Sadguru Shree Dada Maharaj Zurale Math, Malkapur- Karad

  • Home
  • India
  • Karad
  • Sadguru Shree Dada Maharaj Zurale Math, Malkapur- Karad

Sadguru Shree Dada Maharaj Zurale Math, Malkapur- Karad संतशिरोमणी दत्तवतरी परमपूज्य सद्गुरु श्री दादामहाराज झुरळे मठ, मलकापूर. दत्त संप्रदाय.

परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६८.                         श्रीअनसूयानंदन, योगीजनवल्लभ...
13/05/2026

परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६८.

श्रीअनसूयानंदन, योगीजनवल्लभ, करूणासागर, प्रेमसिंधू, पतितपावन भगवान श्रीदत्तात्रेय आपल्या परमप्रिय शिष्यास मोठ्या प्रेमाने सांगतात, " राजसा, माणसास आहार, निद्रा, भय व मैथून यांचे उपजतच ज्ञान असते व ते प्राप्त व्हावे असे प्रत्येकास वाटते. पण यापेक्षा अधिक काही मिळवावे हे ईश्वराने त्यास बुद्धीची व विवेकाची देणगी दिलेली असली की वाटते. म्हणजे संतुष्टता हा भाग त्याची बुद्धी ग्रहण करत नाही. त्यामुळे अति अभिलाषेपोटी जन्मभर तो दुःखीच रहातो. कितीही मिळाले तरी त्यास मिळाल्याचे समाधान व सुख मिळत नाही. याला तोच जबाबदार असतो. मग संतुष्टता व समाधान कोणास मिळते ? तर ईश्वराची कृपा ज्याचेवर होते तोच ईश्वराने ज्या स्थितीत, ज्या सुविधेत ठेवले त्यात त्याची कृपा म्हणून समाधानी व संतुष्ट रहातो. ईश्वर कृपेने सर्व आयुष्यभर संसाराबरोबर भजन, पूजन, स्मरण, सत्समागमात अधिक आयुष्याचा काळ घालवित असल्याने त्यास समाधान व शांती प्राप्त होते."

याशिवाय एका गोष्टीचे महत्व त्याचे गुरूदेव त्याचे मनावर बिंबवितात. ते म्हणजे दान व त्याग. आपणास जे मिळते त्यातून थोडे आपल्या ऐपतीप्रमाणे गरजू व्यक्तीस ते देऊन त्याचा आनंद मिळवावा असे वाटते. हा त्याग कोणत्या गोष्टींचा व कोणास करावयाचा? तर हे दान गरजू व सत्पात्री असावे. म्हणजे त्या वस्तूंबद्दल त्याची उपयोगीता त्यास मिळाली पाहिजे. म्हणजे अन्न नसेल तर त्याचे दान करावे. वस्त्रहीन असेल तर वस्त्रदान करावे. निवारा नसेल तर त्याची व्यवस्था करावी. या सर्व गोष्टींपेक्षा जो अज्ञानी असेल तर त्यास ज्ञानदान करावे. अर्थात ज्ञानात दोन प्रकार असतात. एक संसारीक गरजेच्या वस्तूंबद्दल, त्या कशा प्राप्त करून घ्यावयाच्या हे ज्ञान व पारमार्थिक अगर पारलौकिक जे परमसुख मिळवून देणारे ज्ञान. अर्थात दान, उपकार, त्याग करणाऱ्या व्यक्तीने ते देणाऱ्यास आपण त्याचेवर मोठे उपकार करतो असे म्हणून वरचेवर त्यास त्या उपकाराची जाणीव देऊ नये. म्हणजे दान निर्हेतुकपणे करावे. त्यागाची वृत्ती असल्याशिवाय दान होत नाही. यासाठी अंगी प्रथम त्यागवृत्ती बाणली पाहिजे. ही वृत्ती गुरूच निर्माण करतात. कशी? तर जसे आपणास परमेश्वराने निर्माण केले आहे तसे त्यास म्हणजे दुसऱ्यासही परमेश्वरानेच निर्माण केले आहे. म्हणजे तो आपला बंधुच आहे तेव्हा त्याबद्दल प्रेमभावना जागृत झाली पाहिजे. त्यास जे कमी असेल ते प्रेमाने देणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचेवर आपण उपकार करीत नसून आपले कर्तव्य पार पाडत आहोत अशा भावनेने दान झाले पाहिजे. म्हणजे दानापाठीमागून जो अहंकार येतो तो येता उपयोगी नाही.

यास दृष्टांत भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कृपाळूपणे सांगतात की, 'कर्णासारखा दानी' अशी सर्वत्र म्हण पडली याचे कारण प्रत्यक्ष सूर्यनारायण ब्राम्हणवेषाने स्वतःचे अंगावरील दुर्भेद्य असे कवच व कुंडले मागण्यास कर्णाकडे आले असता त्याने ती न डगमगता काढून दिली. हा दानशूरपणा त्याचे अंगी होता. दररोज सकाळी सूर्योदयाचे वेळी स्नान झाल्यानंतर थोडेतरी दान केल्याशिवाय तो आपल्या दैनंदिन कामास लागत नसे. म्हणून त्यास दानशूर म्हणत असत.
दान देत असता देणाऱ्या व्यक्तीच्या पात्रापात्रतेचा तो विचार करीत नसे. तसा विचार करून दान दिले म्हणजे मी दानी व घेणारा याचक असा अहंकार येतो. पण कालमानाप्रमाणे वृत्तीत थोडा बदल करावा लागतो. ते म्हणजे दान सत्पात्री असावे व त्याची आवश्यकता म्हणजे गरज ज्यास असेल त्यास द्यावे. पण ज्ञानाचे बाबतीत पात्रापात्रतेचा विचार झालाच पाहिजे. तेथे प्रेम आडवे येऊन चालत नाही.

द्रोणाचार्यांनी ब्रम्हास्त्र अर्जुनास दिले, तसे अश्वत्थाम्यासही दिले. त्या ज्ञानात पारंगत केले. पण अर्जुनाने विधायक कार्यासाठी ते वापरले व अश्वत्थाम्याने निःपांडवी पृथ्वी करण्याच्या उद्देशाने त्याचा प्रयोग उत्तरेच्या गर्भावर केला.

म्हणून गुरू ज्ञानदान देतात पण त्या ज्ञानाने केवळ ईश्वरकृपाच प्राप्त करून घ्यावयाची ही बुद्धीही निर्माण करतात. म्हणून प्रत्येकाने भगवान श्रीदत्तात्रेयस्वरूपी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांना शरण गेल्यानंतर ते योग्य गुरूंचे ओट्यात त्यास घालतात व त्यांचेच कृपेने योग्य काय? अयोग्य काय? याचे ज्ञान होऊन ईश्वरप्राप्ती हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून तो सेवारूपी साधना करतो व गुरूकृपेने ज्ञानी होतो.

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६७.          भक्तवत्सल, भक्ताभिमानी, दीनानाथ, प्रेमसागर...
13/05/2026

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६७.

