16/05/2022
- मोडनिंब ग्रामदैवत श्री.वेताळबाबाची
यात्रा....!
सस्नेह नमस्कार..
आज मोडनिंब गावाच्या इतिहासाचे महत्वाचा भाग म्हणजे मोडनिंबमधिल धार्मिक उत्सव व परंपरा यामध्ये मोडनिंबचे
ग्रामदैवत श्री.वेताळबाबाची यात्रा..
मोडनिंबमध्ये हिंदु,मुस्लीम,जैन व बौध्द अशा चार प्रमुख धर्माचे नागरिकांचा समावेश आहे. या सर्व धर्माचे लोक गावात विविध भागातएकत्र अथवा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे आपणांस माहित आहेच.
मोडनिंबचे ग्रामदैवत श्री.वेताळबाबाची यात्रा- वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. खरंतर गावच्या यात्रा म्हणजे गावाकडचंं कुटुंबसंमेलनच. कामानिमित्त बाहेर गेलेल्या गांवकर्याना हमखास
घराकडं ओढुन आणणारी यात्रा. माहेरवाशीणीना यात्रा म्हणजे हमखास माहेरी यायची सुवर्णसंधी. वैशाख महिना म्हणजे एप्रिल मे चा. शाळांना हमखास लागलेली सुट्टी आणि मग सोबतीला आंब्याचे दिवस. यानिमित्ताने गावातल्या प्रत्येक घरी हमखास दुरदेशी गेलेली पाखरं येतात, दोन तीन दिवस यात्रा साजरे होते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे वर्षभराने मित्रमैत्रिणी भेटतात, आपल्या शाळेतल्या,बालपणीच्या आठवणीचा पट प्रत्येकजण मांडतो, भले लहानपणी भांडलो असलो आता जत्रेत तो दुरावा हरवतो, कडकडुन भेटतो आणि बरोबर आलेल्या कुटुंबाला या लंगोटीयाराची ओळख करुन देतो. आमच्या बहीणीही त्यात मागे नसतात,अगं कुठे असतेस, आणि आपल्या वर्गातली ती ही कुठंय.. मेलीचं नावही आठवत नाही म्हणुन प्रेमळ संवाद होतो. संसाराचं कितीही ओझं असलं तरी ते दोन तीन दिवस सगळा गांव आनंदात असतो.खर्या अर्थानं 'आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. 'बरं आमची यात्रा जेमतेम तीन दिवसाची. वैशाख चतुर्दशीला नरसिंह जयंतीच्या दिवशी सायंकाळी देव आणण्याचा कार्यक्रम. चावडीजवळच्या मुळीकाच्या घरी वेताळबाबाचं ठाणं. तिथुन गावचे गुरव देवाला पालखीत घेऊन आणले जायचे, सोबत देवाचा घोडा,देवाची काठी. खरंतर पोर्णिमेला उजेडाची गरज नसायची पण डोक्याबर बत्तीच्या प्रकाशात सदा रामोश्याच्या संचाबरोबर एका ठराविक नादात ठोलताशाच्या गजरात देव आणला जायचा व पारावर त्याची स्थापना व्हायची. देवाची आरती व्हायची व देव बघायला सगळा गाव लोटायचा. खरंतर आम्ही पोरं देवाच्या भक्ताचे अंगात कसे येते याचे कोण आकर्षण. आणी आरती होताच त्याच ठिकाणी मराठी सिनेमा दाखवला जायचा. सिनेमाची मशीन लागली जायची आणि सिनेमाचा आनंद घेण्यासाठी अगदी वाडीवस्तीवरनं मंडळी आवडीनं हजर असायची.
दुसरा दिवस मुख्य यात्रेचा अख्या गावात पुरणपोळीचा नैवेद्य व्हायचा, गावात वर्षानं आलेली मंडळी आपल्या पोराला घेऊन नैवेद्याचं ताट घेऊन गावातल्या सगळ्या देवाला नैवेद्य व नारळ वाढवत असत.या निमित्ताने सर्व देवाचं दर्शन व्हायचं. यात्रा भरलेली असायची,ओढ्यात पाळणे व इतर खेळाची दुकानं, तर राजवाड्यापासुन वेस ओलांडुन दुतर्फा खेळण्याची व इतर वस्तु विकण्याची दुकानं. खरंतर यातील वस्तु येर्हवी गावातही मिळायच्या पण यात्रेतला खरेदीचा आनंद निराळा. फुगे विकणारे, पिपाणी विकणारे आपल्या वाद्यांचे मोठे आवाज काढुन बच्चेकंपनीला आकर्षित करत असत व आपसुकच बाबा मला फुगा पाहीजे म्हणुन हट्ट धरणारी त्याचे गिर्हाईक व्हायचे. मारुतीजवळ नारळ विकणारे,मिठाई विकणारे हमखास असत व त्याच्यांकडुनच खारेमुरे खरेदीचा योग व्हायचा.
