17/03/2022
मालवणी आमची मायबोली या पेजवरुन साभार
"होळी रे होळी पुरणाची पोळी" असा कितक्याय बोंबलेच्या देठापासून आराडल्यात तरी गावाक होळयेक नैवेद्य दाखयतत तो #शिरवाळ्यांचो. ह्या दिसा आमच्या कोकणात मान तो शिरवाळ्यांचो.
#शिरवाळे ह्यो कोकणातलो खास आणि पारंपारिक गोड पदार्थ.. आणि तेची तयारी कितकी? इचारू नको...
होळी लागी इली काय आठ पंधरा दिस घरातली जाळवानधारीन रोज हुनतली,"होळयेक तांदूळ दळून हाडूचे आसत" ,, आणि एकदा ती हासको हुसको दूर करून तेचा दळाप दळून हाडतली. दळूच्या आधी काय करतली? तर तांदुळ येचून सुटी करतली. तेच्यातले भातकुटे, गुंडे काढतली. बरे दोन चारदा मुरडून धुतली. , सुकयतली आणि मगे गिरणीवरसून बारीक दळून हाडतली... ह्या झाला शिरवाळे करूक लागणाऱ्या पिठाचा काम.
आता होळयेदीसा काय आसता तर दोम्पारा बेगीन जेवना आटापली काय. बायलमानसांची जंगी तयारी चालू शिरवाळे करुची. त्या आधी वायच घरादेगेक जावन केळीची पाना हाडून धुवन ठेयतत . पाना कित्या होयी ता मगे समाजतला. सांगतय.. धीर धरा वायच.
सगळ्यात आधी बरो मोठोसो टोप घेवन चूलीर आदान भरून ठेयतत. पाताळ कमरेक खोचतत आणि कमरेक टावेल बानान शिरवाळ्यांच्या तयारेक लागतत. मोठे मोठे जेवणावळी आसले काय आम्ही मालवणी माणसा कमरेक टावेल फाडो बांधान काम करतू ओ... जूनी सवय आसा ती. तेच्या मूळे कपडे बात जायनत नाय...
हा... याक रवलाच सांगाचा. दोन चार दिस आधी तो शेवगो (म्हणजे शिरवाळे गाळूचो तीन पायाचो लाकडी साचो) माळ्यार पडलंलो आसतलो तेका काढूची सुचना येतली.. घरातल्या एकाक सांगान तेका माळ्यार चढवन तो शेवगो आधी भायर काढतत. तेका धुवन फुसान बरो थापटून थोपटून सारखो उभो करतत आणि मगे बाकिच्या तयारेक लागतत.
कित्या हुनान काय इचारतास? ऐन टायमाक मोडलो झडलो आसलो तर कोणाकडे मागाक जातलय ? . त्या दिसा शेवगो आसणाऱ्याकडे कितकी गिऱ्हायका येतत म्हायती आसा ? "गे बाबल्याच्या आये, ... तुझा झाला, काय वायच माका शेवगो दी हा, चारच काढतलय आणि सोमतो हाडून दितलय " असा सांगतली आणि घेवन जातली.
आपलो मोडून सत्यानास करून उडयतत आणि दरवरसा मागाक येतत... गावातली लोका शेजारधर्म पाळतत ओ. कोणाक नाय हुननत नाय. मगे कोण दारार इली काय, ". अगे... त्या सावतीनीन नेलो, तीचा झाला तर बघ आणि ने तुका".. असा सांगला काय मागाक येणारी सावतीनीच्या दारात उभी. मगे तो शेवगो सावतीनी कडसून परबीनीकडे, परबीनी कडसून कदमीनी कडे आणि थयसून खय खय जायत तेचो पत्तो त्या मालकाक दोन दिस लागाचो नाय. तो शेवगो आजून चार घरा फिरान दुसऱ्या तिसऱ्या दिसा घरात येतलो.. तेव्हा समाजतला. समाजला?