भक्तवत्सल, भक्ताभिमानी, दीनानाथ, प्रेमसागर भगवान दत्तात्रेय आपल्या प्रेमळ शिष्याला सांगतात,
" हे राजसा, परमार्थ मार्गात प्रत्येक व्यक्तीने हसतमुख असले पाहिजे. कारण मुखकमलावरचे हास्य हे परमेश्वराचे स्वरूप आहे. म्हणजे कोणतीही व्यक्ती जी आपणास भेटावयास येते, त्या व्यक्तीस आपणाबद्दल आकर्षण उत्पन्न झाले पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती कितीही दुःखी असली तरी आपणास पाहिल्याबरोबर तिला आनंद झाला पाहिजे. त्यामुळे काही काळ ती आपले दुःख विसरते.
पण प्रत्यक्षात असे घडत नाही. या जगामध्ये प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चिंतेत, काळजीत असतो व आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे काही काळ ती व्यक्ती तिचे दुःख विसरते. आपल्या आनंदात समाविष्ट होते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटते. त्यामुळे त्याचा चेहरा मलूल, त्रासाने कपाळास आठ्या पडतात. तो दुर्मुखलेला दिसतो. त्याकारणाने पाहणारा जरी आनंदात असला तरी त्याच्या मुखावरील आनंद नष्ट होतो, तोही दुर्मुखलेला होतो. ही काळजी किंवा चिंता माणसाच्या सावलीसारखी पाठीशी असते. त्या चिंता अनेक प्रकारच्या असतात. प्रथम त्यास पोटापाण्यासाठी धंदा-नोकरी मिळेल की नाही याची काळजी असते. समजा नोकरी मिळाली की भरपूर नाही तरी संसारास पुरे पडेल एवढे तरी धन प्राप्त होईल ना याची काळजी असते. कोणास आपणास देखणी, संसारदक्ष पत्नी मिळेल ना याची काळजी असते. काहींना आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी असते. कित्येकांना रहाण्यासाठी योग्य जागा आपल्या बजेटमध्ये बसणारी मिळेल ना याची काळजी असते. कित्येकांना आपल्या मुलीला कमी खर्चात योग्य वर मिळून लग्न होईल ना याची काळजी असते. कित्येक लोकांना आपणांस चांगला शेजार सोबत मिळेल ना याची काळजी असते. एखाद्या मनुष्यास ताप आला किंवा त्यांना लहानशा शस्त्रक्रियेमधून जावे लागल्यास तो डॉक्टरांना विचारतो, 'डॉक्टर, पाहिजे तेवढे पैसे खर्च करण्यास मी तयार आहे. पण मला या दिव्यातून पार पाडाल ना याची काळजी वाटते'. एकंदरीत प्रत्येकास निष्काळजी जीवन जगता येत नाही. धनवान लोकांना आपले धन कोणी चोरून नेणार नाही ना याची चिंता असते. तर निर्धनास आपला संसार अपुऱ्या धनामध्ये चालणार कसा याची भीती वाटते.
पण एका व्यक्तीस निर्भयता असते. ती म्हणजे संत, साधू, सत्पुरुष, भक्त याना काळजी कशाचीच वाटत नाही. कारण त्यांचा परमेश्वरावर पूर्ण भरवसा असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ईश्वराच्या इच्छेने होते व तो परमात्मा सतत आपल्या सन्निध आहे हा दृढ विश्वास असतो. त्यामुळे तो निर्भय वृत्तीने ईश्वर आराधना, सेवा करीत असतो. ईश्वरकृपेने त्यास गुरूप्राप्ती झाली तर ते त्याला सतत ईश्वराचे सानिध्यात कसे रहावयाचे ते सांगतात. मनुष्याने आपले सर्व जीवन गुरूंचे इच्छेनुसार घालविले, ते सांगतील त्या मार्गाने जीवनास वळण लावले की, ईश्वराचे इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही याची खात्री पटते व तसे त्यास ईश्वरकृपेचे अनुभवही येतात. त्यामुळे त्याची ईश्वरभक्ती साधनारूपाने अधिक वाढते. त्याला सर्वत्र ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते. त्याला गाडीची अगर घरसाधनाची, प्रवासातील अडचणींची, प्रवासात रहाण्याची, खाण्यापिण्याची कशाचीच काळजी वाटत नाही. त्याचे मनोधैर्य असे वाढते की माझा परमात्मारूपी गुरू माझी काळजी घेण्यास समर्थ आहे.

यासाठी दृष्टांत भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज सांगतात की, " एक जीव गुरूसेवेतच राहून विद्या संपादन करून, स्वगृही निघाला असता दक्षिणारूपाने गुरूदेव त्या शिष्याजवळ काही मागणी करतात. एवढेच नव्हे तर गुरूपत्नी, गुरुबंधू, भगिनी सर्वजण काही दुष्प्राप्य वस्तूंची मागणी करतात. तेव्हा तो शिष्य गांगरतो व एका अरण्यात जाऊन चिंतीत होऊन तो त्या वस्तूंची प्राप्ती कशी होईल या हेतूने भगवंतांची आराधना प्रार्थनारूपाने करतो. त्यामुळे सिद्धरूपाने परमात्मा त्याचे पुढे येतात. सर्व वस्तूंच्या प्राप्तीसाठी काशीयात्रा करवून घेऊन सर्व वस्तूंची प्राप्ती श्रीविश्वनाथकृपेने त्यास करवून देतात. निर्भयवृत्तीने तो गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी आनंदाने जातो."

म्हणून दत्तात्रेयस्वरूपी भगवान श्रीनृसिंहसरस्वतींचे चरण घट्ट व अनन्यभावाने धरले की मानवाच्या चिंता व सर्व प्रकारच्या काळज्या भगवान कृपेने नाहीशा करतात. आपले सान्निध्य त्याचे जवळ ठेवतात. त्यामुळे तो निर्भय वृत्तीने उपासना करतो व भगवंतास प्रसन्न करून घेऊन कृपेने काळजीतून मुक्त होतो. म्हणून गुरूदेवांचे चरण सतत धरून आपण आपले जीवन आनंदात व्यतीत करावयाचे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड.

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६६.                     परमदयाळू, परमकृपाळू, कृपासागर, ...
05/05/2026

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६६.

परमदयाळू, परमकृपाळू, कृपासागर, करूणासिंधू, पतितपावन भगवान दत्तात्रेय आपल्या परमकृपाळू शिष्यास सांगतात, " हे राजसा, प्रत्येक माणसाला काहीतरी विरंगुळा म्हणून सवय असते."

