Sadbhakti Mandir

Sadbhakti Mandir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sadbhakti Mandir, Hindu temple, Sadbhakti Mandir Saraswati Baug Road, Saraswati Baug, Natwar Nagar, Jogeshwari East, Mumbai.

16/01/2026

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७

भाग २ रा : -

जो यज्ञ तपाचा भोक्ता आहे , तोच सर्व प्राण्यांचा ईश, स्वामी, देवाधिदेव असून अनादी सखा आहे असे जाणून जो त्याची भक्ति करितो, तोच निर्वाण शांतीप्रत जातो. आपण आपल्यावर जेवढी प्रीति करतो, तेवढीच आपल्या ईश्वरावर प्रीति असणे हे खरे प्रीतीचे लक्षण आहे. कदाचित जगातल्या अनेक पदार्थांच्या ठिकाणी आपली अनावडी होण्याचा संभव आहे, पण आपली स्वतःची अनावडी कधीच होऊ शकणार नाही. ज्या आत्म्याची ओळख नसताना त्याच्या विषयी आपले एवढे प्रेम आहे, त्या आत्म्याची ओळख करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तो इतका अत्यंत जिवलग सखा असून त्याची आपणाला का ओळख पटत नाही? “मी पणामुळे”, “अहंकारामुळे” ती पटत नाही, म्हणून त्या अहंकाराचा जर नायनाट केला, तर सहजच कार्य होईल.
“परम आवडी आपुली आपणा I वळख तू तुज टाकुनि मीपणा II”
आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे आत्म्याशी निकट असलेला अहंपणावर प्रेम जडले. देहच ‘मी’ अशी भावना झाल्यामुळे देहावर प्रेम जडले, व पुढे देहाचे जे संबंधी ते आपले संबंधी वाटू लागले. अशा रीतीने गोंधळ वाढतच चालला, आणि आत्म्याबद्दल कोणी चौकशीच करीनासे झाले. देह प्रिय का वाटतो याचा कोणी सारासार विचार करीत नाही. त्याच देहाच्या एका भागाला इजा झाली, व त्यामुळे सर्व देहाला अपाय होण्याचा संभव असला, तर तो भाग कापून टाकण्यास तो तयार होतो. हे असे का? केव्हा केव्हा तर तो देहावरच उदार होतो. म्हणजे आत्महत्या करण्यास तयार होतो याचा बारकाईने शोध केला तर असे कळून येईल की एका आत्म्याच्या अत्यंत प्रीतीमुळे त्याला सुख व्हावे म्हणून तो जीवावर देखील उदार होतो. सेवक आपल्या सुखाकरिता राजाची सेवा करतो. भार्येला पती आपल्याच कार्याकरिता प्रिय होतो. पतीच्या कार्याकरिता नव्हे. देवाच्या कार्याकरिता देव भक्ताला प्रिय होत नसतो, तर आपल्याच कर्माकरिता देव प्रिय होतो. भुक्ती, मुक्ती आपणाला मिळावी एतदर्थ भेदवादी जे आहेत ते देवाची उपासना करतात. म्हणून त्यांचे भजन पूजन निर्निमित्त होत नाही. त्यांच्या इच्छेप्रमाणे जर भजन पूजनाचे फळ मिळाले नाही, तर ते देवाला शिव्या देण्याला कमी करत नाही. परंतु जे माझे भक्त आहेत, ज्यांना मीच हवासा असतो त्याचस भजन निर्निमित्त असते. त्यांना मुक्तीची देखील पर्वा नसते :-
“फिकी मुक्ती भक्ति पुढे ज्ञान याला I
स्वये मुक्ती देती पहाती तयाला II
मुमुक्षुसही कामना मोक्ष कामी I
न भक्तास जे देखती मुक्ती नामी II”
भगवान म्हणतात :- अर्जुना, तू माझा भक्त आहेस, या करिता ती त्रिदोष रहित जी अति पवित्र भक्ति आहे ती कर. त्या भक्तीलाच मुक्तीवरची भक्ति, विमल भक्ति, पराभक्ती असे म्हणतात. या भक्तीचे अवलंबन करणारेच खरे योगीराज. त्यांची योग्यता मी काय सांगू?
“यथेच्छ लोकीं वर्तणार I कोण धरी त्यांचा कर II
श्रुतीचेही शिरावर I वर्ते योगी II
त्या स्थितीला अनुलक्षून तुकाराम महाराज म्हणतात :-
“प्रारब्ध क्रियामाण I भक्तांसंचित नाही जाण II
अवघा देवचि जाला पाही II भरोनिया अंतर्बाही II
सत्त्व रज तम बाधा I नव्हे हरि भक्तांसी कदा II
खाये बोली करी I अवघा त्यांच्या अंगे हरि II
देवभक्त पण II तुका म्हणे नाही भिन्न II”
ज्ञानी भक्त जे जे काही करितो, ते ते त्या भगवंताचेच म्हणून समजतो. असो. या प्रमाणे जो आपला आत्मा तोच मुकुंद असे समजतो, त्यालाच शांती प्राप्त होते. ज्याच्या ठिकाणी अशी भावना नाही, त्याला शांती कोठून मिळणार? शांती प्राप्त होण्याला आधी ज्ञान पाहिजे, व ते मिळण्याला अंत:करण शुद्धी झाली पाहिजे. आरशामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा स्वच्छ असला पाहिजे, नाहीतर प्रतिबिंब बरोबर दिसणार नाही.
