28/01/2024
भारतीय विवाह पद्धत –
गणपती, दिवाळी, दसरा यांसारखे मोठे आणि महत्त्वाचे सण पार पडले की बाजाराला वेध लागतात ते लग्नसराईचे आणि पाठोपाठ होणाऱ्या खरेदीचे. लग्न हा सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार असला तरी अलीकडे तो एक मोठा इव्हेंट झालेला असल्याने कपडे आणि इतर खरेदी मोठ्या उत्साहाने आणि धूम धडाक्यात होते. लग्न ठरले की आधी साखरपुडा.
पूर्वी लग्नाची बैठक झाली, की मुलाची आई मुलीची ओटी भरून तिला खराखुरा साखरेचा पुडा देत असे. (देणी-घेणी, मान-पान यांचा ठराव ज्या बैठकीत पक्का होतो, ती लग्नाची बैठक. हल्ली देणी-घेणी, मान-पान हे प्रकार सुशिक्षित मध्यमवर्गीयांत कमी होतायत हा एक स्वागतार्ह बदल.) मराठी लग्नपद्धतीत लग्नाच्या आदल्या दिवशी वाङ्निश्चय नावाचा तो विधी असतो, तोच साखरपुडा. या वेळी मुलीला हिरवी साडी देतात.(ही साडी बऱ्याच ठिकाणी मुलगी लग्न विधीच्या वेळी नेसते.) अलीकडे रूढ झालेली अंगठ्या घालण्याची पध्दत आपण पाश्चात्यांकडून (खरं म्हणजे चित्रपटांतून) उचलली आहे आणि जंगी समारंभ म्हणजे तर निव्वळ हौस. हिंदी सिनेमा आणि मालिकांतून दिसणाऱ्या संस्कृतीच्या प्रभावामुळे अलीकडे मराठी सिनेमा-मालिकांत किंवा अगदी खासगी लग्न समारंभात सुध्दा सात फेरे, मेंदी-संगीत, मुलाचे जोडे लपवणं, ऐन मुहूर्ताच्या वेळी मुलीला उचलून उंच धरणं वगैरे गोष्टी बघत असलो तरी मराठी लग्नात सात फेरे नसतात. लाजाहोमाच्या वेळी होमाला तीन प्रदक्षिणा घालून सप्तपदी म्हणजे सात पावलं एकत्र चालून प्रत्येक पावलावर एकमेकांना नवं वचन देऊन वधू-वर वैवाहिक जीवनात प्रवेश करतात. हिरवा रंग नवनिर्मितीचा. त्याचं प्रतीक म्हणून नवरी मुलगी हिरव्या बांगड्या घालते आणि हिरवी साडी नेसते. (लग्नानंतर ती आई होणार असते.) मराठी लग्नात पिवळं वधूवस्त्र मामा देतो. अंगाला माखलेली हळद साडीला लागून नवं वस्त्र खराब होऊ नये हा व्यावहारिक उद्देश. आणि पिवळा रंग कोणत्याही वर्णाच्या नवरीला खुलून दिसतो. (नेमकी छटा निवडायचं चातुर्य हवं मात्र.) वधूला मांडवात आणण्याचा मानही मामाचाच. मी केवळ तुझ्या आईचा नाही तर तुझाही पाठीराखा आहे, हे तो मुलीला सुचवतो. (काही समाजात मात्र मुलगी लग्नायोग्य झाली, की पहिला मान मामाचा असतो. म्हणजे त्यानेच भाचीशी लग्न करायचं. ते शक्य नसेल, तर मग बाहेर योग्य वर शोधतात.) बहिणीच्या नवऱ्याचा कान धरुन तिची नीट काळजी घेण्याचं वचन नवरीचा भाऊ मागतो. मेंदी आपल्याकडे मुख्यत्वे श्रावणात नागपंचमीच्या सणाला, मंगळागौरीला लावत असत आणि संगीताचा वेगळा समारंभ न करता प्रत्येक वेळी म्हणजे अगदी गव्हले, शेवया, लाडू, पापड, लग्नाचे निमंत्रण वगैरे लग्नाची तयारी सुरु असतांना सुध्दा वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गाणी, ओव्या म्हणण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. पण आधी हौस म्हणून आणि आता ‘ट्रेंड’ म्हणून हा साखरपुडा-मेंदी-संगीत यांचा संस्कृतीसंकर सगळ्यांनीच आपलासा केला आहे.