कित्येकांस दात घासावयास मिसरी लागते. अर्ध्या अर्ध्या तासाला थोडा का होईना चहापान करतात. कित्येक शौचमुखमार्जन असे एक प्रातःकाळचे काम असते. तसे दाढी करणे, मगं ती वाढो किंवा न वाढो, दररोज गालावरून ते यंत्र फिरवावयाचे. कित्येक उठले की उषः पान करतात. कित्येक न चुकता फिरावयात जातात. कित्येकास स्नानास अगदी गरम पाणी लागते. कित्येकांना परीट घडीचे कपडे दररोज लागतात आणि कित्येकांना रात्री झोपेच्या वेळी मद्यपान केल्याशिवाय झोप लागत नाही किंवा दिवसभराचा डोक्याचा ताण त्या पेयामुळे जातो अशी कल्पना असते. कित्येक लोक सायंकाळी क्लबमध्ये जाऊन वेळ घालवितात. कित्येक राजकारणाच्या गप्पांमध्ये वेळ खर्च करतात. या सर्वांना सवयी म्हणा, छंद म्हणा किंवा विरंगुळा म्हणा लागतोच. या पाठीमागे कोणताही दुसरा पवित्र हेतू असत नाही. यासाठी आयुष्याचे पृथःकरण केले तर असे आढळून येते की, अर्धे आयुष्य झोपेत जाते. दहा ते बारा तास व्यवसायात अर्थार्जनासाठी खर्च केले जातात व जे काही उरते त्यात हे विविध सवयी, मुलाबाळांत खेळणे, त्यांचेबरोबर भोजन करणे, वर्तमानपत्रे वगैरे वाचून दररोज जगात काय चालते ते सर्व समजावून घेणे यात जाते.
एका सद्‌गृहस्थास विचारणा केली की, 'सबंध आयुष्यभर तुम्ही काय केले?' तर 'वरील गोष्टींव्यतिरीक्त काही केले नाही'. संसार केला हे गोंडस नाव त्यास दिले जाते. त्यास जर विचारले, 'तुम्ही थोडासा तरी विचार केला का की, तुम्हास या मनुष्य जन्मास घातले कोणी? उत्तम शरीरप्रकृती दिली कोणी? सर्व संसारातील सुविधा प्राप्त होण्यासाठी भरपूर धनसंचय करण्याइतपत धन कोणी दिले? सर्व मुलाबाळांसाठी शिक्षण व लग्नकार्ये कोणाच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडली?' तर तो चटकन म्हणतो, 'ईश्वरकृपेमुळे'. मगं असे विचारावेसे वाटते की, 'त्या परमात्म्याचे स्मरणासाठी आयुष्याचा किती वेळ खर्च केला?'. तर उत्तर एकच येते की, 'ते करण्यास
आयुष्यभर वेळच सापडला नाही'
असे जर आहे तर पशुपक्षी, किडामुंगी यांचे जीवन व आपण मानवाचे जीवन यात फरक काय ? एक दिवस या जगात जन्म घेऊन या व याच वरील गोष्टीत आयुष्य व्यतीत करावयाचे व एक दिवस कोणत्यातरी आजाराचे आहारी जाऊन मरून राख व्हावयाचे, एवढेसाठीच परमदयाघन ईश्वराने मानव जन्म दिला आहे का? किंवा यापेक्षा अधिक अपेक्षा परमेश्वराची असते. या सर्व गोष्टींचा विचार कोणीही व केव्हाही करीत नाही. म्हणून एका महात्म्याने म्हटले आहे,
"आला आला प्राणी जन्मासी आला,
गेला गेला व्यर्थ मरूनी गेला".
येतो तो एकटा व जातो तोही एकटा जातो. येताना काही बरोबर आणीत नाही व जातानाही काही बरोबर नेत नाही. मगं हे येण्याजाण्यास काय अर्थ आहे?. या सर्व गोष्टीचा विचार गुरुलोकच करावयास लावतात. असे जीवन जगणाऱ्यास काही रोग आला व डॉक्टर ज्यावेळी सांगतात की, या रोग्यास वाचविणे माझ्या हातात नाही. मगं लोक ईश्वराची आठवण करतात. त्यास नवस बोलतात. अंगारे धुपारे करतात.

मग हा ईश्वर कोण आहे की ज्याची तुम्ही आताच फक्त आठवण करता? तर या सर्व गोष्टींचा खुलासा आपले गुरूदेव करतात. ईश्वराची पेटी किल्ली लावून ती उघडतात व आत काय आहे याची माहिती सांगतात. काही त्यातील पाहिजे असल्यास माझी किल्ली मी देऊ शकतो, पण माझ्या सांगण्याप्रमाणे आपण वागाल तर.
ईश्वराने सर्व सामानाची पेटी गुरूंच्याकडे दिली आहे व त्या किल्लीने आतील सामान दाखविणे, त्याची माहिती देणे, आपणास त्यातील पाहिजे असल्यास त्याची किंमत सांगणे व ती दिल्यानंतर त्या मालाचे वितरण करणे ही सर्व कामे गुरूरूपी व्यक्तींवर सोपविलेली असतात. पेटी परमात्मा मानवाचे हातात कधीच देत नाहीत. मग ती किल्लीने उघडणे तर दूरच राहिले. वरील सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे व ते म्हणजे गुरूरूपी ईश्वरकृपा. ती प्राप्त झाली तरच मानवाच्या आयुष्याचे सार्थक होते.

म्हणून भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज सांगतात की, सर्व छंदाबरोबर, सवयीबरोबर भगवान उपासनेचा छंद गुरूदेव मानवास लावतात. त्यामुळे ईश्वरकृपारूपी पेटी मिळते. साधना केल्यानंतर किल्ली प्राप्त होते व ती मगच उघडता येते. कृपारूपी सामानाची प्राप्ती होते. यासाठी गुरूंचे गुरु भगवान श्रीदत्तात्रेयस्वरूपी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे चरण घट्ट धरले की, गुरूरूपाने कृपारूपी पेटी खोलतात व सर्व मनोकामनारूपी अमृत ते पाजतात, शेवटी आपणास परमपदाची प्राप्ती करून देतातच.

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड.

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६५.          अमृतसागर, कृपासिंधू, पतितपावन, दीनवत्सल, भ...
05/05/2026

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतबिंदू क्रमांक १६५.

अमृतसागर, कृपासिंधू, पतितपावन, दीनवत्सल, भक्ताभिमानी, भगवान दत्तात्रेय आपल्या परमप्रिय शिष्याला सांगतात, " राजसा, हे जग एक कार्यशाळा आहे. प्रत्येक व्यक्ती या कार्यशाळेत विविध कार्याचे ज्ञान शिकते. पण प्रत्येकाचा उद्देश एकच असतो व तो म्हणजे अर्थार्जन. हे शिष्याचे मनावर गुरूसुद्धा ठसवितात. पण फरक एवढाच असतो की अर्थार्जनाचा उपयोग व्यवहारीक सुख मिळविणे व आयुष्यभर सर्व दिवस सुखात व आनंदात जावे असे वाटते. पण गुरूंच्या कार्यशाळेत प्रथम धडा दिला जातो तो असा की, ईश्वराने मानवाची निर्मिती फक्त ऐहिक सुख भोगण्यासाठी व संसार म्हणजे ज्या कार्यात अर्थ नाही, जीव नाही असे कार्य नाहक वेळ घालवून करण्यापेक्षा सजीव कार्य करण्यासाठी व पुण्य संपादन करून ईश्वरप्राप्तीसाठी आहे. कारण माणसास पैशाने सर्व ऐहिक सुख ज्याला म्हणतात त्याची प्राप्ती होते. पण सर्व मिळाले तरी व त्याला विचारले की, 'तू सुखी आहेस का?' तर तो सांगतो, 'फक्त एका गोष्टीची कमतरता आहे व ती म्हणजे शांती आणि समाधान'. ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या हातात ठेवल्या आहेत. त्या पैशाने मिळत नाहीत. कारण मनुष्य प्राणी कितीही मिळाले तरी आणखी यापेक्षा अधिक मिळावे असे वाटणारा आहे.