“एवं मुक्ती तेव्हा जेव्हा ज्ञान I ज्ञान ते की ज्याने नासे अज्ञान II
अज्ञान ते की आपणास आपण जन I न जाणती II”
सारांश, सर्व भूतांचा सहृदय आत्मा तोच मुक्तीदाता गोविंद असे समजल्याने मुक्ती मिळेल. तो अनुभव येण्याला अन्वय, व्यतिरेख ज्ञानाची जोड पाहिजे. कारण ‘ज्ञानादेव तू कैवल्यम II’ ज्ञान म्हणजे आपणास आपण जाणणे, त्याच्या व्यतिरिक्त तेवढे अज्ञान. मी देह मानणे हा अज्ञान रुपी भ्रम पहिल्याने गेला पाहिजे, कारण तो आहे तो पर्यंत ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. हटयोगादि साधनांनी ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही आणि जोपर्यंत अनुभवजन्य ज्ञानाचा अभाव आहे, तोपर्यंत शांतीचा मागमूस लागणार नाही. जर गाठी द्रव्य असेल, तर बाजारांत गेले असता पदार्थ मिळू शकतील. तद्वत ज्ञान असेल तरच शांती सुख होईल. एरव्ही कोटी साधने जरी केली तरी सुख प्राप्ती होणार नाही हा सिद्धांतच समजावा. शिवाय हेही ध्यानांत ठेवावे की ज्ञान असून भक्तीबळ असेल, तरच शांती सुखाचा लाभ घडेल. नाहीतर “तो वरि तळमळरे, तळमळरे, जो नाही भक्ति बळ रे II
परंतु ज्ञान प्राप्त होणे, अक्षय शांतीचे सुख भोगणे हे केवळ भगवंताच्याच कृपेवर आहे :- “जरि हा हो कृपा करील नारायण I तरि हेंचि ज्ञान ब्रह्म होयII मुमुक्षु आपल्या सामर्थ्यावर ज्ञान मिळविन म्हणून म्हणेल तर ते मुळीच संभवनीय नाही, हाही सिद्धांत लक्षात ठेवावा. भगवंताची कृपा होण्यास, व त्या योगाने हा अलक्ष्य लाभ होण्यास एकच उपाय आहे.
“वर्णाश्रय विहित कर्म, करणे हा प्रथम धर्म, निरहंकृति कंजनयन ध्यात जा रे II सदा श्री हरिचे नाम मुखी गात जा रे II” वर्णाश्रमाला उचित अशी कार्ये करून ती सर्व यज्ञ तयांचा भोक्ता आणि सर्व भूत सुहृदय असा जो महेश्वर त्याला अर्पण केल्याने अंत:करण शुद्धी होईल. कारण भगवान अर्जुनाला म्हणतात :- मला भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांची फार आवड आहे, म्हणून हे कौंतेया,
“यत्तपस्यसि कौंतय तत्कुरुण्व मदर्पणम II”
कोणी मला प्रीतिने काही दिले ते मी मोठ्या प्रेमाने व आनंदाने भक्षण करतो. कारण जे काही भक्तीने माझा भक्त मला देतो, ते मला आवडते :-
”पत्र पुष्प फलं तोयं यो मे भक्तया प्रयच्छति I
तदहं भक्त्युप हृदमश्रामि प्रयतात्मन: II”
त्या मी आपल्या आनंदाच्याच परवडी म्हणून समजतो, व त्याचा मोबदला म्हणून त्याची मी अंत:करण शुद्धी करतो, आणि ज्ञान देऊन भक्ति देतो. मुक्ती माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाच्याच हातात नाही. ज्याने वेद निर्माण केले, आणि ज्याने सृष्टीच्या आदिकाली ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला त्याच देवाला शरण जा. सर्व आपआपल्या परीने ईश्वरच आहेत. परंतु ज्ञान देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य नाही. मी सर्व ईश्वराचा आत्मा आहे असे जाणून जो मला शरण येतो, त्यालाच ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. म्हणून –
“एवं ज्ञाना वांचूनि न घडे मुक्ति I
ते तेव्हा की जेव्हा ईश्वर प्रसादा भिव्यक्ति II
तो प्रसाद होय करिता भक्ति I सर्वेश्वराची II
“पूर्ण करिता भगवद्भक्ति II” ज्ञान प्राप्त होईल. मग ते ज्ञान बाणल्यावर चित्तचैतन्य होईल. चित्तचैतन्य झाल्यावर देखील जो भक्ति करितो, त्या भक्तीला पराभक्ती, विमलभक्ति म्हणतात. त्या भक्तीच्या योगे ज्ञानी भक्त कृतकृत्य होतो. म्हणजे अखंड शांती सुख भोगतो. सारांश भगवानच एक मुक्तीदाता. इतर देवता कितीही सामर्थ्यवान असल्या तरी मोक्ष देऊ शकणार नाहीत, म्हणून वामन पंडित मोठ्या कळकळीने सांगतात :- त्या कृष्ण भगवंताच्याच चरणांचा आश्रय करा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. “अक्षय शांतीचा सुखदाता I केशव कवी म्हणे आता I तो मज आढळतो गुरु राजा I प्राण विसावा माझा II”
- नारायण -

