27/09/2017
भास्कर ब्राह्मणाची कथा म्हणजे श्रद्धेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे ,गरीब होता त्यामुळे केवळ तीन माणसांचा शिधा जमवून गुरु महाराजांना भेटावयास आला ,मठात नित्य समाराधना होत असत ,त्यात ह्या भास्कर ब्राह्मणाला निमंत्रित करून जेवावयास नेत आणि रोज असे होत होत काही महिने गेले , मठातील ब्राह्मण मंडळी त्याचा उपहास करू लागली .. प्रत्यक्ष दत्त महाराजांना जेवावयास घालावयाचे भाग्य त्याचे होते ,आणि तो योग येताच गुरु महाराजांची आज्ञा झाली आज तुझी समाराधना असावी, झाले ,भास्कर ब्राह्मण अत्यानंदाने कामास लागला . मठातील ब्राह्मण मंडळी मात्र आज घरी जेवावयास जावे लागेल या तयारीने स्नानास गेली होती त्यावर गुरुमहाराज म्हणाले स्वयंपाक सिद्ध होत असल्यास सर्वाना निमंत्रित करावे . इथे खरा श्रद्धेचा क्षण दिसून येतो ,सर्वाना निमंत्रित करावे असं म्हणताय खर पण तीन माणसांचा शिधा आहे कस होणार ? असं मात्र त्याच्या मनात आल नाही . गुरु आज्ञा प्रमाण ,गेला बोलवायला . ब्राह्मण म्हणाले ,निमंत्रित करतोस तू पण एक एक शीत तरी वाट्यास येईल का ?हे ऐकून भास्कर ब्राह्मण परत आला ,गुरुमहाराज मठात असलेल्या इतर शिष्याना म्हणाले जा सर्वाना बोलावून आणा . यावर मात्र सर्व ब्राह्मण आले ,पत्रावळी करा असा आदेश मिळताच तेही झाले . पंगत बसताना भास्कर ब्राह्मणाला गुरु महाराज म्हणाले हि छाटी सर्व पदार्थांवर घालावी आणि कडेने पदार्थ काढून घ्यावेत आणि पंगतीत वाढावेत . स्वतः गुरुमहाराजांना आग्रह करून वाढावयाचे भाग्य फार दुर्लभ आहे . पंगतीवर पंगती उठल्या ,चार हजार माणसे जेवली खेरीज प्राणी आणि जलचर यांना घालून अन्न संपवले .