एखाद्याचे कुटुंब थोडे असेल तर त्याला विचारा, 'तुला राहण्यास तीन खोल्या व एक स्वयंपाकघर पुरे ना?'. तो म्हणतो, 'मला चार खोल्या व एक स्वयंपाकघर मिळावे असे वाटते'. एखाद्यास विचारले, 'तुला दहा हजार रूपये पगार पुरे ना?' तर तो म्हणतो, 'मला पंचवीस हजार मिळावे असे वाटते'. एखाद्यास विचारले, 'तुला दररोज भोजनासाठी भात, आमटी, पोळी किंवा ज्वारीची भाकरी, थोडी भाजी व दुध, ताक याने पोट भरेल ना?' तो म्हणतो, 'पोट भरेल, पण काही चमचमीत पदार्थ त्या जेवणात असतील तर बरे'. एखाद्यास विचारले, 'तुला लांब नोकरीस जावे लागते तर वाहन म्हणून स्कूटर चालेल का?' तर तो म्हणतो, 'लहानशी गाडी असेल तर चांगले'.
म्हणजे कोणत्याही प्राप्त होणाऱ्या वस्तूमध्ये समाधान न मानता अधिक मिळावे अशी इच्छा होते म्हणजे त्याची हाव किंवा अभिलाषा दिवसेंदिवस वाढत जाते, कमी होत
नाही.
तर गुरूदेव पहिला धडा त्यास देतात की, हाव एकदम कमी झाली पाहिजे व तसे शिक्षण संसारात कोणाकडूनही मिळत नाही. ते फक्त गुरूरूपी ईश्वरच देतात. प्रथम त्या दयाळू परमेश्वराने आपणास किती गोष्टी दिल्यात याचा पाढा भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराज सांगतात की, ईश्वराने मानवास निरोगी काया व पोटापुरते अन्न, वस्त्र व धन दिले. त्यावर संतुष्ट रहावे . हे सर्व वैभव न टिकणारे आहे. शाश्वत सुख मिळवून ईश्वराचे स्थान की जे सर्व सुखाचे भांडार आहे, ते प्रयत्नाने मिळविण्याचा मानवाने प्रयत्न करावा. जीवनाची इतिकर्तव्यता ईश्वरप्राप्तीच असावी. कोणाचा द्वेष करू नये. सर्वांवर उपकारच करावे. दुःखीतांच्या पीडा नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करावे. रोगी असतील त्यांची देखभाल करून सेवा करावी. लहान मुलांची बुद्धी तल्लख असते, त्यांचे बुद्धीस चांगले वळण लावावे. गृहस्वामिनीने काटकसरीने संसार करून, धनाची; भविष्यातील संकटांना तोंड देता यावे, कुणाकडे याचना करावी लागू नये यासाठी बचत करावी. लोकसंग्रह करावा. आपल्या गोड बोलण्याने सर्वांना आनंद द्यावा. थोडीशी ईश्वराची भक्ती करावी. कारण सर्व सुखसोयी त्याचे इच्छेनेच प्राप्त होतात. शरीर जसे व्यायामाने काटक व ताकदवान होते, तसे मन ईश्वरसेवेने व संयमाने बळकट होते. तो निर्भय होतो. आयुष्याचे वस्त्र सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असते. सुखाचा धागा केव्हा संपेल व दुःखाचा धागा केव्हा सुरू होईल हे कळत नाही. तरी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, धैर्याने त्या संकटांवर मात करण्यास शिकले पाहिजे. या सर्व गोष्टींचे शिक्षण गुरूदेव देतात व हे सर्व ईश्वरकृपेनेच प्राप्त होणार आहे. तरी ती अमोघ कृपा प्रथम मिळविली पाहिजे. यासाठी गुरूदेवांनी दिलेली उपासना तंतोतंत, चिकाटीने, जिद्दीने, परिश्रमाने पूरी करावयाचीच.

यासाठी गुरूंचे गुरू भगवान दत्तात्रेयस्वरूपी भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांना अनन्य शरण गेले की त्यांची पूर्ण कृपा होते व त्या मानवास ऐहिक सर्व सुखाची प्राप्ती होतेच व अंतिम समाधान प्राप्त होते.

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतधारा क्रमांक ६७.                          पूर्णपरब्रह्म, परमात्मा, परम...
03/05/2026

परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतधारा क्रमांक ६७.

पूर्णपरब्रह्म, परमात्मा, परमपावन, परमदयाधन, परमकारुणिक, अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक, राजांचे अधिराजे, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष, योगसम्राट, पतितपावन, भगवान दत्तात्रेय आपल्या परमप्रिय शिष्याला सांगतात. तसेच वेदमूर्ती नारायणस्वरूप वेदधर्मामुनी आपल्या प्रेमसागर दिपक शिष्याला कथन करतात. तसेच जिज्ञासू पित्याला त्याचा ज्ञानी पुत्र श्रवण करवितो.
परमार्थमार्गात नियमितपणाला अत्यंत महत्व आहे. तसेच एखादे कार्य पूर्णत्वास नेण्याची त्याच्या ठिकाणी धमक पाहिजे म्हणजे जिद्द पाहिजे. जे कार्य अंगिकृत केले असेल, त्या कार्याबद्दल प्रेम पाहिजे. ते कार्य मीच पूर्ण करणार आहे असा वृथा अभिमान नसला पाहिजे आणि मी ते कार्य पुरे केले अशी फुशारकी मारु नये. कोणी ' ते कार्य आपण केले ' अशी आपली स्तुती केली तरी त्याबद्दल हुरळून जाऊ नये किंवा त्या कार्यामध्ये दोष दाखविले वा दोषाचा आरोप केला तरी त्याबद्दल विषाद मानू नये. आपल्या मनाला ते कार्य करण्यापासून परावृत्त करु नये. यासाठी कार्याला आरंभ करतेवेळी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे.आपल्या गुरूदेवांना मनोमन वंदन करावे व मी हे कार्य पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो, पण त्यात आपली कृपा पाहिजे. अशी विनंती करावी.
अशी शिस्त पूर्णपरब्रह्मांनी देवांनासुद्धा घातली आहे. भगवान सूर्यनारायणालासुद्धा केव्हा उदयाचलावर यायचे हे ईश्वराने ठरविलेले आहे. चंद्राने पूर्णत्वाने केव्हा प्रकाश पाडायचा हे सुद्धा ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यामध्ये एकही दिवस कमीजास्तपणा होत नाही. जे मंगल दिवस असतात ते सवडीप्रमाणे पुढे ढकलता येत नाहीत. म्हणजे एकादशीच्या दिवशीच एकादशी येणार. अंगारकी संकष्टी रविवारी किंवा सोमवारी येत नाही. शनिप्रदोष बुधवारी येत नाही. सूर्यनारायण रजेचा अर्ज टाकत नाहीत आणि टाकला तरी त्यांची रजा मंजूर होत नाही. पर्जन्याने केव्हा वर्षाव करावा हे ईश्वराने ठरविलेले असते. अकाली पर्जन्यवृष्टी होते, ती ईश्वराच्या इच्छेनेच होते. ज्यावेळी पृथ्वीवर वास करणाऱ्या मानवाच्या हातून अनेक दोष घडतात, त्यावेळी ईश्वर त्यांचे जीवन विस्कळीत करतो व त्यांना त्यापासून दुःखाची प्राप्ती होते. कोणत्याही पर्वताला वाटले आपण आपली जागा सोडून दुसरीकडे जाऊ. तरी तसे घडत नाही. म्हणून म्हटलेले आहे,
पर्वताने अचल रहावे ही माझी सत्ता
ज्यावेळेला मोठा प्रभंजन सुटतो, त्यावेळी क्षणामध्ये होत्याचे नव्हते होते. वादळ आले कुठून आणि गेले कुठे हे कोणीही सांगू शकत नाही.

