Shri Gramdaivat Jagannath Mandir, Talandge, Kolhapur

Shri Gramdaivat Jagannath Mandir, Talandge, Kolhapur श्री ग्रामदैवत जगन्नाथ मंदिर, तळंदगे, कोल्हापुर

देवा वास तुझा पुरी नगरी...
भक्ताने तुझ्या केली मनोभावे वारी...
भाव मनातील तु ओळखला...
धावत तु त्याच्या गावी आला...
तुजपाशी नाही कोणी अनाथ...
भक्त म्हणती तुला श्री #जगन्नाथ,श्री #जगन्नाथ...

#हुपरी गावचा प्रसिद्ध चांदी व्यवसाय आजूबाजूच्या गावात सुरु झाला त्यात तळंदगे गावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.हुपरीच्या पश्चिमेस साधारण 5 km तसेच कोल्हापूरच्या आग्नेय दिशेला 20 km वर #तळंदगे गाव वसले आहे

.गावाचा मुख्य व्यवसाय शेती पण चांदी व्यवसाय व गावाला खेटूनच असणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार व व्यवसायाची अनेक साधनें उपलब्ध झाली आहेत.आर्थिक उलाढाल वाढली आहे त्यामुळे खेडेवजा असणारे गाव आता चांगलेच बाळसे धरू लागले आहे.अजुन एका ठिकाणामुळे हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे प्राचीन श्री जगन्नाथ देवस्थान.ओरिसा येथील पुरी या ठिकाणी जगन्नाथाचे मूळ ठिकाण आहे त्यानंतर भारतात फक्त तळंदगे या ठिकाणी हे मंदिर आहे अशी आख्यायिका गावकरी अभिमानाने सांगतात.आज गावात सुख संपन्न आणि भरभराट आहे ती ग्रामदैवत श्री जगन्नाथामुळेच आहे असे ते नम्रपणे मान्य करतात.तर चला या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची माहिती घेऊ या.
गावाच्या दक्षिण टोकाला अगदी वेशीवर श्री जगन्नाचे मंदिर आहे.सभोवताली गर्द वनराई,शांत,सुंदर,रम्य परिसर आणि श्री जगन्नाथाचे वास्तव्य यामुळे या जागेत एक वेगळीच आत्मिक अनुभूती मिळते.श्री जगन्नाथाचे प्राचीन मंदिर पूर्वाभिमुखी असुन गर्भगृह आणि सभामंडप अशी रचना आहे.अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.दगड आणि सिमेंटमध्ये पक्के बांधकाम केले आहे.पण त्याआधी जुने हेमाडपंथी गर्भगृह व लाकडी सभामंडप होता असे गावकरी सांगतात.नवीन बांधकाम लक्ष वेधुन घेते.श्री जगन्नाथ हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात.जुनी स्वयंभू असणारी श्री जगन्नाथाची मूर्ती भग्न झाल्यामुळे तिच्या जागी सध्या असणारी मूर्ती स्थापित केली आहे.(जुनी मूर्ती गर्भगृहात ठेऊन त्यावर बांधकाम करुन मुजवली आहे असे ग्रामस्थांकडून समजते.)सध्याची मूर्ती उभ्या स्वरूपात असुन अत्यंत सुंदर,सुबक व लोभसवाणी आहे.दोन्ही हात आशीर्वादासाठी वर केले आहेत.सध्या काम चालु असल्यामुळे मुर्ती गाभाऱ्यातून बाहेर मंडपात स्थापित केली आहे.मूर्तीच्या उजव्या बाजुला पुरीच्या श्री जगन्नाथ,बलराम व सुभद्रा यांची फोटोफ्रेम आहे.
मंदिराच्या उजव्या बाजुस तुळजामातेचे छोटे मंदिर आहे.पण पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार ते देवी सुभद्रेचे आहे असे गावकरी सांगतात.मुर्ती अतिशय सुरेख व आकर्षक आहे.तसेच मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला राधाकृष्णाचे एक छोटे मंदिर आहे.राधाकृष्णाची मुर्ती अतिशय सुंदर व रेखीव आहेत.त्याच्या बाजूलाच एक तळे आहे त्याच्या सुशोभिकरणाचे काम सुरु आहे.आजूबाजूला पौराणिक अवशेष विखरून पडले आहेत जे मंदिराच्या पौराणिक इतिहासाची साक्ष देतात.तसेच मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण जागेत विविध प्रकारची झाडे लावली आहेत त्यामुळे मंदिर परिसराच्या सौदर्यात आणखीनच भर पडली.मंदिराच्या समोर व बाजुचा परिसर सजावटीची झाडे व हिरवळीने नटलेला आहे.लोकसहभाग व शासनाच्या विविध योजनांमधून मंदिर परिसराचा विकास होत आहे.त्यासाठी सर्व गावकरी,मंदिर व्यवस्थापन कमिटी,स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
