27/09/2025
आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ६ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण प्रेमस्वरूपा शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहोत.हिंदूस्थान ही संतांची भूमी ,देवभूमी आहे.आसेतू हिमालय आजवर लाखो संत या परम पवित्र भूमीवर अवतार धारण करुन आले,जगाला दिशा देण्याचे अफाट कार्य त्यांनी केले,अनेक मुमुक्षू ,आर्त जिज्ञासू,शरणागतांचे इह पारलौकिक कल्याण केले व आपल्या निर्गुण रुपात आजही आपल्या लिला स्थानी ,समाधी स्थानी विराजमान झालेले आहेत.अशाच जगविख्यात संतांपैकी एक असलेल्या महान विभूती म्हणजे "श्री आनंदमयी माॅं " या एक आहेत. मॉं म्हणजे प्रत्यक्ष भगवती होत्या याची प्रचिती त्यांच्या चरित्र वाचनानंतर आपल्याला येतेच.मॉं चा अधिकार इतका विलक्षण होता की त्यांच्या भेटीस्तव ,दर्शनाला अनेक साधू ,संत,संन्यासी, योगी ,सिद्ध ,साधक यायचे.मॉं च्या नुसत्या दर्शनाने ही कित्येक भक्त आनंदाची अनुभूती घेत असत.अशा या दिव्य विभुतीचे आज आपण संक्षिप्त चरित्र लेखातून स्मरण करणार आहोत.
आनंदमयी मॉं यांचा जन्म वैशाख कृष्ण तृतीया, दिनांक ३० एप्रिल १८९६ रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील खेओडा या गावात झाला. आज हे गाव बांगलादेशात आहे. त्यांचे वडील श्री. विपिनबिहारी भट्टाचार्य हे विष्णूभक्त होते आणि माता मोक्षदा या अत्यंत सात्विक, धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना कन्यारत्न झाल्यावर त्यांनी त्या बालिकेचे नाव ठेवले “निर्मला” – अगदी त्यांच्या गुणधर्माला साजेसे नाव. बाल्यावस्थेपासूनच निर्मला या असामान्य आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले. कुठेही कीर्तन चालू असले की त्या बालिका तिथे सहज भावसमाधीत जात. स्वतः मॉं सांगत असत की बालपणापासूनच त्यांना भावावस्था लागत असे. त्यांना एका वर्षापासून घडलेल्या घटना, भेटलेल्या व्यक्ती सगळे काही स्पष्टपणे आठवत असे. बाल्यावस्थेतच त्यांना आकाशात देवी-देवतांचे दर्शन होत असे. घरची परिस्थिती विशेष चांगली नसली तरी त्यांच्या मनातील दैवी भावनेला कधी खंड पडला नाही. दोन वर्षांपासून त्यांचे शालेय शिक्षण सुरु झाले, परंतु त्या शाळेत फार काळ राहिल्या नाहीत. तरीसुद्धा त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. शिक्षक म्हणत की त्या एकपाठी आहेत, म्हणजे जे शिकवले ते लगेच लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह ढाका विक्रमपूर येथील श्री. रमणीमोहन चक्रवर्ती (भोलानाथ) यांच्याशी झाला. विवाहानंतरही त्या पाच वर्षे आपल्या चुलतभावाकडे राहिल्या. त्या काळात त्या अजून गाढ ध्यान, भजन, देवपूजेत रमल्या. वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले नव्हते, तरी त्या अगदी अचूकपणे देवपूजा करीत. यामुळेच शेजारीपाजारी त्यांना “मॉं” म्हणून संबोधू लागले. १९१८ साली मॉं आपल्या पतिसोबत ओष्ठ या गावात राहायला गेल्या. संसार जरी सुरु झाला तरी तो सामान्य नव्हता. जेव्हा जेव्हा भोलानाथ त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत, तेव्हा मॉं चे शरीर मृतवत होत असे. हे पाहून पतीसुद्धा थक्क होत. संसाराच्या