यासाठी प्रत्येकाने ईश्वराने घालून दिलेले नियम काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. काकडआरती सकाळी ११ वाजता करता येत नाही किंवा शेजारती संध्याकाळी ५ वाजता करावी असे होत नाही. लोकांना करमणुकीच्या कार्यक्रमास रात्रौ ९ वाजता जावयाचे असते, म्हणून लोक रात्रौ ८.३० वाजता शेजारती करतात. सायंकाळी सूर्यास्ताची वेळ कोणत्याही कारणास्तव पुढे नेता येत नाही किंवा सूर्यनारायणाला त्याचा अवलंब अगोदर करता येत नाही. म्हणून ईश्वराने घालून दिलेले जे नियम आहेत त्यांचे पालन प्रत्येकाने
केलेच पाहिजे.
प्रत्येकाची काम करण्याची कार्यक्षमता ईश्वराने घालून दिलेली असते, म्हणून निवृत्तीचे वय ५८ किंवा ६० हे लोकांनी ठरविलेले आहे, ईश्वराने ठरविलेले नाही. पण ईश्वराची उपासना किंवा भक्ती यावर कालाचे बंधन असत नाही. मग ज्या काही अकाली गोष्टी मानवाच्या आयुष्यात दिसून येतात ती मानवाची दुर्बलता होय. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतला की मनुष्यास अजीर्ण होते. भर उन्हामध्ये मस्तकावर आवरण न घेता गेले की त्यास मस्तकशूल प्राप्त होतो. पर्जन्यामध्ये छत्रीशिवाय गेले व आपले अंग भिजले तरच सर्दीपडशाला तोंड द्यावे लागते. प्रमाणापेक्षा जास्त श्रम केले की त्यास ज्वर प्राप्त होतो. म्हणजे ईश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचा भंग केला की निसर्ग त्याला तडाखा दिल्याशिवाय सोडत नाही. रस्त्यावरुन बेसावधपणाने चालून किंवा आपले मन दुसरीकडे व्यग्र केले तर अपघातास तोंड द्यावे लागते. म्हणून मार्गामध्ये मोबाईल कानाला लावायचा नसतो. एखादा गाडीचालक गाडी चालवित असता त्याने शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे वळून बघावयाचेसुद्धा असत नाही. एवढेच नाही तर त्याने एकही अक्षर शेजाऱ्याशी बोलावयाचे असत नाही. याला अपवाद ईश्वराचे गुणगान किंवा संतांच्या लीला सांगणे किंवा ऐकणे. त्याचे लक्ष आपली गाडी ज्या रस्त्यावरुन चालली आहे तिकडे असले पाहिजे. पण आपण ज्या वेळेस शिस्त पाळतो त्याच वेळी इतरांस शिस्तीचा उपदेश करता येतो.

हाच नियम भगवान श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी त्रिविक्रमभारर्तीना; ज्यावेळी त्यांनी आपली श्रीमहाराजांजवळ राहण्याची इच्छा प्रगट केली, त्यावेळी तुम्ही कुमसीला राहून धर्मप्रचार केला पाहिजे असे सांगितले व त्याप्रमाणे ते कुमसीस राहून धर्मप्रचार करीत असता ;
त्यांचेकडे दोन विद्वान ब्राह्मण आले व आपण वेदज्ञ आहोत व आपल्याशी वेदचर्चा करावयाची आहे, असे त्रिविक्रमभारतीना म्हणाले. तेव्हा परोपरीने त्यांनी त्या ब्राह्मणांना ते काम फार कठिण आहे व त्याचे ज्ञान ईश्वराशिवाय कोणासही संपूर्णपणे असत नाही आणि मी तर वेद जाणण्यास असमर्थ आहे असे सांगितले. हे त्रिविक्रमभारतींचे उत्तर ऐकताच त्या ब्राह्मणांनी " आम्हाला जयपत्र द्या " असे सांगितले. त्रिविक्रमभारतींनी सांगितले, " आमच्यासारख्या संन्याशाकडून जयपत्र घेण्यात तुमचा काय लाभ आहे? तेव्हा आपण त्याबद्दलचा आग्रह सोडावा आणि तसे नसेल तर आमच्याबरोबर गाणगापुरास चलावे. तेथे आमचे गुरूदेव वास्तव्य करतात. त्यांच्या आज्ञेने आम्ही आपली इच्छापूर्ती करु." असे म्हणून, त्या दोन ब्राह्मणांचा अभिमान नाहीसा करण्यासाठी त्रिविक्रमभारती त्या ब्राह्मणांना घेऊन गाणगापुरास आले. श्रीमहाराजांनीसुद्धा " वेद ईश्वरीय कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणासही जाणता येत नाहीत, अशी ईश्वराची कृपा अनन्य शरणागतीने ईश्वराच्या सान्निध्यात गेल्याशिवाय होत नाही व तुम्ही जसे आलात तसेच परत जा " असे सांगितले. आमच्यापासून वादाची किंवा जयपत्र मिळविण्याची अपेक्षा ठेवू नका. पण हे श्रीमहाराजांचे सांगणे अभिमानाने तुडूंब भरलेल्या त्या ब्राह्मणांना कसे पटणार! ही महाराजांची प्रत्येक गोष्ट त्यांना विपरीत वाटू लागली. कारण सर्पदंश झालेल्या मनुष्याला गोड वस्तू तिखट लागते व तिखट वस्तू गोड लागते. तसेच गर्वाने फुगलेल्या मनुष्याला कितीही कल्याणाचा मार्ग सांगितला तरी त्याप्रमाणे वागण्यास तो इच्छित नाही.
याचा परिणाम म्हणजे श्रीमहाराजांचा त्यांच्यावर रोष झाला व त्यांनी मार्गावरुन जात असलेल्या एका मातंग मनुष्यास बोलावून आणले. त्याच्या सर्वांगावर भस्माचे सिंचन करुन त्याला ज्ञानी केले व त्या गर्विष्ठ ब्राह्मणांशी ज्ञानचर्चा करण्याचा त्यास आदेश दिला. त्यावेळी त्या मातंगाच्या मुखावर दैवी तेज झळकू लागले. ते पाहून वादासाठी आलेले ब्राह्मण प्रभावित झाले व श्रीमहाराजांना शरण आले. तरी श्रीमहाराजांनी तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल अशा आपल्या शापवाणीचा उच्चार आपल्या मुखाने केला व त्यांना परत पाठविले. यावर ते ब्राह्मण आपल्या गृहीसुद्धा जाऊ शकले नाहीत. मार्गामध्ये असलेल्या एका नदीच्या काठी ते हृदयशूळाने मृत्युमुखी पडले.
इकडे चांडाळाची स्त्री आपल्या मुलांना घेऊन श्रीमहाराजांकडे आली व आपला पती घरी येत नाही असे तिने सांगितले व आम्हाला स्पर्शसुद्धा तुम्ही करु नका असे बोलू लागल्यामुळे आता आम्ही कोठे जावे? त्यावेळी महाराजांना लक्षात आले की हा भस्माचा प्रभाव आहे. म्हणून त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका लुब्धकाला पाचारण केले व त्याच्याजवळील पाण्याने त्या मातंगाला स्नान घालावयास सांगितले. तसे करताच मातंगाच्या अंगावर असलेली दिव्य विभूती धुऊन गेली व तो मातंग अज्ञानी झाला आणि लगेच आपल्या मुलाबाळांमध्ये मिसळून आपल्या घरी निघून गेला.
हा प्रकार त्रिविक्रम भारतींनी बघून त्यांना विभूतीचे महत्व समजले व त्यांनी श्रीमहाराजांना भस्ममहात्म्य सांगण्याची प्रार्थना केली.

म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या इच्छेची पूर्तता गुरूकृपेनेच व्यक्त होते. पण गुरूकृपा अनन्यभावाने त्यांना शरण जाऊन त्यांनी दिलेली उपासना केली की प्राप्त होते.

यासाठी भगवान श्रीस्वामीसमर्थांना प्रसन्नचित्त पाहून शिप्यांनी प्रार्थना केली. अहिल्येचा उद्धार करून विश्वामित्रऋषी रामलक्ष्मणांना घेऊन जनकपुरीकडे रवाना झाले. मार्गामध्ये त्यांनी रामप्रभूना सांगितले की, सीता ही जनकराजाची कन्या कशी? तर त्याची एक दिव्य कथा आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो.
एकदा एका सधन गृहस्थाने आपली जमीन एका गरीब शेतकऱ्याला दान केली होती. तो शेतकरी ती जमीन नांगरण्यासाठी नांगर घेऊन शेतात गेला असता नांगरताना त्याचा नांगर कोणत्यातरी वस्तूला स्पर्श करुन थांबला. तेव्हा त्याने ती जागा उकरली, तर त्यास एक लाकडी पेटी आढळली. ती पाहून त्याला फार आश्वर्य वाटले. त्याने ती पेटी उघडूनसुद्धा न पाहता तो शेताच्या मालकाकडे ती पेटी घेऊन गेला व त्या मालकाच्या स्वाधीन करुन म्हणाला, आपण मला शेताचे दान केले, पण पेटीचे केलेले नाही. त्या शेतकऱ्याने पेटीमध्ये काय आहे हे उघडूनसुद्धा पाहिले नाही. त्यावेळी तो दानी म्हणाला, ज्यावेळी आम्ही तुम्हाला शेत दान दिले, त्यावेळी शेताची मालकी तुमच्याकडे आली व त्या शेतामध्ये असलेल्या पण असून प्रगट होणाऱ्या प्रत्येक वस्तुवर तुमची मालकी आहे. तरी मी तिचा स्वीकार करणार नाही. ती तुमचीच आहे. हा वाद जनक राजांकडे गेल्यानंतर दोघांनीही त्या पेटीचा स्विकार करण्याला आपली संमती दिली नाही.