त्याचवेळी गावाच्या विविध भागातुन शेरण्या निघायच्या. कुणाकुणाची नवसाचीसुद्धा. आणी यात्रेत प्रवेश करतात मोडनिंबचा घुमणारा आवाज म्हणजे भारत भालेराव याचं समालोचन चालु
असायचं. "यात्रेकरुंचं ,यात्रा पंच कमेटीकडुन सहर्ष स्वागत,आपण आलात धन्यवाद,धन्यवाद,धन्यवाद. ज्याना कुणाला नवसाच्या तोफा द्यायच्या आहेत त्यांनी यात्रा पंचकमिटीकडे संपर्क साधावा" आणि शहराकडं
नोकरीला असणारा,बागायतदार,एखादा हौशी गावकरी पुढं व्हायचा,आणी भर यात्रेत "अमक्याकडून कडुन पाच तोफांची सलामी आलेली आहे. धन्यवाद." अस नाव पुकारलं जायचं..
तोपर्यंत गच्च भरलेल्या यात्रेत देवाचा छबिना यायचा,तोफा उडवल्या जायच्या. पारामागे ओढ्यात शोभेची दारु उडवण्याची स्पर्धा लावलेली असायची. भाविकांची उपस्थितीत देवाची आरती व्हायची,अख्यी जत्रा टाळ्या वाजवत उभी राहायची. "वेताळबाबाच्या नावानं चांगभलं!" म्हणलं की शोभेचं दारुकाम सुरु व्हायचं,मागच्या शेतात तोफा उठायच्या आणि अबबबबबब काय आवाज म्हणत याचीही काॅमेट्री व्हायची, ज्याची तोफ फुसकी असेल त्याला जाहीर दम दिला जायचा. हे दारुकाम बघायला ओढ्याच्या वर झर्याजवळ तौबा गर्दी व्हायची. दारुकाम संपते तोपर्यंत पुन्हा मराठी सिनेमाची घोषणा व्हायची. यात्रेकरु फक्त तोंड फिरवुन सिनेमाचा आनंद घ्यायचे.
यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा. सकाळी राहीलेल्या नागरीकांची दर्शनाला गर्दी व्हायची व स ९ वा मारुतीच्या मागे मंडप टाकलेला असायचा व यामध्ये पारंपारीक भेदी गाण्याचा कार्यक्रम असायचा, हे बघायला गावातली जुनीजाणती पण ठरावीक मंडळी यायची. भेदी गाण्याच्या पाच सहा टीम यायच्या व त्याच्यात स्पर्धा झडायच्या. एकमेकांना आव्हान दिली जायची,वह्याची चोपड्या उघडल्या जायच्या व आपले आव्हान जिवंत ठेवायचा प्रयत्न व्हायचा, मग पंचकमिटीकडुन त्यांचा यथोचित मान व्हायचा. ही प्रथा आजही चालु आहे.
यादरम्यान आजकाल बुध्द पौर्णिंमेच्या निमित्ताने व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दोन्हीही महामानवाच्या प्रतिमेची मिरवणुक मोडनिंब शहरातुन निघते. यात्रा व जयंतीउत्सवासाठी मोठ्या संख्येने गावाकडे आलेले बुध्द बंधुभगिनी यात मोठ्या उत्साहाने
सहभागी होतात. ढोल,ताशा व बॅडच्या आवेशात सजवलेल्या वाहनावर मिरवणुक निघते. हे पण या दिवसाचे वैशिष्ट्य.
आणी त्याच वेळा ओढ्यात कुस्तीचा फड रंगायला चालु व्हायचा, हलग्या तडतडायला लागायच्या, दंड थोपटले जायचे. हाय कुणी जोडिदार... चा पठ्ठा म्हणुन आव्हान दिलं जायचं.आसपासच्या गावातले पहिलवान आपल्या वस्तादासह आवर्जुन उपस्थित असत. पंचकमिटीही योग्य मानधन देऊन कुस्ती रंगवायचे. यात्रेतल्या कुस्त्या म्हणजे गावचे सामर्थ्य दाखविण्याचे ठिकाण. या निमित्ताने कुस्तीगीरांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असायची. गावातले जुने पहिलवान पंचाची भुमिका वठवायचे. शेवटी मोठ्या रकमेची मानाची कुस्ती होऊन सगळ्या पहिलवानांची मिरवणुक वेशीतुन नेऊन कुस्त्या संपायच्या, आणि हळुहळु वेताळबाबाजवळची गर्दीही कमी व्हायची.
