१९२३ चा जून महिना होता. दिनांक सुध्दा २३ होती. योगी प्रहराने कळस गाठायला सुरुवात केली होती. भगव्या रंगाने नभांगण उजळून निघाले होते .अशा श्रीराम प्रहरी लक्ष्मण नामक बालकाने सगुणा मातेच्या पोटी नावजी मानेंच्या घरात जन्म घेतला. बाळाच्या स्वागताला मेघदेवता सरसावली. मायणीच्या भूमीवर जलदेवतेने अभिषेक घातला. या तेजःपुंज बालकाचे दर्शन घेण्यास आतुर झालेल्या सुर्यदेवतेने आपल्या सहस्त्राकीरनांनी जन्मोस्तवाचे
स्वागत केले. भविष्यातील दारिद्रीनारायनाचे, नवकोट नारायणाचे दर्शन घेऊन सुर्यनारायण सुद्धा तृप्त झाले.
जेवल्यानंतर आईच्या पदराला तोंड पुसणाऱ्या बालकाची आई बालपणीच देवाघरी गेली.बालपण कोरडे - शुष्क झाले. आईचा पदर नाहीसा झाल्यावर मौल्यवान चादरही नकोशी झाली. उदास जीव सिद्धेश्वर कुरोली येथील मोठ्या बहिणीच्या पंखाखाली विसावण्याचे निमित्त करून आला. सिद्धेश्वराच्या शिवमंदिरातील शिवनाद ऐकून सहज शिवमय झाला. जीव-शिव एकरूप झाला.
या दिव्यत्वाचा लपा - छुपीचा खेळ कुरोलीपासून दूर खेळण्यासाठी भ्रमंती पसंत केली . ते मुंबईला गेले मुंबादेवीने त्यांचे स्वागत केले खरे पण या भोळ्या सांभाला स्मशान शांतता प्रिय वाटे. तेथून बाबा सोमेश्वरला आले. तासन - तास समाधिस्थ होऊ लागले . सोमेश्वरला साध्या वेष्यातील ध्यानमग्न शिव पाहून समाधान वाटले . पुढे वालचंदनगर करून मध्यप्रदेश गाठले. इंदूरहून ते दिल्लीला पोहचले . देशाची सूत्रे हलविणाऱ्या राजधानीत भविष्यातील आपल्या कार्याचा अदृष्य टॉवर इथे उभारला. पुढे पाकिस्तानमधील कराचीत विसावले. कराचीत इस्लाम बांधवांचे कर या मधुकराला जोडले गेले. पुन्हा भारतात आगमन झाल्यावर काशी विश्वेश्वराकडे धावले. प्रयाग, गया हि पवित्र तीर्थस्थळे बाबांच्या चरणांनी अधिक पावन झाली. ज्यांच्या चरणी रिद्धी - सिद्धी लोळण घेत असे श्री चरण पुण्याच्या मुळा - मुठा नदीतीरी धावले. विद्देचे माहेर घर पुणे यशवंत झाले.पुन्हा पाऊले देहू आळंदीकडे वळली. तुकोबांची गाथा सुलभ होऊन त्यांच्या माथ्यावर विराजमान झाली. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी सोपी होऊन त्यांच्या जिव्हेवर स्वार झाली. खंडेरायाच्या जेजूरीचे प्रयाण म्हणजे पिवळ्या धमक भंडाऱ्याने दिलेल्या महात्यागाचे संकेत ठरले. बाबांचे चरण पुन्हा औंधला वळाले. . . आदिशक्ती श्री यमाई देवीचे अंतःकरण शिव अवतार पाहून द्रवले असेल. तेथून ते औंधच्या खिंडीतील जुन्या गणेश मंदिरात थांबले. पुन्हा बाबा कुरोलीत आले ते दिव्यत्वाचा श्री गणेशा करण्यासाठीच !
भ्रमंतीत बाबांनी भारताचे नग्नरुप पाहिले . तीस कोटीच्या आत लोकसंख्या असूनही अन्न, वस्त्र, निवाऱ्याला महाग झालेली जनता पहिली. अज्ञान, अंध:श्रद्धा, जातीभेद , धर्मभेद इ. विषवल्लरी पाहिली. बुद्ध, महावीर, जीझस , पैगंबर, गुरुनानक यांनी विश्वाला कसे तारले हे ही पाहिले. हे मानवतेचे दिपस्तंभ त्यांनी न्याहाळले. हे विश्वची माझे घर हे बाबांचे ब्रीद झाले
कुरोलीत बाबा नगारखाना, चिवटे, सबनिस, गोसावी, गरवारे यांच्या वाड्याच्या परिसरात रहात. पाच घरी माधुकरी मागत. हातात काठी व खांद्याला सर्वधर्मसमभावाची झोळी होती. बाबांनी जीवांच्या उद्धारासाठी माधुकरी मागणे पसंत केले. कुबेराच्या धनाच्या किल्ल्या कमरेला असूनही देव भक्तांच्या कल्याणासाठी भिक्षूक झाला. मांग, महार, कुंभार, लोहार, जैन, मुसलमान यांची भिक्षा स्विकारी. मिळालेल्या माधुकरीचे तीन भाग करत. एक श्वानाला दुसरा माशाला व उरला तो स्वतःला त्रिखंडाचा स्वामी अमृताचा त्याग करून वाळलेला भाकरीचा तुकडा भिजवून घशात ठेवत. वेदावती नदीच्या काठावर भगवंताच्या माधुकरीची वाटणी पाहून वेदावातीच्या डोळ्यातून अश्रु घळघळले असतील.
हे दिव्यत्य स्वयंभू होते. ते निसर्गाचे वरदान होते. शिवशंभूचे स्वयंभूत्व लपविण्यासाठी चिंध्याधारी झाले. मग कुणाची भांडी घासणे, पोस्टात पत्रे टाकणे, झाडलोट करणे, सारवणे अशा प्रकारची कामे करू लागले . झोपायला पोते, अंगावर पोते, नेसायला पोते, डोक्यावर पोते. हे पोतेच त्यांचे अजरामर आसन ठरले. डोक्यावर झिंज्या अंगावर चिंध्या असा अवतार करूनही सर्वांना बाबाचा सहवास प्रिय,अपूर्व वाटे. बोलण्यात आणि कृतीत गुढता असे. सहजा - सहजी उकल होत नसे . सिंहाने गुहेतून डरकाळी फोडल्याप्रमाणे आवाजात प्रचंड धार होती . त्यांचे वसने, हसणे, बसने, बोलणे, बिडी ओढणे सगळेच ठळक वाटे. आगळे- वेगळे वाटे. त्यांच्याकडे बघत - बघतच बघणाराचे हात आपोआप जोडले जात. त्यांचा केवळ दर्शनानेही लोकांची अडलेली कामे विनासायास पार पडत. या अवस्थेत बाबा स्मशानभूमीच्या परिसरात, एकांतात, वृक्षवल्लरीच्या, पशु-पक्ष्यांच्या सहवासात असत