श्रीस्वामीमहाराज शिष्यांना सांगतात, इतकी निस्पृहता सध्याचे काळी आपल्यास कोठे आढळेल का? अशीच निस्पृह माणसे ईश्वराला आवडतात. मग त्याने साधना किती केली, कशी केली हा प्रश्न गौण असतो.

तेव्हा जनकराजे म्हणाले, ती पेटी उघडा. त्यात काय आहे हे आपण पाहूया तरी! त्यावेळी जनकराजाने आपले गुरू शतानंद यांना बोलावले व त्यांच्या समक्ष ती पेटी उघटली. त्याबरोबर त्या पेटीमध्ये एक सुंदर कन्या त्यांना दृष्यमान झाली. तिला मोठ्या प्रेमाने जनकाने हातात धरुन पेटीबाहेर काढले. त्यावेळी सभेमध्ये 'कडकड' असा मोठा आवाज झाला व दिव्य आकाशवाणी झाली. "ही कन्या प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे. तेव्हा ती आपल्या सान्निध्यात राहील. ती आपली कन्याच आहे असे जाणा व ती विवाहास योग्य झाल्यानंतर तिचे स्वयंवर आयोजित करा. तिचा स्वीकार श्रीविष्णूच करतील'. यावरुन जनकराजाने आपल्या मुलीप्रमाणे तिचा प्रतिपाळ केला. शेतामध्ये सापडली म्हणून तिला 'सीता' हे नामाभिधान प्राप्त झाले. जनकराजाने त्या मुलीचा कन्येप्रमाण स्वीकार केला म्हणून तिला 'जानकी' हे नाव प्राप्त झाले.
अशी विश्वामित्रऋर्षीनी रामप्रभूना सीतेसंबंधीची हकीकत कथन केली. त्यामुळे त्यांच्या समोरुन त्यांचे स्वागत करण्यासाठी जनक राजांचे पुरोहित शतानंद केव्हा त्याठिकाणी आले हे त्यांना कळलेसुद्धा नाही. इतक्या एकाग्रतेने रामप्रभू विश्वामित्रांचे बोल ऐकत होते यावरुन श्रीस्वामीमहाराज आपल्या शिष्यांना सांगतात, इतकी एकाग्रता गुरुंच्या सांगण्याकडे शिष्याची असली पाहिजे.

अशीच एकाग्रता एका केशकर्तन करणाऱ्याची आपल्या व्यवसायामध्ये होती. तो आपल्या कामामध्ये इतका वाकबगार होता की, त्याच्या समोर बसलेल्या माणसाला लहान मुलाच्या टाळूवर आई तेल घालून जसे हात हलविते, तसे वाटत असे. इतका त्याचा हात हलका होता. त्याच्या या कौशल्यामुळे राजासद्धा त्याला नित्य पाचारण करीत असे. एक दिवस राजाला नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर दरबारात जावयाचे होते. म्हणून राजाने या केशकर्तनकाराला आपल्या सेवकाकरवी बोलावणे पाठविले व त्यावेळी हे केशकर्तनकार आपल्या साधनेमध्ये निमग्न होते. त्यांनी राजांना निरोप पाठविला, " आमची ईश्वरी उपासना चालू आहे. यावेळी आम्ही फक्त ईश्वराचे असतो. आम्ही इतर कुणाचेही असत नाही. आमचे येथील कार्य झाल्याबरोबर आम्ही आपणाकडे येऊ." हे त्या केशकर्तनकाराचे उत्तर ऐकल्याबरोबर राजाच्या सेवकाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, " हे उत्तर ऐकल्यावर आपणास कुठल्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे याचा विचार केला का?" त्यावेळी तो केशकर्तनकार म्हणाला, " माझी उपासना चालू असता ती निर्विघ्नपणे पार पाडावी याची काळजी परमात्मा घेतो. " असे सांगून त्याने त्या सेवकाची बोळवण केली आणि तो आपल्या उपासनेत गर्क झाला. परमात्मा आपल्या सेवकाच्या सतत संन्निध असतात. ते सेवक राजवाड्यात जाण्यापूर्वी प्रत्यक्ष परमेश्वराने हे घृणीत कार्य आपल्या खांद्यावर घेतले व सबंध ब्रह्मांडाचा रक्षण करणारा परमात्मा केशकर्तनकाराची धोपटी खांद्यावर घेऊन राजवाड्यात जाऊन राजाचे केशकर्तन करण्याचे कार्य करुन बाहेर पडला. त्यावेळी मार्गामध्ये त्या सेवकांनी त्या केशकर्तनकारास पाहताच त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना व ते म्हणाले, " आपण त्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हा राजवाड्यात गेला केव्हा व राजाचे केस कर्तन करुन परत निघालासुद्धा!" त्या आश्चर्याने ते सेवक राजगृहाकडे निघाले. ते प्रख्यात ईश्वराचे भक्त सेनान्हावी होते. त्यांनी राजाचे केस कसे कर्तन केले व राजाला कोणती दिव्य अनुभूती आली, हा सुंदर भाग भगवती जगदंबेच्या कृपेने आम्ही पुढील धारेमध्ये विशद करु.

|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड.

परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतधारा क्रमांक ६६.                      पूर्णपरब्रह्म, परमात्मा, परमदयाघ...
25/04/2026

परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतधारा क्रमांक ६६.

पूर्णपरब्रह्म, परमात्मा, परमदयाघन, परमकारुणिक, अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक, राजांचे अधिराजे, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष, योगसम्राट भगवान दत्तप्रभू आपल्या परमप्रिय शिष्याला सांगतात. तसेच योगमूर्ती पतितपावन वेदधर्माऋषी आपल्या अनन्यगतीक दिपक शिष्याला कथन करतात व जिज्ञासू पित्याला त्याचा ज्ञानसमृद्ध पुत्र कथन करतो.

पुण्यमार्गामध्ये प्रत्येक गोष्ट, ती आपल्याला योग्य किंवा अयोग्य वाटली तरी आपल्या गुरूदेवांच्या सांगण्यानुसार केली पाहिजे. पण अयोग्य वाटणे हा प्रश्नच संभवत नाही. कारण गुरूंची प्रत्येक गोष्ट कल्याणप्रदच असते व त्यामध्ये शिष्याचे हितच समाविष्ट झालेले असते. कारण गुरूंच्या मनामध्ये शिष्याचे सर्वांगिण मंगलच व्हावे अशी इच्छा असते. आपणास ती गोष्ट कितीही कठीण वाटली, दुर्बोध वाटली, निराशाजनक वाटली, आपल्याकडून चुकीचे होत आहे अशी भावना झाली, आपल्याकडून तिचे पालन होईल किंवा नाही याबद्दल संभ्रम वाटला की ते आपल्या मनातले दुर्विचार काढून टाकले पाहिजेत व ईश्वराच्या स्थितीचा आपल्याला त्यावेळी अर्थ दुर्बोध वाटला, आपल्या बुद्धीस ती विपरीत वाटली तरीसुद्धा ती गुरूंनी सांगितली हे लक्षात घेऊन गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून त्या गोष्टीचा अंगिकार केला पाहिजे. कारण प्रत्येक कृती आपल्या पूर्वजनित प्रारब्धामुळे घडतात आणि मग ते प्रारब्ध कितीही दुर्निवार्य असले तरी ते ईश्वरकृपेने म्हणजेच गुरूकृपेने नष्टप्राय होते. त्यासाठी गुरुआज्ञा शिष्याने तंतोतंत पाळावी .