तर.... मीया काय सांगा होतय? ह्या गजालींफुडे आदान खतखतला थंयच रवला.. . तर.. चुलीवयला आदान बरा खतखतला, काय मोदकाच्या पिठा सारख्या ह्या शिरवाळ्यांचा पीठ वायच मीठ टाकून पयला भागवन घेतत. .. मगे भागयलेल्या हुनहुनीत पिठाचे हाताच्या मुठी येदे लांबाडे मुटके उकाळत्या पाणयात सोडतत... बरे उकाडले काय ते शिजान हलके होवन वरती येतत.. मगे काय? याक डाऊल घेवन गरम गरम मुटके शेवग्यात घालतत... झाला!
झाला काय? आसा आजून खूप. वायच रवा.
शिरवाळे गाळूचा म्हणजे काय एकट्या चा काम नाय हा! ह्या काम करून दोन तीन मानसा होईच. मुटला शेवग्यात घातला काय ताकदीन नेटान शेवगो दाबूचो लागता. मगे खंय ते 'चिर पिचीर' आवाज करीत गरम गरम शिरवाळे खालसून अखंड येतत. वरती नेट लायणाऱ्याची म्हेनत. कितकी ती तेकाच माहिती. शिरवाळे यवस्थित इले काय करणाऱ्यांची म्हेनत फळाक येता.
तवसर केळीचो खोलो घेवन आधीच एकान तयारेत रवाचा आसता शिरवाळे धरूक. ते अग्गतेन फुडे पाठी करून केळीच्या पानात धरूचे लागतत. तेची पण टेक्निक आसा. कशेय धरून ओढूचे नसतत. नायतर ते तुटतत. सगळ्या ४०-५० मुटल्यांचे शिरवाळे गाळीसर पाठीचो कनो मोडान जाता. गाळून झाले काय सुपात परातीत बरे केळीच्या खोल्यान धाकून ठेयतत.
खावक बरे लागतत पण मेहनतीचा काम आसता ओ. चुलीकडे निसतो घामान भिजाक जाता. सगळा काम गरम गरम आसताना करूचा लागता ना.
तर, इतकी म्हेनत करून हे शिरवाळे एकदाचे गाळून होतत. पून रावा, हे खातलय खेच्या वांगडा? बरोब्बर... नारळाच्या रसावांगडा..
एक दोन नाल (नारळ) फोडुन खोबरा कातून तेचो रस काढतत. तेच्यात
येलची, गॉड, आणि वायच हळद घालतत. .. आणि या गोड रसात शिरवाळे मुरवन खातत. रसावांगडा शिरवाळे खाणा म्हणजे काय ओ? आ.. हा... हा.. तेच्या साठी मालवणी मातीत, मालवणी मुलखात जन्म घेवचो लागता.
रातीकडे परतेक घरातसून शिरवाळ्याचो नैवेद्य देवळाकडे होळयेक न्हेतत. तडे ढोलार काठी पडली. ढाम ढूम झाला काय हडे घरात लहानपणी ह्या शिरवाळ्यांवरती आम्ही सगळी तुटान पडू. त्या राती कोण जेय नाय. शिरवाळे रस खावनच पॉट भरीत.
आताशे खाणारे पॉर तॉर सगळे भायरगावात आसले तरी गावातले रिती भाती जपाक गावात रवणाऱ्या माणसांका करूचा लागताच. पयला सणादिसा पायलीभर रानीत आता अच्छेरभराचा करतली, पण करतलीच. तॉंडात पयलो घास घालताना पोरातोरांची आठवण काढतली. आणि भायरगावात गेलेली पोरा तोरा थडे " आये माझी आज शिरवाळे रस करतली" म्हणत आवंढो गिळत आठव काढतली, इतक्याच..
लेखन :पूर्णिमा गावडे मोरजकर
#मायबोली_आमची_मालवणी
दि:१७/३/२०२२