रात्री श्री.वेताळबाबाची आरती व्हायची,थोडेफार दारुकामही व्हायचे.
रात्री सिनेमा व्हायचा पण पहिल्या दोन तीन दिवसासारखा उत्साह त्यात नसायचा. कारण यात्रेला उत्साहाने येणार्याला परतीचे वेध लागलेले असायचे. चला बाबा झाली यात्रा,आता आपल्या उद्योगाला जावं लागणार आहे.
श्री.वेताळबाबा हा खरंतर देवाचा रक्षक. तो मात्र आमचं रक्षण करण्यासाठी गावाबाहेर उभा आहे ना छत ना देऊळ. फक्त गर्द चिंचेचं व पिंपळाचं झाड व त्याची सावली सोबतीला. पण हे तीन दिवस येणार्याला
आशिर्वाद व आनंद देऊन जातो. पुर्वी यात्रा बारा बलुतेदारांच्या पंच कमिटीतर्फे भरवली जायची. गावचे सरपंच,प्रतिष्ठीत शेतकरी,व्यापारी,ग्रामस्थ मार्गदर्शन करायचे. समोरच पोलीस चोकी असल्यानै वेगळ्या बंदोबस्ताची गरज नसायची. खरंतर गावोगावच्या यात्रा म्हणजे गावकर्यांना एकत्र आणणारं सांस्कृतिक व्यासपीठ यानिमित्ताने दुरदेशी गेलेले मुलंमुली हमखास आणणारं व्यासपीठ, गावचं अर्थकारण फिरवणारं व्यासपीठ, आणी सर्वात महत्वाचं म्हणजे गावाची ओढ जिवंत ठेवणारं व्यासपीठ.
या दहा पंधरा वर्षात ही यात्रा श्री.वेताळ
देवस्थान ट्रस्टतर्फे भरवण्यात येते,त्यामुळे
आजकाल ही यात्रा भव्य व नियोजनबध्द
पध्दतीने भरवली जात आहे.त्यामुळे तीन
दिवस चालणारी ही यात्रा आता पाच दिवस
भरवली जात आहे.महत्वाचे म्हणजे गावात
ठिकठिकाणी कमानी लावुन यात्रेकरुंचे
स्वागत केले जाते.या निमित्ताने विविध
संघटनांच्या वतीने देवाला शेरणीचा प्रसाद
अर्पण करण्यासाठी वाजतगाजत व अत्यंत
उत्साहात मिरवणुका काढल्या जातात.
कांही वर्षापासुन मोडनिंबच्या हौशी
कलाकाराकडुन सोंगाच्या गाड्या काढल्या
जातात.अतिशय नेटकेपणाने यामधिल
प्रसंगाचे देखावे तयार केले जातात,यावर्षी
दक्षिण भारतातील प्रामुख्यानै केरळ या
दक्षिणेतील राज्यातील देवदेवतांचे अत्यंत
मनमोहक देखावे हे मुख्य आकर्षण आहे,
यासाठी श्री.सौदागर शिंदे,राजेंद्र खडके,
बच्चु गोरे,,राजु निंबाळकर ,गुरसाळकर बंधु
खडके बंधु,गिड्डे बंधु,दिपक सुर्वे,दत्ता सरताळे,दत्ताबापु सुर्वे असे असंख्य उत्साही
कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.यात्रा भव्य व
शांततेत होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष कुरण
गिड्डे त्यांचे सहकारी संभाजी लादे,विजय
खिलबुडे,बालाजी पाटील,हनुमंत यादव,नंदु
लादे व सर्व तरुण मंडळी परिश्रम घेत आहेत
मोडनिंब हे खर्या अर्थानं सामाजिक सलोखा ठेवणारं गाव.भारतातल्या चार मुख्य धर्माच्या मानवतेच्या शिकवणीचा अंगिकार करणारं गांव. याचा मला,तुम्हाला सर्वांनाच अभिमान आहे. या निमित्तानं एवढंच मनोगत....!
सुचना - ढोबळमानाने यात्रा मनातुन उतरवली आहे, जर काही चुकुन राहीलं असेल तर समजुन घ्या.. धन्यवाद..
"वेताळबाबाचं चांगभलं..."
श्री.जयवन्त समुद्र सर
दि.१६ मे २०२२
( हा लेख यात्रा असल्याने पुर्नप्रसारित करीत आहे.)