अशीच कृती श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी ब्राह्मणाच्या घरी असलेल्या वांझ म्हैशीस दुग्धवती करुन गाणगापुरच्या जनतेस विस्मित केले. कर्णोपकर्णी हा चमत्कार तेथील अधिकाऱ्याच्या कानावर गेल्यावर त्याला असे वाटले की अशी महाविभूती आपल्या गावापासून एकाकी संगमावर रहावी हे आपल्याला लांछनास्पद आहे, त्यांना गावात आणले पाहिजे. हा विचार त्याच्या मनात पक्का झाल्याबरोबर त्याने आपल्याबरोबर हत्ती, घोडे मंगलवाद्ये घेऊन पालखी समारंभासह तो श्री यतीमहाराजांना गाणगापूर गावात आणण्यासाठी संगमस्थानावर प्राप्त झाला. तेथे गेल्याबरोबर त्यांने श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला. इतके दिवस आपण त्यांची उपेक्षा केल्याबद्दल क्षमा मागितली व आपल्या समागमासमवेत आलेल्या सालंकृत पालखीमध्ये बसवून आपल्याबरोबर सर्व लोकांना पावन करण्यासाठी गावामध्ये चलण्याची त्याने प्रार्थना केली. त्यावेळी आता प्रगट होण्याची योग्य वेळ आली असे समजून श्रीमहाराज पालखीमध्ये विराजमान झाले व त्यांच्याबरोबर गावात आले. वाटेमध्ये त्यांना एक अश्वत्थाचा मोठा वृक्ष लागला. त्यावर एका ब्रह्मराक्षसाची
वस्ती होती व तो लोकांना त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या आसपासची घरे ओस पडली होती.
श्रीमहाराजांचे दर्शन झाल्याबरोबर तो झाडावरुन खाली आला व त्याने श्रीमहाराजाना साष्टांग नमस्कार घातला व आपणास या योनीतून मुक्त करण्याची प्रार्थना केली. बरीच वर्षे त्या राक्षसाने या योनीमध्ये व्यतीत केली असे जाणून त्या योनीतून आपल्या कृपेने त्याला मुक्त केले व तो उत्तम गतीला प्राप्त झाला. त्यामुळे त्या वृक्षाच्या सभोवतालची सर्व जागा भितीमुळे दूषित होणारी ती भितीरहित केली व आपणास येथे मठ बांधून देण्याची त्या अधिकाऱ्यास आज्ञा केली व त्या मठामध्ये श्रीस्वामीमहाराज वास्तव्यास आले.

ही हकीकत, गाणगापूरपासून जवळच असलेल्या कुमसी गावामध्ये त्रिविक्रमभारती या नावाच्या संन्याशाचे वास्तव्य होते त्यांना समजली. ते श्रीनृसिंह उपासक होते. त्याला महाराजांच्या गाणगापूरातील त्यांनी केलेल्या लीलेचे वर्तमान पाहून त्याने श्रीमहाराजांवर टीका केली व तो म्हणाला, संन्याशाला असे चमत्कार शोभा देत नाहीत. एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या मनामध्ये असे कुविचार येणे प्रशस्त असत नाही. ते दुर्विचार त्याच्या मनातून काढून टाकण्याचा श्रीमहाराजांनी आपला विचार गाणगापूरच्या त्या अधिकाऱ्यास सांगितला व आपल्याला त्याच्या भेटीस जावयाचे आहे तरी तयारी करा, असे सांगितले व एक दिवस पालखीमध्ये आरोहण करुन सर्व लवाजम्यासह ते त्रिविक्रमभारती याला दर्शन देऊन पुनित करावे व त्याच्या मनातील हा दुर्विचार नष्ट करावा व त्यास योग्य मार्गदर्शन करावे या हेतूने श्रीमहाराज कुमसीस गेले. ते आपल्याकडे येत आहेत असे त्रिविक्रमभारतीस कळताच त्याला फार आनंद झाला. तो माठ्या त्वरेने श्रीमहाराजांना सामोरा गेला. तेव्हा त्याला असे दिसले, श्रीमहाराज एकटे बसलेले नाही, त्यांच्याबरोबर अनेक संन्याशांचा समुदाय आहे. हे विश्वरूप दर्शन श्रीमहाराजांनी त्रिविक्रमभारतीस दाखविले व आपण कोण आहोत याची जाणीव त्यास करुन दिली. त्रिविक्रमभारतीच्या ध्यानामध्ये त्यांची उपास्यमूर्ती श्रीनृसिंह येईना व त्याठिकाणी त्यांना श्रीस्वामीमहाराजांच्या स्वरुपाचे मंगल दर्शन झाले व त्यांनी मार्गामध्ये श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला व बद्धांजलीने श्रीमहाराजांची क्षमा मागितली. या त्याच्या कृतीबद्दल श्रीमहाराजांना फार संतोष झाला व त्यांनी मोठ्या आनंदाने मठामध्ये आणून त्यांना आपल्या संन्निध बसविले. त्यावर त्रिविक्रमभारतींनी आपणास आपल्याजवळ राहण्याची अनुज्ञा असावी अशीही प्रार्थना केली. तेव्हा श्रीमहाराजांनी तुम्ही आपल्या गावीच राहून धर्मप्रचार करावा अशी त्यांना आज्ञा करुन त्यांना कुमसी गावी परत पाठवून दिले.

त्याप्रमाणे श्रीरामप्रभू व लक्ष्मण यांच्या प्रार्थनेवर श्रीविश्वामित्रऋषी त्या दोघांना घेऊन जनकराजाच्या राजधानीकडे रवाना झाले. श्रीस्वामीमहाराज आपल्या शिष्याच्या कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रेमाने अनुमोदन देत असतात. तेव्हा श्रीस्वामीमहाराज ज्यांच्या प्रेमळ इच्छेने श्रीरामप्रभूच्या मंगलचरित्राचे कथन करु लागले, त्यावेळी एका प्रेमळ शिष्याने श्रीमहाराजांना प्रेमाने एक प्रश्न केला की महाराज आम्ही असे ऐकले आहे की जनक राजाला उर्मिला नावाची एकच मुलगी आहे. मग ही सीता त्याची मुलगी कशी? याचा आम्हाला संभ्रम पडला आहे. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, हा सुंदर भाग तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सध्या आम्ही जे सांगतो ते आपल्या कर्णरंध्रामध्ये धारण करा.
म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या मनामध्ये आली तरी ती लगेच गुरूदेवांना कथन करावी. कारण तुमच्या मना मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान गुरूदेवांना असते.