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. १६ जानेवारी २०२६ )

08/01/2026

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
अध्याय – ५
“अध्याय हा पंचमस्वात्म योगी I जो कर्म संन्यास करी सुयोगी II
तो श्रेष्ठ संन्यास म्हणे हरि तो I जो पार्थ मोहास ही संहरीतो II”
दुसऱ्या अध्यायांत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवंतांनी ओघाने असे सांगितले की जो पक्का ज्ञानी आहे त्याला कर्म करण्याची जरुरी नाही, आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटी म्हणून गेले की, बाबा रे, तो कुशल कर्मयोगी आहे, त्यास कर्म करून देखील कर्मफलाची बाधा होत नाही. तर तू आता उठ, अन लढाई करण्यास सुरुवात कर असे ऐकताच अर्जुन बुचकळ्यात पडला की आता मी ह्या दोहींपैकी कोणती क्रिया करू. कारण दोन्ही क्रिया तर एकदम होणार नाहीत, असा दोहींकडून त्याला पेच पडला. कर्म करावे तर आताच लढाई करावी लागेल. तेव्हा त्यातून पार पडण्याचा इलाज भगवंतालाच विचारावा हे बरे, म्हणून अर्जुनाने प्रश्न केला की, हे भगवंता :-
“संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगंच शंससि I
यच्छ्रेय एत योरे कं तन्मे ब्रूहि सूनिश्चीतम II”
तू एकदा म्हणतोस की कर्म टाकून देणे याला संन्यास म्हणतात आणि तो कर्म भोगापेक्षा श्रेष्ठ म्हणून तुझे मत मी ऐकले. परंतु आता तूच मला सांगतोस की कर्म कर. तर कर्मयोग आणि संन्यास या दोहीत फरक काय आणि त्यापैकी श्रेष्ठ कोणते हे मला सांग. हा जो अर्जुनाने प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा आहे. कारण या दोही वाचून मोक्ष प्राप्त होणार नाही. मुमुक्षाला या दोन्हीची आवश्यकता आहे. म्हणून भगवान म्हणतात :-
“संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही श्रेयस्कर होत. परंतु त्या दोहोंमध्ये कर्माच्या संन्यासाहून कर्माचा योग हा श्रेष्ठ आहे.”
अर्जुना मोक्ष प्राप्तीला संन्यास अवश्य पाहिजे आणि कर्मयोग केल्याशिवाय संन्यास होत नाही असे हे परावलंबी आहेत. म्हणून आपले खरे कल्याण म्हणजे मोक्ष प्राप्ती करिता ह्या दोघांची अत्यंत जरुरी आहे. पण हे लक्षात ठेव की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोगच श्रेष्ठ ठरेल. येथे पुन्हा अर्जुन घुटमळला. त्याला असे वाटते की कर्मापेक्षा संन्यास श्रेष्ठच असे असता भगवान संन्यासापेक्षा कर्मयोग थोर कसे म्हणतो? अशी शंका उद्भवल्याबरोबर अंतर साक्षी भगवंताने जाणले की त्याच्या समजुतीमध्ये घोटाळा उडाला आहे, म्हणून कर्मयोग म्हणजे काय ते त्याला पहिल्याने समजावून सांगितले. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मे करून ती ईश्वरार्पण करणे. तसे केले असता चित्तशुद्धीद्वारा ज्ञान प्राप्त होऊन साधक मोक्षा प्रत जातो. जर नुसतीच निष्काम कर्मे केले आणि ती ईश्वरार्पण केली नाही, तर “कर्मणा पितृलोक: II तो पितृ लोकाप्रत जाईल आणि मोक्षाला अंतरेल.
आता संन्यास म्हणजे “काम्यानां कर्मणां न्यासं”, सकाम कर्मांचा समूळ त्याग करणे. हा अर्थ तुला न समजल्यामुळे तू लढाईला प्रवृत्त होत नाहीस. या करिता तू निष्काम कर्मे ईश्वरार्पण कर म्हणजे तेणे करून चित्तशुद्धीद्वारा तुला ज्ञान प्राप्त होईल. मग तुला असा प्रत्यक्ष अनुभव येईल.
“मैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित I
पश्चशृन्वन्स्पृश चिघ्रन्नश्रन्गच्छन्स्वपश्वसन II
प्रलपन्वीसृजन्गृहन्नन्मिषन्नीमिषन्नपि I
इंद्रियाणी द्रियार्धेषु वर्तत इति धारयन II”