व्यवहाराबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तरी मॉं संयम, परमार्थ, सत्संग यांचीच महती सांगत. हळूहळू पतीच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले. मॉं संसारात कमळाप्रमाणे अलिप्त होत्या. त्या पतीची सेवा, स्वादिष्ट भोजन, गृहकृत्ये सर्व करत पण त्याचवेळी ध्यान, भजन, समाधी यांत गढून जात. स्वयंपाक करताना भांडे स्टोवर ठेवून त्या छतावर जाऊन चंद्राकडे त्राटक करीत व तिथून समाधीत जात. परिणामी भांडे जळून खाक होत असे, घरचे रागावत पण त्या हसत चूक मान्य करत. त्यांच्या आयुष्यात अनेक दैवी घटना घडल्या. श्रावणी पौर्णिमेला तर त्यांनी आपल्या ठायी महाकालीचे प्राकट्य केले. मध्यरात्री त्या अचानक उठल्या, पतिला जागे केले आणि महाकालीची पूजा करण्यास सांगितले. त्या क्षणी भोलानाथांना प्रत्यक्ष महाकालीचे दर्शन झाले. या प्रसंगानंतर मॉं नी त्यांना दीक्षा दिली. त्यांच्या पतीचे जीवनच बदलून गेले, ते साधक झाले. यापूर्वीच त्यांचे मामेभाऊ निशिकांत यांच्या उपस्थितीत एक विलक्षण प्रसंग घडला. समाधीस्थितीत मॉं म्हणाल्या, “पूर्णब्रह्म नारायण”. त्यांच्या दिव्य आवाजाने सर्व स्तब्ध झाले. पुढे त्या म्हणाल्या, “महादेवी, महादेव.” अशा या दिव्य उद्घोषांनी लोकांना खात्री पटली की या स्त्रीरूपामध्ये अद्वितीय ब्रह्मशक्ती प्रगट झाली आहे. १९२२ मध्ये त्या २६ वर्षांच्या असताना त्यांनी गहन ध्यानात जाऊन आत्मतत्त्वाशी एकरूपता अनुभवली. जणू त्यांच्या अवतारकार्याला त्यावेळी प्रकट आरंभ झाला. त्या सहज भावसमाधीत राहू लागल्या. त्यांच्या तेजामुळे शेजारी त्यांना “मॉं” म्हणू लागले आणि तेच पुढे त्यांचे जगप्रसिद्ध नाव झाले – आनंदमयी मॉं. १९२९ साली रमणीजवळील कालीमंदिरात त्यांनी पहिला आश्रम स्थापन केला. त्याकाळी त्या बराच काळ मौनात व एकांतवासात राहिल्या. त्यांच्या पतिलाच प्रथम शिष्य होण्याचा मान लाभला. त्यानंतर असंख्य शिष्य त्यांच्या चरणी आले. त्यांच्या दर्शनासाठी हिमालयातील महान योगीसुद्धा येत असत. हरीबाबा, उडिया बाबा, परमहंस योगानंद, अखंडानंद सरस्वती, स्वामी शिवानंद यांसारख्या महापुरुषांनी मॉं च्या दिव्यत्वाची साक्ष दिली. योगानंद म्हणत, "त्या आत्मप्रकाशाने सुसज्ज आणि पूर्णत्व प्राप्त आत्मपुष्प आहेत." पण मॉं मात्र सर्व संतांना प्रेमाने "पिताजी" म्हणत. मोठमोठे राजकारणी, इंदिरा गांधींसारखे नेते, तसेच सामान्य गृहस्थही त्यांच्या चरणी नतमस्तक होत. मात्र मॉं च्या नजरेत सर्व समान. त्या सर्वांवर एकसारखी करुणा माया धरत असत. त्यांचे चरित्र हे पाच खंडांमध्ये, सुमारे तीन-चार हजार पानांमध्ये नोंदवले गेले आहे. असंख्य लिला, उपदेश आणि अलौकिक प्रसंगांचा तो खजिना आहे. पण त्यांच्या कार्याचे संपूर्ण वर्णन शब्दात कधीच मावू शकत नाही. १९८२ मध्ये हरिद्वारजवळील कनखल येथे त्यांनी देहत्याग केला. आज त्यांची समाधी तिथे लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. देश-विदेशात त्यांच्या असंख्य आश्रमांतून आजही त्यांचे स्मरण, उपदेश व कृपा प्रवाहित होत आहे. आनंदमयी मॉं म्हणजेच पूर्णब्रह्माचे साकार स्वरूप, करुणामयी माता, भक्तांसाठी आश्रयदाता. त्यांच्या चरणी शरण गेलेला साधक आजही त्यांच्या अनंत कृपेने धन्य होतो.