याप्रमाणे, विश्वामित्र जनक राजाच्या राजधानीकडे जात असताना; वाटेमध्ये रस्त्याच्या बाजूला दुसरा एक रस्ता होता त्याकडे वळले. मग मुख्य रस्ता बाजुला राहिला. त्यावेळी प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व त्यांच्या इतर सेवकांना आश्चर्य वाटले. थोडे पुढे गेल्यावर एका रम्यठिकाणी फुलबागांमध्ये त्यांना एक गृहमंदिर आढळले. ते घर निर्मनुष्य होते. पण घरामध्ये एक स्त्री शिलेप्रमाणे शांत होती. तेथे गेल्यावर श्रीरामचंद्र व लक्ष्मण यांना एका दिव्य सुगंधाची अनुभूती आली. रामप्रभूनी ती स्त्री कोण व शिलावत ती निश्चल या ठिकाणी का बसली आहे याची विचारणा केली. त्यावेळी विश्वामित्र त्यांना सांगू लागले, पूर्वी याठिकाणी महातपस्वी गौतममुनी आपली पत्नी अहिल्येसह वास्तव्य करीत होते. पण प्रारब्धवशात गौतमांची पत्नी अहिल्या हिच्या हातून न जाणता गौतमांना न आवडणारे कृत्य घडले. त्यावेळी गौतमांनी आपल्या पत्नीस अमोघवाणीने आज्ञा केली, तू याठिकाणी शिलावत पडून रहा व तपश्चर्या कर. योग्यवेळी अयोध्येचे राजपुत्र श्रीराम व लक्ष्मण यांना घेऊन परमयोगी विश्वामित्रऋषी या ठिकाणी येतील व आपल्या पवित्र हस्ताने तुझ्या मस्तकास स्पर्श करतील, त्यावेळी तू आपल्या पूर्वपदाला प्राप्त होशील. तेव्हा श्रीरामरायांस , " तुम्ही अहिल्येच्या मस्तकाला स्पर्श करावा व आपल्या स्पर्शाने तिला पुनीत करावे ", अशी विश्वामित्रांनी विनंती केली. यावर प्रभू रामचंद्रांनी ती महाविभूती समजून आपल्या हाताच्या अंगुलीने त्या स्त्रीच्या मस्तकास स्पर्श करुन वंदन केले. प्रभूंचा प्रेमळ स्पर्श त्या स्त्रीस अनुभवण्यास मिळाल्याबरोबर अहिल्या त्या स्थितीतून मुक्त झाली व तिने श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा आकाशातून प्रभूवर पुष्पवृष्टी झाली. अप्सरा नृत्य करु लागल्या. गंधर्व गायन करु लागले व सगळीकडे आनंदी आनंद पसरला.
श्रीमहाराज सांगतात, मोठ्या लोकांच्या सान्निध्यामध्ये आनंदाशिवाय दुसरे काय मिळणार !
तेवढ्यात अहिल्येचे पती योगज्ञ गौतममुनी व त्यांचे सुपुत्र शेषानंद हेही त्या ठिकाणी उपस्थित झाले व तो त्यांचा आनंद त्यांनी शतगुणी केला. काही काल रामप्रभू व लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्या सान्निध्यात घालवून गौतममुनी यांनी केलेल्या आदरसत्काराचा स्वीकार करुन ते सर्वजण जनकपुरीकडे रवाना झाले.

याविषयी महाराज सांगतात, कोणतीही चांगली गोष्ट ती प्रथम मनात यावी लागते व ती पक्की झाली की त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. पण कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीस कारण घडावे लागते. 'कारणं विना न कार्यं प्रवर्तते.' असे बरेवाईट प्रसंग सर्वसामान्य मनुष्यांच्या जीवनातच येतात असे नाही, तर ते देवाधिकांच्या जीवनातसुद्धा येतात.

एके प्रसंगी योगसम्राट दुर्वासऋषी इंद्रदेवांच्या भेटीस आले असता मार्गामध्ये त्यांना भगवान महाविष्णूंनी दिव्य माला प्रसाद रुपाने दिली होती. पण मोठमोठे महात्म्ये कितीही चांगली गोष्ट असली तरी ती दुसऱ्यास द्यावी अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असते. म्हणून ती दिव्यमाला देवेंद्रांना अर्पण करावी या इच्छेने प्रेरीत होऊन दुर्वासऋषी इंद्रदेवांकडे आले. त्यावेळी देवेंद्र आपल्या ऐरावतावर बसून मोठ्या ऐश्वयाने काही कामासाठी चालले होते. इंद्रदेवाला पाहिल्याबरोबर दुर्वासांनी ती दिव्य माला तेथेच मार्गामध्ये इंद्रदेवाला अर्पण केली. त्या दिव्य मालेचा स्वीकार इंद्रदेवाने केला. पण ती माला त्यांनी ऐरावताच्या मस्तकावर घातली. याचा दुर्वासांना फार राग आला आणि त्यांनी अयोग्य शापवाणी उच्चारली, श्रीमहाविष्णूंनी दिलेली दिव्यमाला ती एका जनावराच्या डोक्यावर घातली, तेव्हा तुम्ही मोठे लोक फार अभिमानी असता आणि अभिमान माणसाच्या प्रगतीला खीळ घालतो. या न्यायाने अमोघ शापाने इंद्रदेवाला ऐकविले की, तुम्ही दिव्य ऐश्वर्याला योग्य नाही, तेव्हा तुमचे सर्व ऐश्वर्य सागर आपल्या उदरात घेईल. कारण सर्व रत्नांचे भांडार सागर असतो. हे सर्व ऐश्वर्य नष्ट झाल्याने इंद्रदेव आपले गुरु बृहस्पती यांना अनन्यभावाने शरण गेले. त्यावेळी गुरूदेव त्यांना म्हणाले, तुम्ही भगवान महाविष्णूंनी दिलेली दिव्य माला अशा तन्हेने ऐरावताच्या गंडावरती घातली त्यावेळी आमचा विचार घेतला का? मग आता का आम्हाला संकटाचा परिहार करण्यासाठी प्रार्थना करता.
पण एक गोष्ट निश्चित असते, शिष्य कितीही चुकले तरी गुरुकृपा केल्याशिवाय सोडत नाहीत.

बृहस्पती त्यांना सांगतात, तुम्ही केलेली चूक तुम्हाला क्षुल्लक वाटते. पण त्याचा परिणाम फार भयंकर होणार आहे. तेव्हा ते वैभव परत मिळविण्यासाठी फार मोठे परिश्रम करावे लागणार आहेत. कारण माशाने गिळलेले पाणी आणि सागरात गडप झालेली संपदा परत मिळविण्यासाठी फार मोठे कष्ट पडतात. यासाठी तुम्हाला एक न आवडणारी तडजोड करावी लागणार आहे ती म्हणजे दैत्यराज प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा चक्रवर्तीपुत्र राजा बली याच्याशी संधान बांधावे लागणार आहे. ही गोष्ट तुम्हाला कितीही अप्रिय वाटली तरी त्याचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. यावर देवेंद्र म्हणाले, गुरूदेवा, आमच्या लहानशा चूकांचे आम्हाला केवढे प्रायश्चित्त द्यावे लागते याची कल्पनासुद्धा आम्हाला करवत नाही. पण आपल्या इच्छेबाहेर आम्ही नाही. तेव्हा आपण आम्हाला जे सांगाल ते आपले वाक्य आम्ही शिरोधार्य मानू.

यावर गुरूदेवांनी आपली काय योजना आहे ती सांगितली व त्याप्रमाणे देवेंद्र गेल्यानंतर त्यांना काय आनंदाचा ठेवा प्राप्त झाला हा सुंदर भाग भगवती अंबिकेच्या कृपेने आम्ही पुढील अमृतधारेमध्ये कथन करु.

|| श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ||

|| श्री गुरुदेव दत्त ||

संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड.

Address

Vitthal Deo Housing Society, Behind Bank Of India, Koyna Vasahat, Malkapur
Karad
415539

Opening Hours

Monday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Tuesday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Wednesday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Thursday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Friday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Saturday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm
Sunday 7am - 12:30pm
4pm - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadguru Shree Dada Maharaj Zurale Math, Malkapur- Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share