असे नाही. खरा गुरु आपल्या शिष्याच्या श्रद्धेत, स्मरणात आणि आचरणात सदैव उपस्थित असतो.

ही कथा सांगताना सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात,
"श्रीगुरूंची महिमा शब्दांनी वर्णन करता येणार नाही. त्यांनी गाणगापुरात वास्तव्य केले हे मी स्वतः अनुभवले आहे. जे भक्त श्रद्धा, निष्ठा आणि प्रेमाने त्यांची उपासना करतात, त्यांच्या योग्य इच्छा ते पूर्ण करतात."
"गाणगापूर हे साधे स्थान नाही. तेथे श्रीगुरूंची सूक्ष्म उपस्थिती आहे. तेथे जाणारा भक्त रिकाम्या हाताने परत येत नाही."
"ज्याप्रमाणे कल्पवृक्षाखाली बसलेल्या मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात, त्याचप्रमाणे श्रीगुरूंच्या चरणी श्रद्धेने गेलेल्या भक्ताच्या जीवनात योग्य वेळी कृपा प्रकट होते."

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
|| अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌺🌺🙏🌺🌺

#पंढरपूर #गुरुवार #प्रवचने #माऊली

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when दत्त आराधना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category