श्री जगन्नाथ मंदिराचा इतिहास खुप प्राचीन आहे.त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार 12 व्या शतकात तळंदगे गावाची स्थापना झाली.त्यावेळचे #गावकामगार #पाटील हे श्री जगन्नाथाचे परमभक्त होते.ते प्रत्येक #कार्तिकी #पौर्णिमेला ओरिसा राज्यातील #पुरी येथील जागृत देवस्थान श्री जगन्नाथाच्या दर्शनास जात असत.कालांतराने वार्धक्यामुळे त्यांना जाणे कठीण होऊ लागले.एकेवर्षी कार्तिक पौर्णिमेला ते श्री जगन्नाथाच्या दर्शनाला गेले असता आपल्या मनातील खंत देवापुढे बोलुन दाखवली की हे जगपालनकर्ता तुझ्या या भोळ्या भक्ताकडून यथाकाल सेवा झाली ती तु मान्य करुन घे पण आता इथुन पुढे मनात खुप इच्छा असुनही तुझ्या दर्शनास येता येणार नाही.असे बोलुन साश्रूपूर्ण नयनांनी व जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि घोड्यावरून तळंदगे गावी येण्यास परत निघाले.या परमभक्ताच्या भक्तीमुळे श्री जगन्नाथ प्रसन्न झाले व सूक्ष्मरूपाने पाटलांच्याबरोबर पुरीहून तळंदगे गावी आले.
थोड्याच दिवसात पाटलांना स्वप्नात दृष्ट्रांत झाला व श्री जगन्नाथाने आपले विराट दर्शन दिले आणि सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी वड पिंपळाच्या गर्द सावलीत माझे वास्तव्य आहे असे सांगितले.पाटलांनी गावकऱ्यांच्या साथीने त्या जागेची साफसफाई करत असता वारुळात श्री जगन्नाथाची स्वयंभु मुर्ती मिळाली.पाटील आणि सर्व गावकरी अचंबित झाले व श्री जगन्नाथाच्या दर्शनाने तृप्त झाले.विधिवत जलाभिषेक,पुजाअर्चा करुन मूर्तीची स्थापना केली.भाविक नित्यनियमाने दर्शनास जाऊ लागले.
गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार असेच एकदा करवीर संस्थांचे राजे #छ. #शाहू #महाराज शिकारीसाठी मंदिरालगत असणाऱ्या जंगलात(पार्कात)आले होते.उन्हाचा तडाखा खुप होता त्यामुळे तहान लागलेने पाण्याची चौकशी करत मंदिरापाशी आले.तिथे एक साधुमहाराज तपस्या करीत होते.त्यांच्याकडे महाराजांनी पाण्याची विचारणा केली तेव्हा साधूच्या रूपातील जगतकर्त्या श्री जगन्नाथाने रयतेच्या पालनकर्त्याला छ.शाहू महाराज यांना पाणी दिले.त्यावेळी तिथेच महाराज थोडावेळ विश्रांती घेत असताना श्री जगन्नाथाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले.त्या दृष्टांताने महाराज भारावून गेले आणि भक्तीभावाने श्री जगन्नाथाचे मंदिर नव्याने बांधले.(आता त्याचा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला आहे).अशा प्रकारे भक्तांना हाकेला धावणारा तसेच संकटात पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला तारणहार श्री जगन्नाथ आहे याची प्रचिती अनेकांना आली आहे.
दरवर्षी #कार्तिकी #पौर्णिमेला श्री जगन्नाथाची मोठी यात्रा भरते.अनेक भाविक,गावकरी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.सध्या सद्गुरू #लोले #महाराज ( #यळगुडकर) यांच्या कृपार्शीवादाने व अमृतवाणीने सन 1923 पासुन सुरु असणारे प्रणव केंद्र आजही भक्तांच्या आणि नागरिकांच्या अध्यात्मिक साधनेचे प्रतिक बनले आहे.लोले महाराज यांचेनंतर श्री #लष्करे #गुरुजी महाराज तळंदगे यांनी हे केंद्र भक्तांच्या गळ्यातील ताईत बनवले व त्यांचेनंतर आजतागायत #मोठे #महाराज (पट्टणकोडोलीकर) यांनी या केंद्राचे स्वरूप निरंजनसारखे तेवत ठेवले आहे.अशा प्रकारे पौराणिक अध्यात्मिक,ऐतिहासिक ठेवा असणारे हे मंदिर व भक्तांच्या नवसाला पावणारे श्री जगन्नाथ यांच्या पावन वास्तव्याने प्रेरित असे हे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील एकमेव असणारे हे श्री जगन्नाथाचे मंदिर योग्य त्या सोयीसुविधा निर्माण झाल्या तर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणुन तसेच एकदिवसीय सहलीसाठी एक ठिकाण म्हणुन प्रसिद्ध होऊन गावाचा लौकिक वाढेल हे नक्की.
धन्यवाद
अमर कुलकर्णी,हुपरी

Address

Talandge
Kolhapur
416236

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gramdaivat Jagannath Mandir, Talandge, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category