18/05/2026
ll श्री स्वामी समर्थ ll
दत्त गुरूंच्या मंदिरात सकाळी प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते. ताज्या फुलांचा सुगंध, चंदनाचा गंध, कापूर आणि उदबत्तीचा मंद दरवळ, नुकत्याच झालेल्या पूजेमुळे तेजाळलेल्या श्रीदत्तांच्या पादुका, मंद स्वरात सुरू असलेले नामस्मरण, घंटानाद... हे सगळच कस आपल्या चित्ताला शांत करणार, मनाला स्थिर करणार आणि पंचेंद्रियांना सुखावणार असत.हो ना??
श्रीदत्तांच्या समोर उभे राहिल्यावर मनातील चिंता हळूहळू विरघळू लागतात. मीच करतो हा भाव कमी होऊन सर्व काही गुरूकृपेनेच घडते ही जाणीव अंतःकरणात दृढ होते. त्यांच्या चरणी माथा टेकवताना आपण एकटे नाही, आपल्या पाठीशी सदैव गुरूंचा कृपाहस्त आहे, असा विश्वास मनात जागृत होतो...
मंदिरात काही क्षण शांत बसून दत्तनामाचा जप करत राहिलो की मनाची धूळ झटकली जाते. काळजी, भीती, अस्वस्थता आणि ताण हळूहळू दूर होतात. मनाला धीर मिळतो, आपल्या बुद्धीला दिशा मिळते... आधार मिळतो. परिस्थिती तीच असते, पण ती स्वीकारण्याची आणि समर्थपणे जगण्याची शक्ती मिळते.
फक्त देवळात जाऊन नमस्कार करून परत आलो, एवढंच घडत नाही. श्रीदत्तांच्या दर्शनाने अंतर्मनात शांतता, विश्वास, समाधान आणि गुरूकृपेची अनुभूती जागृत होते. आपण बाहेरून रिकाम्या हाताने परतत असलो, तरी आतून नव्या उर्जेने, नव्या श्रद्धेने आणि नव्या आशेने समृद्ध होऊन परततो.
ही प्रसन्नता, ही अंतर्मनाला स्पर्श करणारी शांतता, हे सुंदर गुरुदर्शन आणि ही अनामिक कृपा लाभते, ती केवळ श्री दत्त महाराजांच्या करुणेमुळेच. तेच आपल्याला अलगद फुलासारखे सांभाळून घेतात, जीवनप्रवासात योग्य दिशा दाखवतात आणि प्रत्येक वेळी पुन्हा आपल्या चरणी आणून उभे करतात.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ll श्री स्वामी समर्थ ll