बंगाली लग्नात शंखध्वनीला खूप महत्त्व असतं. नवरा मुलगा लग्नाच्या मांडवात आला की मुलीकडच्या स्त्रिया जीभ ओठांवर आपटून विशिष्ट आवाज करतात (हा आवाज शब्दांत लिहिणं कठीण आहे, पण ल्ळ असा आवाज ऐकू येतो.) हाताचा पंजा तोंडावर आपटतात. (आपण होळीला करतो तसं. पण ओsss असं न करता) नवरी मांडवात येतांना पाटावर किंवा छोट्या चौरंगावर बसते, विड्याच्या पानांनी आपला चेहरा झाकून घेते. तिचे भाऊ आणि इतर नातेवाईक तिला उचलून मांडवात आणतात. तिला उचलून नवऱ्याभोवती ७ फेऱ्या मारतात. त्यानंतर ती चेहऱ्याच्या पुढे धरलेली पानं बाजुला करते आणि नवरा-नवरी एकमेकांकडे पाहतात. मग तीन वेळा माळ अदला-बदली करतात. नंतर नवरा-नवरी मांडवात जाऊन पुढचे विधी करतात. लग्नाच्या रात्री नवरा-नवरी एकमेकांना कोडी घालतात. यातून त्यांची बुद्धी, चातुर्य आणि प्रसंगावधान दिसतं.
सिंधी समाजात नवरा-नवरी अंतरपाटाच्या दोन्ही बाजुला बसतात. त्यांचे पाय निरशा दुधाने धुतात. नंतर एकमेकांना माळ घातली, की पुढचे विधी सुरु. सिंधी लग्नात सात नाही चारच फेरे असतात. सासरी आल्यानंतर नवरी घराच्या सर्व कोपऱ्यांत दूध शिंपडते. नंतर एक मुठभर मीठ ती नवऱ्याच्या हातात देते. नवरा ते तिला परत देतो. असं तीन वेळा करायचं. पण मिठाचा एक कणही सांडू द्यायचा नाही. नंतर सगळ्या नातेवाईकांसमोर पुन्हा हे सगळं करायचं.
पंजाबी लग्नविधी आपण हिंदी चित्रपटांतून असंख्य वेळा पाहिला आहे. पंजाबी वधू सासरी प्रवेश करतांना तांदळाने भरलेलं माप नाही, तर मोहरीच्या तेलाने भरलेलं भांडं ओलांडून येते. त्यापूर्वी माहेर सोडतांना मूठभर तांदूळ खांद्यावरून मागे फेकतात. आई ते तांदूळ आपल्या पदरात झेलते. कल्पना अशी की मुलगी आपल्या पालकांना सांगते आता तुमच्या घरातील अन्नाचा माझा वाटा संपला. आजपर्यंत जे खाल्लं, ते परत करून जाते. हे सगळं अर्थात प्रतीकात्मक असतं. माहेरचे पाश तोडून सासरच्या घराशी एकरुप होण्यासाठी मुलीच्या मनाची तयारी व्हावी हा हेतू.
तामिळनाडूचे वैशिष्ट्य असलेली कांजीवरम् साडी हा साडी नेसणाऱ्या स्त्रियांचा हळवा कोपरा. एकापेक्षा एक लफ्फेदार कांजीवरम् साड्या नेसलेल्या पृथुल स्त्रियांनी गजबजलेला लग्नमंडप म्हणजे हमखास तमिळी कुटुंबातील लग्न. तमिळ नवरा आदल्या दिवशी वधुच्या घरी येऊन मुक्काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा मुलगा काशीला जायला निघतो. मला गृहस्थाश्रमात स्वारस्य नाही, मी काशीला जाऊन देवाच्या चरणी राहतो, असं सांगतो. मग वधूपिता त्याची वाट अडवतो. आपल्या मुलीचा स्वीकार करून गृहस्थाश्रमी होण्यासाठी त्याचं मन वळवतो. नंतर मुलगा काशीला जाण्याचा विचार बदलून लग्नाला राजी होतो. लग्नासाठी नवरा मुलगा मांडवात आला, की तो आणि नवरी एक पुष्पमाला तीन वेळा एकमेकांच्या गळ्यात घालतात. मग त्यांना एका झुल्यावर बसवतात आणि दूध, केळी देतात. चारही दिशांना अक्षता फेकून दुष्ट शक्तींना दूर करतात. मग नवरा-नवरीला मांडवात नेऊन पुढचे विधी पार पाडतात. गृहप्रवेश झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आई आपल्या मुलीला कृष्णाची मूर्ती भेट देते.