अर्जुना! ज्याला आत्म स्वरूपाचे ज्ञान झाले आहे, तो कर्म करीत असतां देखील आपण काही करीत नाही ही भावना ठेवितो व सर्व क्रिया आपोआप प्रकृतीद्वारे घडत असतात हे तो पाहतो. हाच खरा कर्मयोगी आणि त्यालाच कर्म करून व केल्याचे श्रेय येते. “पद्मपत्र मिवात्रसा” म्हणजे “जसे कमलपत्र पाण्यापासून अलिप्त असते, तसा हा योगी कर्मे करून ही कर्मबंधनापासून अलिप्त असतो.
आता जन्मतारी कर्मठ लोकांच्या संगतीत असल्यामुळे ज्यांना कर्म करण्याचीच आवड असते, अशांना जर ज्ञान झाले तर ते कर्मेच करून सिद्ध पुरुष होतात, म्हणजे ते साहित्य, साधन आणि साध्य सर्वच ब्रह्मरूप पाहतात :-
“ब्रह्मार्पण ब्रह्म हनि ब्रह्मा ग्न्नौ ब्रह्मणाहुतम I
ब्रह्मै तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना II”
कित्येक ज्ञान प्राप्त झाल्यावर सांख्य योगाने अभ्यास करून पूर्णत्वास पावतात :-
“प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वश: I
य: तश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति II”
सर्व कर्मे प्रकृतिच करते, आणि आत्मा अकर्ता आहे असे हा योगी दोन्ही निराळे पाहतो, म्हणून त्यालाच अकर्तेपणाचा ठसा उमटतो,
“योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय: I
सर्व भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपिन लिप्यते II”
सिद्ध पुरुष कर्मे करीत असताना देखील आपण अकर्ते आहोत इकडेही लक्ष देत नाही. तरी सुद्धा तो कर्मांमध्ये लिप्त होत नाही. म्हणजे त्याची सर्व कर्मे ब्रह्मातच होत असतात, आणि तेच त्याचे अर्पण. साधक “नैव किंचित्क रोमीति” ह्यात वर्णन केल्याप्रमाणे अनुभव घेतो, व त्याचे कर्म ब्रह्मार्पण होते.
“कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात II
करोनि यद्यत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत II”
पूर्व संस्कारानुरूप सर्व क्रिया आपोआप आपल्याकडून प्रकृति करविते, आणि आपण त्या कर्माचे साक्षी आहोत अशी मुमुक्षु दृढ श्रद्धा ठेवितो. त्या श्रद्धेच्या योगे करून त्याची सर्व कर्मे ईश्वरास अर्पण होत असतात.
पहिल्याने तुला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगण्याचा हेतू हा होता की तू निष्काम कर्मे करून चित्तशुद्धी द्वारा ज्ञान प्राप्त करून घे, आणि मग त्या सुखाचा लाभ घे. जसे फणसाचे गरे खावे म्हणून सांगितले असता, त्या फणसाच्या साली, काटे काढून टाकणे वगैरे ज्या क्रिया आहेत त्या अध्याद्द्त आहेत म्हणून समजाव्या. तसे स्थितप्रज्ञाची स्थिती प्राप्त होण्याच्या पूर्वी ज्या क्रिया कराव्या लागतात, त्याचा तू विचार करत नाहीस, आणि उगाच म्हणतोस की मला कर्म नको, मी लढाई करणार नाही हे बरोबर नाही. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते प्राप्त होण्यास ‘परमपुरुष जो भगवान नारायण, त्याला सर्व कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे निष्काम बुद्धीने करून अर्पण केली पाहिजेत. तो ईश्वर कसा आहे, त्याची पहिल्याने ओळख पटवून घे, आणि मग त्याला वर सांगितल्याप्रमाणे भजले असता तुला अक्षय शांती मिळेल.
“भोक्तार यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम I
सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति II”

क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. ८ जानेवारी २०२६ )

Address

Sadbhakti Mandir Saraswati Baug Road, Saraswati Baug, Natwar Nagar, Jogeshwari East
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadbhakti Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category