केरळमध्ये लग्न ठरल्यानंतर निश्चयम् नावाचा एक विधी होतो. म्हणजे आपण अलीकडे साखरपुडा करतो तसा. या वेळी दोन्ही घरातील नातेवाईकांना लग्न ठरल्याची माहिती दिली जाते. पण गंमत म्हणजे ज्यांचं लग्न ठरतं ते नवरा-नवरी या समारंभाला हजर नसतात. लग्नासाठी मल्याळी नवरा मांडवात येतो तेव्हा तो धोतर (लुंगी) आणि उपरणं अशा वेषात असतो. बरोबर आणलेली पांढरी साडी तो वधुपित्याजवळ देतो. ही साडी नेसून वधूने लग्नासाठी तयार व्हायचं असतं. (जरीकाठाची मोतीया रंगाची केरळ कॉटन साडी ही कॉटनप्रेमी स्त्रियांची खास आवड.) मल्याळी लग्नात मोजकेच विधी असतात. कन्यादान, पिवळ्या धाग्यातलं मंगळसूत्र घालणं, लाजाहोमाला तीन प्रदक्षिणा, सहाणेवर उभं राहून नव्या आयुष्याची प्रतीकात्मक सुरुवात आणि डोक्याला डोके लावून एकवाक्यता, एकविचार यांची शपथ. झालं लग्न.
आंध्रात तेलुगु लग्नाच्या दिवशी वधू-वरांना एकत्र मंगलस्नान घालतात. नवरा-नवरी अंतरपाटाच्या आड असतांनाच कन्यादानाचा विधी होतो. कन्यादानाचा विधी झाल्यानंतर नवरा-नवरी एकमेकांच्या हाताला जिरेपूड आणि गूळ यांचं मिश्रण लावतात. यातून ते आपण एक झालो आहोत, असंच एकमेकांना सांगतात. नंतर दहा सवाष्णी त्यांच्या सभोवती उभ्या राहतात. सहा जणींच्या हातात हळद आणि तांदळाने भरलेली ताटे असतात आणि चौघींच्या हातात तांदूळ पिठी, साखर आणि दूध यांच्यापासून तयार केलेले दिवे असतात. यानंतर अंतरपाट दूर करतात आणि मंगळसूत्र घालण्याचा विधी होतो. नंतर एकमेकांना माळ घालतात.
उडीशा प्रांतात लग्नात होमाभोवती प्रदक्षिणा घालतांना नवरा-नवरीचे हात आंब्याच्या पानांपासून तयार केलेल्या तोरणाने बांधतात. लाजाहोमानंतर नवरीचा भाऊ नवऱ्या मुलाच्या पाठीत धपाटा घालतो. येथेही शंखध्वनीला खूप महत्त्व आहे. लग्नानंतर कवड्या खेळतात. नवरा आपल्या हातात एक कवडी मुठीत घट्ट पकडतो आणि नवरीने ती मूठ उघडायची. नवरीने दोन्ही हातांचा वापर केला तर चालत, नवऱ्याने मात्र एका हातानेच नवरीची मूठ उघडायची. वधूकडची एखादी पोक्त स्त्री पंच असते. इथेही एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळतात. नंतर पाठवणीची गाणी. मुलीला जन्म देतांना कशा कळा सोसल्या, तिचं कसं लाडाकोडात पालनपोषण केलं, त्याचं वर्णन करणारी गाणी गातात. लग्नाच्या चौथ्या दिवशी नवरा-नवरी प्रथम भेटतात. त्या वेळी होम, पूजा करतात. हे लोक मुलीला दुहिता म्हणतात. जी दोन घरात राहते ती. लग्नापूर्वी ती पित्याच्या घराला आपलं घर समजून राहते. ते तिचं जन्मघर. आणि लग्नानंतर सासर हेच तिचं खरं घर.
हळद लावणं, कंकण बांधणं, कन्यादान, सप्तपदी/सात फेरे, मुलीची पाठवणी, जावयाला विष्णूचा अवतार मानून नवरीच्या आई-वडिलांनी त्याची पाद्यपूजा करणं, वधूच्या सासरघरी गृहप्रवेशाच्या वेळी तिला लक्ष्मी समजून तिचं होणारं स्वागत, तांदळाने भरलेलं माप ओलांडून तिने घरात प्रवेश करणं, लग्नानंतर एकत्र तारादर्शन (ध्रुव आणि अरुंधती) वर-वधूकडच्या लोकांनी एकमेकांना भेटवस्तू देणं, असे काही विधी थोड्याफार फरकाने सगळ्याच प्रांतांत केले जातात. ‘विविधता में एकता’ असं आपल्या देशाचं वर्णन अगदी सार्थ आहे.
राधा मराठे
२८.०१.२०१८
(पूर्व प्रसिध्दी - आम्ही उद्योगिनी विवाह विशेषांक २०१५)